मनपा : ऑनलाईन निवडणुकीमुळे वाढले टेन्शन, महापौर व उपमहापौर आज निवडणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2021 11:26 PM2021-01-04T23:26:20+5:302021-01-04T23:27:41+5:30
Corporation Mayor electionsसंख्याबळाचा विचार करता मनपात भाजपला महापौर व उपमहापौर पदाच्या निवडणुकीत आव्हान नाही. परंतु ऑनलाईन पद्धतीने निवडणूक प्रक्रिया असल्याने सत्ताधाऱ्यांचे टेन्शन वाढले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : संख्याबळाचा विचार करता मनपात भाजपला महापौर व उपमहापौर पदाच्या निवडणुकीत आव्हान नाही. परंतु ऑनलाईन पद्धतीने निवडणूक प्रक्रिया असल्याने सत्ताधाऱ्यांचे टेन्शन वाढले आहे. सोमवारी रजवाडा पॅलेस येथे भाजप नगरसेवकांची बैठक घेण्यात आली. यात ठरल्यानुसार भाजप नगरसेवकांना मनपा मुख्यालयात उपस्थित राहण्यास सांगितले आहे.
भाजपतर्फे महापौर पदासाठी दयाशंकर तिवारी तर उपमहापौर पदासाठी मनीषा धावडे उमेदवार आहेत. तर काँग्रेसमधील गटबाजी कायम आहे. सोमवारी रात्रीपर्यंत यावर तोडगा निघाला नव्हता. विरोधी पक्षनेते तानाजी वनवे गटातर्फे महाविकास आघाडीकडून नगरसेवक मनोज गावंडे यांनी महापौर पदासाठी तर उपमहापौर पदाकरिता नगरसेविका मंगला गवरे यांनी नामनिर्देशन सादर केले आहे. तर शहर काँग्रेसचे अध्यक्ष आ. विकास ठाकरे यांच्या गटाकडून काँग्रेसतर्फे नगरसेवक रमेश पुणेकर यांनी महापौर पदासाठी तर नगरसेविका रश्मी धुर्वे या उपहापौर पदाच्या उमेदवार आहेत. उमेदवार कोण असेल यावर मंगळवारी सकाळी १० वाजता निर्णय घेणार असल्याचे तानाजी वनवे यांनी सांगितले. बसपातर्फे नगरसेवक नरेंद्र नत्थूजी वालदे यांनी महापौर पदाकरिता तर उमहापौर पदाकरिता वैशाली नारनवरे यांनी नामनिर्देशन सादर केले आहे.
भाजपात नाराजी
उपमहापौराच्या निवडीवरून भाजपात नाराजी आहे. पूर्व नागपुरातील नगरसेवकांनी जातीच्या नावावर सक्षम उमेदवाराची निवड केली नसल्याचा आरोप केला आहे. पूर्व नागपुरात तेली समाजाचे ८० हजार, कुणबी ७४ हजार, हिंदीभाषिक १.२५ लाख मतदार आहेत. फक्त एकाच समाजाला झुकते माप दिल्याने आगामी निवडणुकीत पक्षाला याचा फटका बसण्याची शक्यता आहे. भाजपच्या नगरसेविका चेतना टांक, वर्षा ठाकरे, दिव्या धुरडे यांच्यासह ज्येष्ठ महिला नगरसेविकांवर अन्याय झाल्याची भावना आहे. काही निर्णयामुळे पक्षाचे अध्यक्ष प्रवीण दटके यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यामुळे बैठक बोलावण्यात आली होती.
असे होईल मतदान
- निवडणूक प्रक्रियेच्या ४५ मिनिटापूर्वी सदस्यांना लिंक पाठविली जाईल. सदस्यांना ऑनलाईन सहभागी व्हावे लागेल.
- सभेच्या १५ मिनिटापूर्वी सदस्यांना उपस्थिती नोंदवावी लागेल.
- पीठासीन अधिकाऱ्यांनी सदस्याचे नाव पुकारल्यानंतर स्क्रीनवर अनम्युट दाबून आपल्या पसंतीच्या उमेदवाराच्या समर्थनार्थ हात वर करावा लागेल.