मनपाच्या इंग्रजी माध्यमाच्या सहा शाळा सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:09 AM2021-07-14T04:09:45+5:302021-07-14T04:09:45+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : महानगरपालिका या शैक्षणिक सत्रात नागपूर शहरातील सहा विधानसभा क्षेत्रात प्रत्येकी एक याप्रमाणे सहा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महानगरपालिका या शैक्षणिक सत्रात नागपूर शहरातील सहा विधानसभा क्षेत्रात प्रत्येकी एक याप्रमाणे सहा इंग्रजी माध्यमांच्या शाळा सुरू करणार आहे. यासंदर्भात मनपा आणि आकांक्षा फाउंडेशन यांच्यात सामंजस्य करार झालेला आहे.
या शाळांमध्ये लवकरच नि:शुल्क केजी वन, केजी टू आणि इयत्ता पहिलीच्या वर्गांना सुरुवात होणार असल्याची माहिती महापौर दयाशंकर तिवारी यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. उपमहापौर मनीषा धावडे, सत्तापक्ष नेते अविनाश ठाकरे, शिक्षण समिती सभापती प्रा. दिलीप दिवे, उपसभापती सुमेधा देशपांडे उपस्थित होते.
शहरातील गरीब, गरजू विद्यार्थ्यांना नि:शुल्क इंग्रजी माध्यमातून शिक्षण मिळावे, यासाठी झोपडपट्टी भागातील मनपाच्या बंद शाळा शोधून त्यामध्ये इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू करण्यात येत आहेत. या शाळेमध्ये महाराष्ट्र शैक्षणिक मंडळाच्या अभ्यासक्रमाचे शिक्षण दिले जाईल.
शाळेच्या संचालनाची जबाबदारी आकांक्षा फाउंडेशन या संस्थेला देण्यात आलेली आहे. मनपातर्फे इमारत, दुरुस्ती, विद्युत व्यवस्था, पाणीव्यवस्था, गणवेश, पाठ्यपुस्तके, शालेय पोषण आहार, विद्यार्थ्यांना नि:शुल्क बस पास याची जबाबदारी स्वीकारली जाईल, अशी माहिती प्रा. दिलीप दिवे यांनी दिली.
...
या आहेत सहा शाळा
उत्तर नागपुरातील राणी दुर्गावती प्राथमिक शाळा, पूर्व नागपुरातील बाभुळबन मराठी प्राथमिक शाळा, दक्षिण-पश्चिम नागपुरातील स्व. बाबूराव बोबडे मराठी प्राथमिक शाळा, पश्चिम नागपुरातील रामनगर मराठी प्राथमिक शाळा, दक्षिण नागपुरातील रामभाऊ म्हाळगीनगर मराठी प्राथमिक शाळा आणि मध्य नागपुरातील स्व. गोपालराव मोटघरे (खदान).
...
असा उचलणार आर्थिक भार
शिक्षकांच्या वेतनासाठी पहिल्या वर्षी संस्थेद्वारे ३० टक्के, तर मनपाद्वारे ७० टक्के, दुसऱ्या वर्षी संस्था ३५ टक्के व मनपा ६५ टक्के, तिसऱ्या वर्षी संस्था ४० व मनपा ६०, चवथ्या वर्षी व त्यापुढे संस्था ४५ टक्के, तर मनपा ५५ टक्के भार निर्वहन करणार आहे.