नागपुरातील कुख्यात साहिलच्या बंगल्यावर मनपाचा हातोडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2020 09:20 PM2020-08-12T21:20:49+5:302020-08-12T21:30:02+5:30
मशिदीच्या जमिनीवर कब्जा करून बनविण्यात आलेल्या कुख्यात साहिल सय्यद याच्या अवैध बंगल्यावर महापालिकेच्या अतिक्रमण दस्त्याने जेसीबी लावून तोडायला सुरवात केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मशिदीच्या जमिनीवर कब्जा करून बनविण्यात आलेल्या कुख्यात साहिल सय्यद याच्या अवैध बंगल्यावर महापालिकेच्या अतिक्रमण दस्त्याने जेसीबी लावून तोडायला सुरवात केली आहे. गुन्हे शाखेद्वारे साहिलच्या अवैध निर्माण कार्याची रिपोर्ट दिल्यानंतर महापालिकेने ही कारवाई केली आहे. कुख्यात संतोष आंबेकर याच्यानंतर शहरात गुन्हे शाखेच्या पुढाकाराने गुंडांचे घर जमीनदोस्त करण्यात येत असल्याचे दुसरे प्रकरण आहे. या कारवाईमुळे गुंडांमध्येसुद्धा दहशत पसरली आहे.
साहिलने मानकापूर येथील बगदादियानगर येथे आलिशान बंगला बनविला होता. ३ हजार चौरस फूट जागेवर बंगला होता. बगदादियानगर येथे वक्फ बोर्डाची १६ एकर जमीन आहे. या जमिनीचे मूळ मालक संतरंजीपुरा येथील मोठी मशीद आहे. याच जमिनीवर साहिलचा बंगला व २५० हून अधिक प्लॉट आहेत. वक्फच्या जमिनीची विक्री होऊ शकत नाही. असे असतानाही साहिलने बनावट कागदपत्रांद्वारे जमिनीची खरेदी करून २०१३ मध्ये बंगल्याचे निर्माण काम सुरू केले होते. त्याने काही लोकांनाही तिथे प्लॉट उपलब्ध करून दिले. बडी मशीद कमिटीने २०१६ मध्ये याची तक्रारी मानकापूर पोलीस व नासुप्रला केली होती. नासुप्रच्या अधिकाऱ्यांनी कारवाई न करता, तक्रारक र्त्यांचे तोंड बंद करण्यासाठी धमकी दिली. पोलिसांनी साहिलच्या इशाऱ्यावर मशिदीचे अध्यक्ष व सचिवावर गुन्हा दाखल केला. त्यांना त्या जमिनीवर येण्यास निर्बंध घातले. साहिलची नेता व अधिकाऱ्यांमध्ये ओळख असल्याने बडी मशीद कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी न्यायाची अपेक्षाच सोडली होती.
‘व्हाईट कॉलर क्रिमिनल’ला धडा शिकविण्यासाठी पोलीस आयुक्त डॉ. बी. के. उपाध्याय यांनी सुरू केलेल्या मोहिमेदरम्यान एलेक्सिस प्रकरण समोर आले. पोलीस आयुक्तांच्या निर्देशानुसार एलेक्सीस प्रकरणाची चौकशी सुरू केली. त्यानंतर साहिलच्या गुन्ह्यांचे पत्ते उघडणे सुरू झाले. जमिनीवर कब्जा करणे, ब्लॅकमेलिंग, अधिकाऱ्यांच्या बदल्या, सरकारी काम करून देणे आदी माध्यमातून कोट्यवधी रुपयांची संपत्ती जमविल्याचा खुलासा झाला. गुन्हे शाखेच्या भूमिकेमुळे मशीद कमिटीला न्याय मिळेल अशी अपेक्षा निर्माण झाली. त्यांनी गुन्हे शाखेचे डीसीपी गजानन राजमाने यांच्याकडे तक्रार केली.
पोलिसांच्या तपासात साहिलने वक्फ बोर्डाच्या जमिनीवर अवैध कब्जा करून बंगला बांधल्याचा खुलासा झाला. त्या आधारावर २५ जुलै रोजी मानकापूर पोलीस ठाण्यात साहिल सय्यद, इस्माईल खान, मनसब खान व शेख इस्माईल शेख चांद यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. साहिलने बंगला बांधण्यासाठी नासुप्र व मनपाकडून कुठलीही परवानगी घेतली नव्हती. पोलिसांनी मनपा प्रशासनाला साहिलचे अवैध निर्माण असल्याची जाणीव करून दिली. मंगळवारी साहिलला नोटीस देण्यात आली. त्याच आधारे बुधवारी सकाळी मनपाच्या अतिक्रमण दस्त्याने बंगला तोडण्यास सुरुवात केली.
