नगरसेवकाने आपटली फाईल, नाराज आयुक्त गेले निघून!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 08:21 PM2020-12-30T20:21:15+5:302020-12-30T20:27:10+5:30
NMC Standing commitee miting, nagpur news भाजपचे नगरसेवक संजय चवरे यांनी फाईल टेबलवर आपटून रोष व्यक्त केला. यामुळे नाराज झालेले मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. बैठकीतून निघून गेले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : प्रभागातील विकास कामे वर्षभरापासून ठप्प असल्याने नगरसेवकांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत असल्याचा मुद्दा स्थायी समितीच्या बैठकीत बुधवारी सदस्यांनी उपस्थित केला. कामे कधी सुरू होणार, असा सवाल केला. यावर प्रशासनाकडून ठोस आश्वासन मिळत नसल्याने सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. भाजपचे नगरसेवक संजय चवरे यांनी फाईल टेबलवर आपटून रोष व्यक्त केला. यामुळे नाराज झालेले मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. बैठकीतून निघून गेले.
विशेष म्हणजे मंगळवारी आयुक्त उपस्थित नसल्याने समितीची बैठक स्थगित करून आयुक्तांच्या उपस्थितीत बैठक घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार बुधवारी आयुक्तांच्या उपस्थितीत स्थायी समितीचे अध्यक्ष विजय झलके यांनी बैठकीला सुरुवात करताच सदस्यांनी विकास कामांचा मुद्दा उपस्थित केला. यावर आयुक्तांनी मनपावर ७०० कोटींचे दायित्व असल्याचे सांगितले. सार्वजनिक बांधकाम विभागाचे ३०० कोटी, सार्वजनिक आरोग्य व अभियांत्रिकी विभागाकडे २३० कोटी, सातव्या वेतन आयोगाचे १०० कोटी व अन्य ७० कोटींच्या देणीचा यात समावेश आहे. जुणी देणी असल्याने नवीन कामांना निधी उपलब्ध होणार नाही, अशी भूमिका आयुक्तांनी मांडली.
बैठकीत ठप्प असलेल्या विकास कामांवर कोणताही निर्णय न होता आयुक्त निघून गेल्याने सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. निधी उपलब्ध होत नाही तोपर्यंत प्रशासकीय प्रस्तावांना मंजुरी न देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष विजय झलके यांनी दिली.
देणीचा अहवाल सादर करा
तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सुरुवातील ८०० कोटींची देणी असल्याचे सांगितले होते. नंतर २१०० कोटींचे दायित्व असल्याचे सांगितले होते. तर आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी ७०० कोटींची देणी असल्याचे सांगितले. यामुळे मनपाला नेमकी किती देणी द्यावयाची आहे. याचा बिलाच्या माहितीसह लेखाजोखा ४ जानेवारीपर्यत सादर करण्याचे निर्देश वित्त विभागाला विजय झलके यांनी दिले.
प्रभागातील विकास कामे व्हावी
वर्षभरापासून प्रभागातील विकास कामे ठप्प आहेत. नगरसेवकांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. आर्थिक अडचण दरवर्षीच होती. परंतु विकास कामे सुरू होती. प्रभागातील आवश्यक विकास कामे व्हावी, हीच नगरसेवकांची भावना असून ती रास्त असल्याचे विजय झलके यांनी सांगितले.
वादाची ठिणगी तर नाही ना ?
कार्यादेश झालेल्या फाईल रोखल्यावरून पदाधिकारी व तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यात वादाची ठिगणी पडली होती.
वाद विकोपाला गेला होता. मुंढे यांची बदली झाल्यानंतर पदाधिकारी व आयुक्तांतील वाद संपुष्टात येईल. अशी अपेक्षा होती. मात्र बुधवारी स्थायी समितीच्या बैठकीतून आयुक्त निघून गेल्याने पदाधिकारी व आयुक्तांतील वादाला पुन्हा सुरुवात झाल्याचे संकेत आहेत.