उपराजधानीत नगरसेवक निघाले फवारणीला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2020 10:01 AM2020-03-30T10:01:09+5:302020-03-30T10:02:40+5:30

‘कोरोना'चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेने दहाही झोनमध्ये निर्जंतुकीकरण फवारणी सुरू केली आहे. काही नगरसेवकांनीही यात पुढाकार घेतला आहे.

Corporator left in the sub-capital to spray! | उपराजधानीत नगरसेवक निघाले फवारणीला!

उपराजधानीत नगरसेवक निघाले फवारणीला!

Next
ठळक मुद्दे प्रभाग निर्जंतुकीकरण करण्यासाठी पुढाकार बेहते यांनी स्वत:च्या पाठीवर हॅन्डपंप घेऊन फवारणी केली

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ‘कोरोना'चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेने दहाही झोनमध्ये निर्जंतुकीकरण फवारणी सुरू केली आहे. काही नगरसेवकांनीही यात पुढाकार घेतला आहे. फवारणीसाठी अग्निशमन विभागाच्या गाडीची प्रतीक्षा न करता प्रभाग ३६ चे नगरसेवक लहुकुमार बेहते यांनी स्वत: च्या पाठीवर हॅन्डपंप घेऊन प्रभागातील वस्त्यात फवारणीला सुरुवात केली आहे. नगरसेवकांनी पुढाकार घेतल्याने प्रभागातील युवकांचाही त्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. महापालिकेने शहरातील सर्वच भागात निर्जंतुकीकरण फवारणी सुरू केली आहे. परंतु एका प्रभागात फवारणीला चार ते पाच दिवस लागतात. लक्ष्मीनगर झोन क्षेत्रात पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने अधिक सतर्कता बाळगणे गरजेचे आहे. याचा विचार करता लहुकुमार बेहते यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह पुढाकार घेत हॅन्डपंपाने फवारणीला सुरुवात केली. त्रिमूर्तीनगर भागातील आदर्श कॉलनी, भुजबळ सोसायटी, गुडधे ले-आऊ ट, गेडाम प्रियदर्शनी कॉलनी, गेडाम ले-आऊ ट आदी वस्त्यात शनिवारी फवारणी केली. तर रविवारी जयप्रकाशनगर, इंद्रप्रस्थ कॉलनी, शिवनगर, एमआयजी कॉलनी, भामटी आदी वस्त्यात फवारणी केली. बेहते यांचा सेवाभाव प्रशंसनीय आहे. सध्याची परिस्थिती लक्षात घेता अन्य नगरसेवकांनीही आपल्या प्रभागासाठी असाच पुढाकार घेण्याची गरज आहे. प्रभाग १८ चे नगरसेवक बंटी शेळके यांनीही हॅन्डपंप घेऊन घराघरात फवारणी करून परिसर निर्जंतूक केला. प्रभागातील युवकही यात सहभागी झाले आहेत. याच प्रभागाचे नगरसेवक व माजी महापौर प्रवीण दटके यांनी आपल्या परिसरात फ वारणी करून घेतली व परिसर निर्जंतूक केला. आरोग्य सभापती वीरेंद्र कुकरेजा यांनी प्रभाग १ मध्ये फवारणी करून घेतली. प्रभाग २३ मध्ये दुनेश्वर पेठे व परिवहन सभापती बाल्या बोरकर यांनी प्रभागातील वर्दळीच्या भागात फवारणी करून घेतली. उर्वरित भागातही फवारणी केली जाणार असल्याचे दुनेश्वर पेठे यांनी सांगितले. नागरिकांची मागणी वाढल्याने फवारणीसाठी अनेक नगरसेवकांनी आरोग्य विभागाकडे मागणी केली आहे.
स्लम भागातील लोकांना धान्य वाटप लॉकडाऊ नमुळे न झाल्याने कामगार अडचणीत आले आहेत. काम बंद असल्याने त्यांच्यापुढे गंभीर समस्या निर्माण झाली आहे. याचा विचार करता प्रभाग ३६ मधील स्लम भागातील लोकांना धान्य व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करणार असल्याची माहिती
लहु कुमार बेहते यांनी दिली. तसेच भाजीपाल्याचे भाव वाढत असल्याने त्रिमूर्तीनगर भागात तीन भाजीपाला विक्री केंद्र सुरू करणार असल्याचे बेहते यांनी सांगितले.

 

Web Title: Corporator left in the sub-capital to spray!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.