नागपूर महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत नगरसेवकाने माईक भिरकावला; अजेंडा फेकला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2017 07:32 PM2017-12-08T19:32:32+5:302017-12-08T19:34:02+5:30
विकास निधी वाटपात भेदभाव केला जातो, असा आरोप करीत काँग्रेसचे नगरसेवक रमेश पुणेकर यांनी शुक्रवारी सर्वसाधारण सभेत महापालिका प्रशासन व सत्तापक्षाला धारेवर धरले. उपस्थित केलेल्या प्रश्नाला समाधानकारक उत्तर न मिळाल्याने पुणेकर यांनी रागाच्या भरात हातातील माईक भिरकावला.
आॅनलाईन लोकमत
नागपूर : विकास निधी वाटपात भेदभाव केला जातो, असा आरोप करीत काँग्रेसचे नगरसेवक रमेश पुणेकर यांनी शुक्रवारी सर्वसाधारण सभेत महापालिका प्रशासन व सत्तापक्षाला धारेवर धरले. उपस्थित केलेल्या प्रश्नाला समाधानकारक उत्तर न मिळाल्याने पुणेकर यांनी रागाच्या भरात हातातील माईक भिरकावला. तसेच अजेंडा फेकून सभागृहाबाहेर निघून केले. काँग्रेसचे नगरसेवक नितीन साठवणे यांनी त्यांना पाठिंबा दिला. मात्र इतर कुणीही त्यांच्या मदतीला आले नाही.
प्रश्नोत्तराच्या तासात पुणेकर यांनी निधी वाटपाचा मुद्दा उपस्थित केला. स्थायी समिती नगरसेवक बघून निधी वाटप करते. विरोधीपक्षाच्या नगरसेवकांच्या फाईलला मंजुरी मिळत नाही. लोकांनी निवडून दिले आहे, त्यांच्या समस्या सोडविण्याची नगरसेवकांची जबाबदारी आहे. यासाठी निधीचे समान वितरण व्हावे, अशी मागणी त्यांनी केली. भाजपाचे नगरसेवक प्रदीप पोहाणे निधी वाटपातील मनमानी विरोधात बोलण्यासाठी उभे झाले. मात्र त्यांना गप्प करण्यात आले. निधी वाटपाच्या प्रश्नावर उत्तर देण्यासाठी शहर कार्यकारी अभियंता मनोज तालेवार आले. यावर पुणेकर यांनी आक्षेप घेत शहर अभियंत्यांचा निधी वाटपाशी काय संबंध ? असा प्रश्न उपस्थित केला. जबाबदार अधिकाऱ्यांना उत्तर देण्यास सांगावे. नाहीतर महापालिकेचा चपराशी वा कोणताही कर्मचारी उत्तर देईल, असे त्यांनी निदर्शनास आणले.
दटके, जोशीची मंजुरी आणा !
विकास कामांच्या मंजूर फाईल स्वाक्षरीसाठी अपर आयुक्त रिजवान सिद्दीकी यांच्याकडे जातात. परंतु ते फाईलवर स्वाक्षरी न करता यासाठी प्रवीण दटके , संदीप जोशी यांचे मंजुरीपत्र आणण्याचा सल्ला देतात. सत्तापक्षाची सहमती असेल तरच निधी वाटप होणार का?, त्यांनी सहमती दिल्यावर निधी कसा उपलब्ध होतो. दुसरीकडे स्थायी समिती अध्यक्षांनी आपल्या प्रभागात १३ कोटींचा निधी मंजूर केला आहे. मात्र प्रभाग क्रमांक २० मध्येसुद्धा नागरिकांच्या समस्या असल्याची भूमिका पुणेकर यांनी मांडली.