मनपाच्या विद्यार्थ्यांना मिळणार टॅब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2020 12:06 AM2020-08-18T00:06:47+5:302020-08-18T00:10:21+5:30
कोविड संक्रमणामुळे शाळा बंद आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक सत्र वाया जात आहे. याचा विचार करता ‘लर्निंग फ्रॉम होम’ संकल्पनेंतर्गत मनपा शाळातील इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना अॅन्ड्रॉईड टॅबलेट उपलब्ध करण्याची योजना शिक्षण विभागाने तयार केली आहे. या प्रकल्पाला एज्युकेशन टॅब बँक असे नाव दिले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोविड संक्रमणामुळे शाळा बंद आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक सत्र वाया जात आहे. याचा विचार करता ‘लर्निंग फ्रॉम होम’
संकल्पनेंतर्गत मनपा शाळातील इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना अॅन्ड्रॉईड टॅबलेट उपलब्ध करण्याची योजना शिक्षण विभागाने तयार केली आहे. या प्रकल्पाला एज्युकेशन टॅब बँक असे नाव दिले आहे.
या प्रकल्पांतर्गत इयत्ता नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना टॅबच्या माध्यमातून शिक्षण दिले जाणार आहे. सध्या मनपा शाळात इयत्ता दहावीत १७२३ तर बारावीत २१५ विद्यार्थी आहेत. दोन्ही वर्गातील विद्यार्थ्यांना सध्या ऑनलाईन शिक्षणाची नितांत गरज आहे. परंतु आर्थिक परिस्थिती नसल्याने मनपा शाळेतील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. याचा विचार करता शिक्षण विभागाने या विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देण्याची योजना तयार केली आहे.
याबाबतचा प्रस्ताव तयार करून १९५० टॅब खरेदी करण्यात येईल. प्रति टॅब १०,९८८ रुपये याप्रमाणे मनपाला यावर २ कोटी ४९ लाख ५६ हजार १०० रुपये खर्च करावा लागेल. प्रति टॅब संचालित करण्यासाठी मोबाईल कंपन्यांना दर महिन्याला १५० रुपये खर्च करावा लागेल. यावर मनपाला ३५.१० लाख खर्च रुपये खर्च करावा लागेल. विद्यार्थ्यांना दररोज १.५ जीबी डाटा उपलब्ध करावा लागेल. या प्रकल्पावर २ कोटी ४९ लाख ५६ हजार १०० रुपये खर्च अपेक्षित आहे. याबाबतचा प्रस्ताव आगामी सभागृहात मंजुरीसाठी ठेवला जाणार आहे. या प्रस्तावाला मंजुरी मिळते की नाही, याकडे लक्ष लागले आहे.
ई-लर्निंग सॉफ्टवेअर उपलब्ध होणार
टॅबमध्ये केंद्र व राज्य सरकारतर्फे उपलब्ध करण्यात आलेल्या ई-लर्निंग सॉफ्टवेअर डाऊनलोड करण्यात येईल. राज्य सरकारतर्फे दीक्षा व केंद्र सरकारतर्फे एमएचआरडी प्लॅटफॉर्म सुरू करण्यात आला आहे. ई-बालभारती, बोलकी बालभारती, आठवी ते दहावी विज्ञान, भूगोल, संस्कृतचे व्हिडिओ, बालभारती यूट्यूब चॅनल, किशोर मासिक आधी साहित्य उपलब्ध होईल.
वर्षाच्या खर्चासाठी तरतूद
प्रति टॅब दरवर्षी १५०० रुपये खर्चाचा अंदाज आहे. याचा विचार करता एका वर्षात त्यासाठी २९.२५ लाख रुपये खर्चाची तरतूद केली आहे. देखभाल व नेट पॅक यावर वर्षाला खर्च होणारे ६४.३५ लाख रुपये शिक्षण विभागाच्या कॉम्प्युटर, प्रिंटर्स, झेरॉक्स व अन्य खरेदी, दुरुस्ती यातून तरतूद करण्याची मागणी स्थायी समितीकडे केली आहे.