मनपाने पीएफचे ७२ कोटी जमाच केले नाहीत : चौकशीचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2020 08:12 PM2020-08-27T20:12:15+5:302020-08-27T20:14:38+5:30
महापालिकेतील कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कपात करण्यात आलेला ७२ कोटींचा भविष्य निर्वाह निधी व अंशदान पेन्शन योजनेची रक्कम कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आलेली नाही. या आर्थिक घोटाळ्याची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश महापालिकेचे उपायुक्त निर्भय जैन यांनी प्रमुख लेखा व वित्त अधिकाऱ्यांना दिले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिकेतील कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कपात करण्यात आलेला ७२ कोटींचा भविष्य निर्वाह निधी व अंशदान पेन्शन योजनेची रक्कम कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आलेली नाही. या आर्थिक घोटाळ्याची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश महापालिकेचे उपायुक्त निर्भय जैन यांनी प्रमुख लेखा व वित्त अधिकाऱ्यांना दिले आहेत.
महाराष्ट्र शासनातर्फे तीन वर्षासाठी काही अधिकाऱ्यांना महापालिकेत प्रतिनियुक्तीवर पाठविण्यात येते. २०१० ला प्रतिनियुक्तीवर पाठविण्यात आलेले तत्कालीन प्रमुख लेखा व वित्त अधिकारी मदन गाडगे नोव्हेंबर २०१७ पर्यंत कार्यरत होते. या सात वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी कर्मचारी व शिक्षकांच्या वेतनातून कपात करण्यात आलेला भविष्य निर्वाह निधी व कर्मचारी अंशदान पेन्शन योजनेची रक्कम बँकेत जमा केलेली नाही. यामुळे कर्मचारी व शिक्षकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले.
गाडगे यांनी भविष्य निर्वाह निधीचे ५१ कोटी तर अंशदान पेन्शन योजनेचे कपात केलेले ३७ कोटी व मनपाचा वाटा ३७ कोटी अशी ७२ कोटींची रक्कम जमा केलेली नाही. त्यामुळे या रकमेवर व्याजही मिळत नाही. तसेच एलआयसीत रक्कम वेळेवर न भरल्यामुळे दंड भरावा लागला. या कालावधीत गट विमा न भरल्याने १२ मृत कर्मचारी व शिक्षकांच्या वारसांना नियमाप्रमाणे संपूर्ण रक्कम मिळाली नाही. कर्मचाऱ्यांच्या पैशाचा अपहार करण्यात आला. गाडगे यांच्या कार्यकाळात मनपा कर्जबाजारी झाली. या आर्थिक घोटाळ्याची चौकशी करून दोषीवर कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रीय नागपूर कॉर्पोरेशन एम्प्लॉईज असोसिएशनचे अध्यक्ष सुरेंद्र टिंगणे व जनरल सेक्रेटरी रंजन नलोडे यांनी मुखयमंत्री उद्धव ठाकरे व मनपा आयुक्त यांच्याकडे केली आहे. आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार निर्भय जैन यांनी वित्त विभागाला या प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले.