विलगीकरणातील २५०० लोकांची मनपा घेतेय काळजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2020 08:53 PM2020-05-06T20:53:56+5:302020-05-06T20:56:32+5:30
शहरामध्ये आमदार निवास, वनामती, रविभवन, सिम्बॉयसिस, व्हीएनआयटी वसतिगृह, पाचपावली पोलिस क्वॉर्टर, प्रोझोन चिचभवन आदी ठिकाणी सुमारे २५०० लोकांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या पुढाकाराने विलगीकरणातील या नागरिकांच्या सुविधेसाठी मनपातर्फे सेवाकार्य सुरू आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोविड-१९ चा संसर्ग रोखण्यासाठी व वेळेत उपचार मिळावे यासाठी मनपातर्फे ‘हाय रिस्क कॉन्टॅक्ट’मधील कोरोनाग्रस्तांचा शोध घेण्यात येतो. त्यांना विलगीकरण कक्षामध्ये ठेवले जाते. शहरामध्ये आमदार निवास, वनामती, रविभवन, सिम्बॉयसिस, व्हीएनआयटी वसतिगृह, पाचपावली पोलिस क्वॉर्टर, प्रोझोन चिचभवन आदी ठिकाणी सुमारे २५०० लोकांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या पुढाकाराने विलगीकरणातील या नागरिकांच्या सुविधेसाठी मनपातर्फे सेवाकार्य सुरू आहे. येथील लोकांच्या आरोग्यासह त्यांची भोजन, निवास व्यवस्था व सुरक्षेबाबत मनपाद्वारे काळजी घेण्यात येत असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
सिम्बॉयसिस, व्हीएनआयटी वसतिगृह, पाचपावली पोलिस क्वॉर्टर या तीन ठिकाणी सुमारे १५०० जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. वाठोडा येथील सिम्बॉयसिसमध्ये ४५० जणांच्या विलगीकरणाची व्यवस्था करण्यात आली आहे. या ठिकाणी मनपाची वैद्यकीय चमू आणि इतर टीम सेवा देत आहेत. क्वारंटाईन करण्यात आलेल्या नागरिकांमध्ये बहुतांशी मुस्लिम बांधव आहेत. त्यांच्यासाठी रमजानच्या पर्वावर दररोज शहरी आणि इफ्तारीचे स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून आयोजन करण्यात येत आहे
पाचपावली क्षेत्रामध्ये पोलिस क्वॉर्टरमध्ये सुमारे ५५० जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. पोलिस क्वॉर्टरमध्ये एकूण ७ विंग असून यातील प्रत्येक विंगमध्ये २७ फ्लॅट आहेत. यापैकी एक विंग वैद्यकीय चमूसाठी निर्धारित करण्यात आली आहे. या विंगमध्ये डॉक्टर, पॅरामेडिकल स्टाफ, परिचारिका यांची निवास व्यवस्था करण्यात आली आहे
व्हीएनआयटीच्या चार वसतिगृहामध्ये सुमारे ६०० संशयितांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. या सर्व ठिकाणी विलगीकरण करून ठेवलेल्या नागरिकांच्या आरोग्य तपासणीसह त्यांना दोन वेळचे भाजी, पोळी, वरण, भात असे जेवण, चहा, नाश्ता ही सर्व व्यवस्था मनपातर्फे करण्यात येत आहे. विलगीकरण कक्षातील नागरिकांवर वैद्यकीय पथकाद्वारे उपचार करण्यात येत आहे.
विलगीकरणातील लोकांचे कोरोना स्वॅब घेण्यात येते. स्वॅबचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यास संबंधित व्यक्तीवर इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो) किंवा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) येथे तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीत उपचार केले जातात. तर अहवाल निगेटिव्ह आल्यास पुन्हा १४व्या दिवशी स्वॅब घेण्यात येतो. तो अहवालसुद्धा निगेटिव्ह आल्यास रुग्णाला सुटी देण्यात येत असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. मात्र येथील काही लोकांची सुविधा नसल्याची तक्रार आहे.