एसटीच्या 'दुसऱ्या उत्पन्नाची' महामंडळाकडे माहितीच नाही; RTI मधून उघड
By नरेश डोंगरे | Published: April 18, 2024 06:19 PM2024-04-18T18:19:32+5:302024-04-18T18:19:47+5:30
प्रवासी वाहतूक करविणारी एसटी बस असो, रेल्वे असो की विमान. प्रवाशांकडून तिकिट भाडे घेण्यासोबतच त्यांचे लगेज (सामान) वाहतूकीतूनही उत्पन्न मिळवत असते.
नागपूर : प्रवासी भाड्या व्यतिरिक्त दुसऱ्या कोणकोणत्या मार्गाने एसटीला उत्पन्न मिळते, त्याची महामंडळाला माहितीच नसल्याचे धक्कादायक वृत्त पुढे आले आहे. महामंडळाच्या जन माहिती अधिकाऱ्यांनी तसे लेखी उत्तरातून कळविले आहे.
प्रवासी वाहतूक करविणारी एसटी बस असो, रेल्वे असो की विमान. प्रवाशांकडून तिकिट भाडे घेण्यासोबतच त्यांचे लगेज (सामान) वाहतूकीतूनही उत्पन्न मिळवत असते. विमानतळावर पार्किंग, वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल्स (शॉप), रेस्टॉरेंट, तसेच जाहिरातीच्या माध्यमातून त्यांना मोठा महसूल मिळतो. हवाई कंपन्यांची उत्पन्नांची बातच न्यारी आहे. तर, रेल्वेकडून उत्पन्नाचे वेगवेगळे स्त्रोत निर्माण करण्यावर अलिकडे मोठा भर देण्यात येत आहे. प्रवासी, मालवाहतूक तर शेकडो कोटी देणारी आहेच, भंगार विकून त्यातूनही कोट्यवधी रुपये गोळा करण्याचा सपाटा रेल्वेने लावला आहे.
दुसरीकडे एसटीकडे प्रवासी भाड्या व्यतिरिक्त उत्पन्नाचे दुसरे कोणते स्त्रोत आहेत आणि त्यातून किती उत्पन्न मिळवले जाते, त्याची माहितीच अधिकाऱ्यांना नसल्याचे दिसून येते. माहिती अधिकारात विचारलेल्या प्रश्नावर एसटी महामंडळाने कोणत्या बाबीतून किती उत्पन्न मिळवले, त्याची माहिती नसल्याचे लेखी उत्तर महामंडळाच्या जन माहिती आणि सांख्यिकी अधिकाऱ्यानी दिली आहे.
माहित नाही की, माहिती बाहेर येऊ द्यायची नाही ?
विशेष म्हणजे, एसटी महामंडळाला प्रवासी भाड्यासोबतच मालवाहतूकीतून हमखास उत्पन्न मिळते. लग्नसारखे प्रासंगिक करार त्यातून उत्पन्न मिळते. जिल्हा आणि तालुका मुख्यालयाच्या स्थानकावर रेस्टॉरेंट असते. काही ठिकाणी विविध वस्तू विक्रीचे शॉपही असतात. रसवंती असते. पार्किंग असते. या ठिकाणी विविध कंपन्या आणि व्यापारी प्रतिष्ठानांची जाहिरात करणारे मोठमोठे साईन बोर्ड असतात, त्यातूनही मोठे उत्पन्न मिळते. असे असताना जन माहिती अधिकाऱ्यांना या उत्पन्नांच्या स्त्रोतांची आणि त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नाची माहिती नसण्याची बाब संशयास्पद आहे. अधिकाऱ्यांना खरेच ते माहित नाही की ही माहिती बाहेर येऊ द्यायची नाही, असा प्रश्न यामुळे चर्चेला आला आहे.