मनपाच्या ६५ रुग्णवाहिका सेवेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2020 08:34 PM2020-09-09T20:34:10+5:302020-09-09T20:36:01+5:30
महापालिकेत सध्या ४० रुग्णवाहिका कार्यरत आहेत. बुधवारी पुन्हा २५ रुग्णवाहिका नागरिकांच्या सेवेत रुजू झाल्या. त्यामुळे आता रुग्णवाहिकांची संख्या ६५ झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिकेत सध्या ४० रुग्णवाहिका कार्यरत आहेत. बुधवारी पुन्हा २५ रुग्णवाहिका नागरिकांच्या सेवेत रुजू झाल्या. त्यामुळे आता रुग्णवाहिकांची संख्या ६५ झाली आहे. गेल्या काही दिवसात रुग्णांची संख्या वाढल्यामुळे रुग्णवाहिकेची कमतरता जाणवत होती. महापौर व आयुक्त यांनी कोरोनाचा वाढता उद्रेक लक्षात घेता शहरातील नागरिकांसाठी जास्तीच्या रुग्णवाहिका घेण्याचे निर्देश दिले होते. बुधवारी स्थायी समिती अध्यक्ष पिंटू झलके आणि मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी हिरवी झेंडी दाखवून रुग्णवाहिका नागरिकांच्या सेवेत रुजू केल्या.
अतिरिक्त आयुक्त राम जोशी, उपायुक्त निर्भय जैन, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेन्द्र बर्हीरवार, सहा. आरोग्य अधिकारी डॉ. विजय जोशी, परिवहन व्यवस्थापक शकील नियाजी, प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे मोटर वाहन निरीक्षक सी.एच.जमधाडे व संजय फेंडारकर, मनपा परिवहन विभागाचे रवींद्र पागे, अरुण पिपुरडे आदी उपस्थित होते. आयुक्तांच्या निर्देशानुसार कोरोना बाधितांसाठी प्रत्येक झोनमध्ये चार रुग्णवाहिका उपलब्ध करण्यात येणार आहे. कोविड केअर सेंटर आणि मनपा मुख्यालयात देखील रुग्णवाहिका उपलब्ध राहतील. गरजेनुसार कोरोना बाधितांसाठी झोन कार्यालयामध्ये फोन करून रुग्णवाहिका मागविता येईल. पूर्वी मनपाकडे २० रुग्णवाहिका होत्या मागच्या आठवड्यात त्यांची संख्या वाढवून ४० करण्यात आली.यात पुन्हा २५ अॅम्ब्युलन्सची भर पडली आहे. मनपा आयुक्तांनी रुग्णवाहिकेमध्ये पोर्टेबल ऑक्सिजन सिलेंडर, वाहन चालकासाठी मास्क, हँड ग्लोव्ज (हात मोजे), सॅनिटायझर स्ट्रो ची व्यवस्था करण्याचे निर्देश दिले. ही रुग्णवाहिका नागरिकांसाठी २४ तास उपलब्ध राहील.
विनामूल्य मिळेल रुग्णवाहिका
कोविडचा प्रकोप वाढल्यामुळे रुग्णवाहिकेची कमतरता लक्षात घेता रुग्णांसाठी ६५ अॅम्ब्युलन्सची व्यवस्था करण्यात आली आहे. ही रुग्णवाहिका नागरिकांना विनामूल्य उपलब्ध करुन दिली जाईल. यासाठी संबंधितांनी झोन कार्यालयामध्ये संपर्क साधावा, असे आवाहन पिंटू झलके यांनी केले आहे.