मनपाचे २४० बेडचे कोविड केअर सेंटर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 04:10 AM2021-04-23T04:10:08+5:302021-04-23T04:10:08+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : महापालिका लक्षणे नसलेल्या कोविड रुग्णांसाठी पुन्हा २४० बेडचे दोन कोविड केअर सेंटर शनिवारपासून ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिका लक्षणे नसलेल्या कोविड रुग्णांसाठी पुन्हा २४० बेडचे दोन कोविड केअर सेंटर शनिवारपासून सुरू करणार आहे. यात शासकीय तंत्रनिकेतन येथे ८० व विधी महाविद्यालय येथील १६० बेडच्या कोविड केअर सेंटरचा समावेश आहे.
यामुळे आता नागपुरात मनपाचे पाच कोविड केअर सेंटर होतील. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी सहायक आयुक्त व झोनल वैद्यकीय अधिकाऱ्यांना लक्षणे नसलेल्या बाधित रुग्णांना येथे भरती करावयाचे निर्देश दिले आहेत. या माध्यमातून कोरोनाच्या प्रसारावर नियंत्रण करायला मदत मिळेल.
या उपचार केंद्रावर मनपातर्फे डॉक्टर, नर्सेस व अन्य कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. येथील रुग्णांना मनपातर्फे औषधी, जेवण व राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
सध्या नागपुरात आमदार निवास येथे २२५ खाटांचे, पाचपावली येथे १५५ खाटांचे तर व्ही.एन.आय.टी च्या होस्टेलमध्ये ८५ खाटांचे कोविड केअर सेंटर कार्यरत आहे. कोरोनाच्या पॉझिटिव्ह (लक्षणे नसलेल्या) रुग्णांना येथे दाखल करण्यात येत आहे. त्यांच्या उपचाराची उत्तम व्यवस्था येथे करण्यात आली आहे. येथील रुग्णांची प्रकृती बिघडली तर त्याला मनपाच्या रुग्णवाहिकेव्दारे रुग्णालयात दाखल केल्या जाते. राधाकृष्णन बी. यांनी कोरोना बाधितांना या सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.