मनपा कार्यालयाला नगरसेवकांनी ठोकले कुलूप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2020 09:23 PM2020-06-30T21:23:44+5:302020-06-30T21:29:58+5:30
आधीच खेळाडूंना खेळण्यासाठी मैदाने अथवा हॉल नाही. अशात मनपाने हनुमाननगर येथे तयार केलेल्या बॅडमिंटन हॉलमध्ये हनुमाननगर झोनचे कर संकलन कार्यालय सुरू केल्याने संतप्त नगरसेवकांनी आत कर्मचारी असतानाच मंगळवारी या कार्यालयाला कुलूप ठोकले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आधीच खेळाडूंना खेळण्यासाठी मैदाने अथवा हॉल नाही. अशात मनपाने हनुमाननगर येथे तयार केलेल्या बॅडमिंटन हॉलमध्ये हनुमाननगर झोनचे कर संकलन कार्यालय सुरू केल्याने संतप्त नगरसेवकांनी आत कर्मचारी असतानाच मंगळवारी या कार्यालयाला कुलूप ठोकले. दरम्यान महापौर संदीप जोशी तेथे पोहचले व त्यांनी सायंकाळी ५ पर्यंत हॉल रिकामा करण्याचे निर्देश दिले. तसे झाले नाही तर २ जुलै रोजी नगरसेवकांसोबत आपणही हॉलसमोर उपोषणाला बसणार, असा अल्टीमेटम दिला.
नगरसेवक डॉ. रवींद्र भोयर, उषा पॅलट, शीतल कामडे यांच्यासह परिसरातील नागरिक हनुमाननगर बॅडमिंटन हॉल येथे पोहचले व आंदोलन करून कुलूप ठोकले. हनुमाननगर झोनचे कर संकलन कार्यालय चंदननगर येथील शाळेत होते. ती इमारत जीर्ण झाल्याकारणाने प्रशासनाने ते कार्यालय हनुमाननगरच्या बॅडमिंटन हॉलमध्ये हलविले. या बॅडमिंटन हॉलचे नुकतेच नूतनीकरण करण्यात आले असून, पुढील काही दिवसातच त्याचे लोकार्पण करण्यात येणार होते. मात्र, त्यापूर्वीच मनपा प्रशासनाने कर संकलन कार्यालय तेथे स्थानांतरित केले.
संदीप जोशी यांना याबाबत माहिती मिळताच ते तेथे पोहोचले, सोबत उपमहापौर मनीषा कोठे, आरोग्य समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा होते. एकीकडे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे नागपुरात खेळाची मैदाने, विविध खेळांसाठी आवश्यक असलेले हॉल आदी साधने उपलब्ध करून देण्याच्या प्रयत्नात असताना प्रशासकीय कार्यासाठी हॉल बळकावणे, हे मनपा प्रशासनाला शोभणारे नाही, या शब्दात महापौरांनी आपली नाराजी व्यक्त केली.
सहायक आयुक्तांना ‘कारणे दाखवा’नोटीस
आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी संदीप जोशी स्वत: तेथे पोहचले असतानाही हनुमाननगरच्या सहायक आयुक्त सुषमा मांडगे यांनी मुख्यालयात बैठकीचे कारण सांगून तेथे येण्यास असमर्थता दर्शविली. याची गंभीर दखल घेत महापौर संदीप जोशी यांनी त्यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावण्याचे निर्देश दिले.