नासुप्रच्या अधिकाऱ्यावर बनविला दबाव
नासुप्रजवळ २०१६ मध्ये साहिलच्या अवैध बांधकामाची तक्रार आली होती. तरीही नासुप्रच्या अधिकाऱ्यांनी कारवाई केली नाही. सूत्रांच्या माहितीनुसार साहिलने नासुप्रच्या अधिकाऱ्यांचे खिसे गरम केले होते. नेत्यांच्या माध्यमातून दबावही बनविला होता. साहिलमुळे पीडित असलेल्यांनी नासुप्रच्या अधिकाºयांवरही कारवाई करण्याची मागणी केली आहे. साहिलची नंदनवनमध्ये दाखल जमीन फसवणुकीच्या प्रकरणात कारागृहात रवानगी केली आहे. या प्रकरणात त्याचा भाऊ परवेज सय्यद फरार आहे.
‘लोकमत’ने उचलले होते प्रकरण
साहिलच्या बंगल्याच्या अवैध निर्माणाचे वृत्त ‘लोकमत’ ने दिले होते. त्यानंतर पोलीस सतर्क झाले होते. या बंगल्याची किंमत अडीच कोटीपेक्षा जास्त आहे. बंगल्याची भव्यता व नेत्यांचे येणे-जाणे असल्याने हा परिसर चर्चेत होता. सूत्रांच्या मते, गुन्हे शाखेच्या भूमिकेची माहिती लागल्याबरोबर मनपात साहिलचे पाठीराखे अधिकारी फाईल दाबत होते. त्यांची इच्छा काही दिवसांसाठी कारवाई थांबविण्याची होती.
दहशत संपली, विश्वास वाढला
गुंडांना संपविण्यासाठी गुन्हे शाखेने जी भूमिका घेतली आहे, तिची जनतेमध्ये भरपूर चर्चा आहे. आतापर्यंत पोलीस केवळ प्रतिबंधात्मक कारवाई करीत होते. या कारवाईचा परिणाम वर्ष, दोन वर्षे राहत होता. कारागृहातून परतल्यानंतर गुंड पुन्हा सक्रिय होत होते. पोलिसांच्या या भूमिकेमुळे गुंडांची दहशत संपत आहे व जनतेत विश्वास निर्माण होत आहे.
कारवाईदरम्यान बघ्यांची गर्दी
बगदादियानगरात मनपाकडून कारवाई होत असताना, पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. तरीही लोकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. साहिल सय्यदच्या गुन्ह्याचा पर्दाफाश झाल्याने नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चेला पेव फुटले होते.
१० ऑगस्टला दिली नोटीस
मनपाच्या मंगळवारी झोनने २४ तासात बंगला पाडण्यासाठी १० आॅगस्टला नोटीस दिली. ११ ऑगस्टला २४ तासाचा कालावधी संपल्यानंतर मालमत्ताधारकांनी बांधकाम पाडण्याबाबत कुठलीही कारवाई केली नाही. त्यामुळे मनपाचे पथक पोहचताच मालमत्ताधारकांच्य कुटुंबीयांनी नागरिकांना गोळा करून कारवाईचा विरोध केला. परंतु मानकापूर पोलिसांनी विरोधकांना झुगारून लावले. कारवाई थांबणार नाही, हे लक्षात आल्यावर साहिलच्या कुटुंबीयांनी घरातील सामान काढायला सुरुवात केली.
ले-आऊटमधील सर्वच बांधकाम अवैध
साहिलने बडी मस्जीदच्या १६ एकर जमिनीवर २८८ भूखंड पाडले आहे. या भूखंडधारकांनी मनपा अथवा नासुप्रची कुठलीही परवानगी घेतली नाही. भूखंडधारकांना साध्या कागदावर करारनामा करून विकण्यात आले. या ले-आऊटमधील सर्वच बांधकाम अनधिकृत असून, त्यांना सुद्धा नोटीस देऊन कारवाई करण्यात येणार आहे.
कारवाईत यांचे सहकार्य
मनपा आयुक्तांच्या निर्देशानुसार उपायुक्त (अतिक्रमण) महेश मोरोणे, मंगळवारी झोनचे सहायक आयुक्त हरीश राऊत, कार्यकारी अभियंता गिरीश वासनिक, उपअभियंता कमलेश चव्हाण, कनिष्ठ अभियंता मनोज रंगारी, राजेश वानखेडे, सहायक अधीक्षक (अतिक्रमण) संजय कांबळे यांच्यासह मनपाचे सहायक स्थापत्य अभियंता दीपक जांभुळकर, पी.के.गिरी, महेंद्र जनबंधू, प्रशांत सोनकुसरे, अतिक्रमण विभागाचे सुनील बावणे, बी.बी.माळवे, सुरेश डहाके यांचे सहकार्य लाभले.