पीओपी मूर्तींवरील निर्बंधासाठी मनपा गंभीर नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 04:06 AM2021-07-01T04:06:53+5:302021-07-01T04:06:53+5:30
नागपूर : केंद्रीय प्रदूषण नियंत्रण बोर्ड, दिल्लीने १२ ते २०२० ला पीओपी मूर्तींवरील निर्बंधाच्या मार्गदर्शिका व २० मे २०२० ...
नागपूर : केंद्रीय प्रदूषण नियंत्रण बोर्ड, दिल्लीने १२ ते २०२० ला पीओपी मूर्तींवरील निर्बंधाच्या मार्गदर्शिका व २० मे २०२० ला पीओपी मूर्तींची निर्मिती, विक्री, आयात व संग्रहावर प्रतिबंध लावण्याचे पत्र जारी केले होते. परंतु, मनपाकडून या पत्राबाबत कुठलीच दखल घेतली गेली नाही. त्यामुळे नागपूर शहरात पीओपी मूर्तींवर तात्काळ बंदी घालण्याची मागणी पारंपरिक मूर्तिकार व हस्तकला संघाचे अध्यक्ष सुरेश पाठक, कार्याध्यक्ष चंदनलाल प्रजापती यांच्या नेतृत्वात मूर्तिकारांच्या शिष्टमंडळाने महापौर दयाशंकर तिवारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
यावेळी झालेल्या चर्चेत महापौरांनी मनपा पीओपी मूर्तींवर बंदी घालण्यासाठी अत्यंत गंभीर असल्याचे आश्वासन दिले. उत्सवपूर्व दिशानिर्देशांवर आवर्जून अंमलबजावणी केली जाईल, असेही त्यांनी सांगितले. ३० ऑगस्टला श्रीकृष्ण जन्माष्टमी आहे. तेव्हापासून ते दिवाळीपर्यंत मूर्तिपूजेची धूम असते. पीओपी मूर्तींचे विक्रेते उत्सवाच्या एक महिना आधीपासून बाजार, चौक व दुकानांमध्ये मूर्ती आणून ठेवत असतात. आता उत्सवाला केवळ दोनच महिने शिल्लक आहेत. तरीदेखील मनपाने अजूनही पीओपी मूर्तींवरील निर्बंधाबाबत कोणतेही दिशानिर्देश जारी केलेले नाहीत. जेव्हा की पीओपी मूर्तींची आयात कोणत्याही वेळी होऊ शकते, अशी व्यथा चर्चेदरम्यान शिष्टमंडळाने ठेवली. शिष्टमंडळाने हीच व्यथा महाराष्ट्र प्रदूषण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी अशोक पिरे यांच्याकडेही निवेदनाद्वारे ठेवली आहे. यावेळी हलबा मूर्तिकार संघाचे राकेश पाठराबे, बंटी बिनेकर, सचिन पराते, विदर्भ मूर्तिकार चित्रकला संस्थेचे सुशील चौरसिया, राजन चौरिया, रामेश्वर चौधरी, गजानन बुरबदे, मयूर गाते, मनोज वरवाडे, राजेश चिकाने, बंटी प्रजापती, घनश्याम वालदे, रमेश कपाट, प्रवीण गाते, नाना कोटागळे, श्याम बुरबदे, अनिल कोटागळे, बबलू कपाटे, चमनलाल प्रजापती, प्रभाकर वालदे उपस्थित होते.
..............