खासगीच्या १८७६ खाटांचे मनपाचे स्वप्न भंगणार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2020 09:12 PM2020-08-20T21:12:35+5:302020-08-20T21:17:30+5:30
मध्यम व गंभीर लक्षणे असलेल्या रुग्णांना खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार मिळावेत यासाठी महानगरपालिकेने १६ खासगी हॉस्पिटलला पूर्णत: कोविड हॉस्पिटल करण्यास मान्यता दिली. १८७६ खाटा उपलब्ध होणार असल्याचे सांगून आपली पाठही थोपटून घेतली. परंतु गुरुवारी यातील काही मोठ्या हॉस्पिटलशी संपर्क साधल्यावर प्रत्यक्ष स्थिती वेगळी असल्याचे समोर आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मध्यम व गंभीर लक्षणे असलेल्या रुग्णांना खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार मिळावेत यासाठी महानगरपालिकेने १६ खासगी हॉस्पिटलला पूर्णत: कोविड हॉस्पिटल करण्यास मान्यता दिली. १८७६ खाटा उपलब्ध होणार असल्याचे सांगून आपली पाठही थोपटून घेतली. परंतु गुरुवारी यातील काही मोठ्या हॉस्पिटलशी संपर्क साधल्यावर प्रत्यक्ष स्थिती वेगळी असल्याचे समोर आले. कोविड रुग्णांसाठी खासगीच्या या खाटांचे स्वप्न भंगण्याची अधिक शक्यता असल्याचे दिसून आले.
नागपूर जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. बुधवारी मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी खासगी हॉस्पिटलसाठी स्वतंत्र आदेश काढून त्यांना कोविड हॉस्पिटल म्हणून मान्यता दिली. शासनाच्या परिपत्रकानुसार या हॉस्पिटलमध्ये ८० टक्के खाटा आरक्षित ठेवल्या जातील व शासनाने निर्धारित केलेल्या दरानुसारच बिल आकारले जाईल, असेही स्पष्ट केले. यामुळे नागपूरकरांना काहीसा दिलासा मिळाला. परंतु प्रत्यक्षात स्थिती वेगळी असल्याचे पुढे आले आहे. विशेष म्हणजे, मनपावर विश्वास ठेवत गुरुवारी काही रुग्णांनी या हॉस्पिटलमध्ये धाव घेतली. परंतु कोविड हॉस्पिटल सुरूच झाले नसल्याचे तर काहींना जुन्याच खाटा असून त्याही फुल्ल असल्याचा अनुभव आला.
खाटा वाढविणे शक्य नाही
मनपानुसार ऑरेंज सिटी हॉस्पिटल अॅण्ड रिसर्च सेंटर, सावरकर चौक येथे कोविड रुग्णांसाठी १५० खाटा असल्याचे सांगण्यात येते. या संदर्भातील हॉस्पिटलचे संचालक डॉ. अनुप मरार यांना विचारल्यावर ते म्हणाले, हॉस्पिटलच्या एकूण खाटा १५० आहेत. यावर सध्या ५४ नॉनकोविड रुग्ण उपचार घेत आहेत, तर ३८ खाटा कोविडसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. कोविड रुग्णांना भरती करण्यासाठी जे नियम आहेत त्यानुसार यापेक्षा जास्त खाटा वाढविता येत नाही. खाटा वाढविण्यासाठी रुग्णालयाशेजारी असलेली वसाहत व फ्लॅट स्कीम शासनाला रिकामी करावी लागेल. याची माहिती मनपा प्रशासनाला देण्यात आली आहे.
शंकरनगर चौकातील हॉस्पिटल अद्याप नॉनकोविड
वोक्हार्ट हॉस्पिटलच्या सुजाता यांनी सांगितले, शंकरनगर चौकातील वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये ११८ खाटांमधील ८२ खाटा रुग्णसेवेत आहेत. यातही ५२ खाटांवर नॉनकोविड रुग्ण उपचार घेत आहेत. यातील काही गंभीर असून, त्यांना लगेच ‘डिस्चार्ज’ देण शक्य नाही. या हॉस्पिटलमध्ये जास्तीत जास्त २० खाटांवर कोविड हॉस्पिटल तयार करण्याचा विचार आहे. तूर्तास तरी येथे कोविड रुग्णांवर उपचार सुरू नाही.
मानकापूरचे हॉस्पिटल अद्याप सुरू नाही
मानकापूर येथील अॅलेक्सिस हॉस्पिटलच्या अधिकाऱ्यांशी बोलल्यावर त्यांनी नाव न लिहिण्याच्या अटीवर सांगितले, मनपा प्रशासनाने २०० खाटांवर कोविड हॉस्पिटल करण्यास सांगितले, परंतु प्रत्यक्षात ते शक्य नाही. नॉनकोविड रुग्णांना कुठे ठेवणार, हा प्रश्न आहे. कोविड रुग्णांसाठी सध्याच्या स्थितीत २९ खाटा देण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे.
कस्तूरचंद पार्कजवळील हॉस्पिटललाही होणार उशीर
कस्तूरचंद पार्कजवळ असलेल्या किंग्जवे हॉस्पिटलचे जनसंपर्क अधिकारी यांनी ‘लोकमत’ ला सांगितले, तूर्तास कोविड हॉस्पिटल सुरू केले नाही. २२८ खाटांवर कोविड हॉस्पिटल सुरू करणे अशक्य आहे. सध्या कोविड रुग्णांसाठी एक विंग तयार केली जात आहे. यात किती खाटा असतील, ते आता सांगता येणार नाही.