नागपूर जिल्हा परिषदेच्या बैठकीला भट सभागृह देण्यास मनपाचा नकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2020 11:02 PM2020-07-03T23:02:49+5:302020-07-03T23:04:58+5:30
जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेकरता भट सभागृह देण्यास महापालिका प्रशासनाने नकार दिल्याची माहिती आहे. महानगरपालिकेने सभागृह देण्यास नकार दिल्याने जिल्हा परिषद प्रशासनाने देशपांडे सभागृहात सभा घेण्याची तयारी सुरू केल्याची सूत्रांकडून समजते.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेकरता भट सभागृह देण्यास महापालिका प्रशासनाने नकार दिल्याची माहिती आहे. महानगरपालिकेने सभागृह देण्यास नकार दिल्याने जिल्हा परिषद प्रशासनाने देशपांडे सभागृहात सभा घेण्याची तयारी सुरू केल्याची सूत्रांकडून समजते.
जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन झाल्यानंतर एकही सभा घेता आली नाही. अर्थसंकल्पाचीही सभा होऊ शकली नाही. अर्थसंकल्पही तत्कालीन सीईओंनी मंजूर केला. परंतु अर्थसंकल्पाच्या अंमलबजावणीस सर्वसाधारण सभेची परवानगी आवश्यक आहे. मात्र कोरोनामुळे गेल्या पाच महिन्यापासून सभाच घेता नाही. यामुळे विकास कामांना खीळ बसली. जिल्हा परिषदेकडून सभेकरता मागण्यात आलेली पहिली विनंती जिल्हाधिकाऱ्यांनी फेटाळली, परंतु दुसऱ्यांदा परवानगी देण्यात आली. याकरिता जिल्ह्यातील एका काँग्रेसच्या बड्या नेत्याने मोठे प्रयत्न केले. महानगरपालिकेच्या मालकीच्या भट सभागृहात ही सभा घेण्याचा मानस जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला होता. भट सभागृह मिळण्याकरता अध्यक्षा रश्मी बर्वे यांनी महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांना पत्रही दिले होते. याकरिता आवश्यक रक्कम भरण्याची तयारी दर्शविली होती. महानगरपालिकने भट सभागृह देण्यास आता नकार दर्शविला आहे. महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी तशी मौखिक माहितीही जिल्हा परिषद प्रशासनाला दिल्याची माहिती सूत्रांनी दिली