मनपाकडे डेंग्यू नियंत्रणासाठी सक्षम यंत्रणाच नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:16 AM2021-09-02T04:16:31+5:302021-09-02T04:16:31+5:30
नागपूर : उपराजधानीत सण-उत्सवाचे वातावरण आहे तर दुसरीकडे मात्र डेंग्यूचे विघ्न गंभीर रूप धारण करीत आहे़ जवळजवळ अर्धे शहर ...
नागपूर : उपराजधानीत सण-उत्सवाचे वातावरण आहे तर दुसरीकडे मात्र डेंग्यूचे विघ्न गंभीर रूप धारण करीत आहे़ जवळजवळ अर्धे शहर ऐन सणासुदीच्या दिवसात तापाने फणफणले आहे. वस्त्यावस्त्यांमध्ये डेंग्यूचे रुग्ण आढळत आहेत. परंतु महानगरपालिकेकडे डासांशी मुकाबला करण्याची प्रभावशाली यंत्रणा नाही. त्यामुळे अत्यंत संवेदनशील व नाजूक आरोग्याच्या बाबतीत शहराला डेंग्यूसारख्या धोक्याच्या मिठीत ढकलले जात असल्याचे वास्तव आहे.
डेंग्यूवर स्पष्ट उपचार किंवा ॲण्टीबायोटिक किंवा ॲण्टीव्हायरल औषध नाही. आजार गंभीर झाल्यास मृत्यूचा धोका संभवतो. सध्या पावसाची उघडझाप, घराघरात सुरू असलेले कूलर, उघड्या असलेल्या पाण्याच्या टाक्या, मोकळ्या प्लाॅटवर साचून असलेले पाणी, रस्ते व इतरही बांधकामासाठी साठवून ठेवलेले पाणी डेंग्यू डासाची उत्पत्तीचे केंद्र ठरत आहे. डेंग्यूवर नियंत्रण आणण्यासाठी बाराही महिने घराघरांचे सर्वेक्षण केले जाते. परंतु मनपाच्या हिवताप व हत्तीरोग विभागाकडे आधीच मनुष्यबळ कमी असताना त्यांच्याकडे ‘कोरोना’चीही जबाबदारी देण्यात आल्याने सर्वेक्षणच झाले नाही. जून महिन्यात रुग्णांची संख्या ८६ वर गेल्यानंतर महापालिका प्रशासन जागे झाले.
-घराघराच्या सर्वेक्षणाचा फायदा कुणाला?
जून महिन्यात डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढताच मनपाने १६ जुलैपासून घराघराच्या सर्वेक्षणाची विशेष मोहीम हाती घेतली. यात आतापर्यंत ६७ हजार २०२ घरे दूषित म्हणजे, डेंग्यू अळी आढळून आल्या. विशेष म्हणजे, जुलै महिन्यात दूषित घरांची संख्या ५ हजार ९२९ असताना ऑगस्ट महिन्यात या घराची संख्या ६७ हजारावर गेली. यामुळे या मोहिमेचा फायदा कुणाला, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. जोपर्यंत दूषित घरावर दंडात्मक कारवाई होत नाही तोपर्यंत सर्वेक्षणाचा फायदा होणार नाही, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
- दरवर्षी डेंग्यूचा फैलाव तरी प्रभावी योजना नाही
दरवर्षी पावसाळयात डेंग्यूच्या साथीचा फैलाव होतो, हे नित्याचे आहे. परंतु याबाबत पूर्वकाळजी घेतली जात नाही. परिणामी यावर्षी रोगाने थैमान घातले आहे. आजार पसरू नये यासाठी महानगरपालिकेच्या वतीने जी उपाययोजना आधीच करायला पाहिजे ती झाली नाही, ही वस्तुस्थिती आहे. महत्त्वाचे म्हणजे, महानगरपालिकेकडे डासांशी मुकाबला करण्याची प्रभावशाली यंत्रणाच नाही. दहा फॉगिंग मशीन असताना यातील दोन कित्येक महिन्यापासून बंद आहे. ३० लाख लोकसंख्या असलेल्या शहरात केवळ आठ फॉगिंग मशीन फिरवून डेंग्यूवर नियंत्रण आणण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू आहे.
- गरज ८०० ची, काम करीत आहेत २१० कर्मचारी
डेंग्यूवर नियंत्रण आणण्यासाठी मनपाच्या हिवताप व हत्तीरोग विभागाला ८०० कर्मचाऱ्यांची गरज आहे. परंतु जवळपास २१० कर्मचारी काम करीत आहेत. हॅण्ड फॉगिंग किंवा कीटकनाशक फवारणी करण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ नसल्याने डेंग्यूवर प्रभावी अंमलबजावणी करण्यात मोठी अडचण निर्माण होत असल्याचे चित्र आहे.
::डेंग्यू रुग्णांची स्थिती
महिना : रुग्ण
जानेवारी :०२,
फेब्रुवारी :०१
मार्च :०३
मे:०६
जून: ८६
जुलै :२५१
ऑगस्ट :२१६
(दि. २५ पर्यंत )