नगरसेवक तिवारींच्या घरावर हल्ला
By Admin | Published: July 2, 2016 03:06 AM2016-07-02T03:06:43+5:302016-07-02T03:06:43+5:30
काँग्रेसचे नगरसेवक गुड्डू ऊर्फ योेगेश तिवारी यांच्या घरावर कुख्यात गुंड आशिष ऊर्फ टकल्या फ्रान्सिस याने आपल्या ४ ते ५ सशस्त्र साथीदारांसह शुक्रवारी सकाळी हल्ला चढवला.
इमामवाड्यात तणाव : कुख्यात टकल्या फ्रान्सिस आणि साथीदार फरार
नागपूर : काँग्रेसचे नगरसेवक गुड्डू ऊर्फ योेगेश तिवारी यांच्या घरावर कुख्यात गुंड आशिष ऊर्फ टकल्या फ्रान्सिस याने आपल्या ४ ते ५ सशस्त्र साथीदारांसह शुक्रवारी सकाळी हल्ला चढवला. प्रसंगावधान राखत तिवारी यांनी घरातून बाहेर निघण्याचे टाळल्याने ते बचावले.
उंटखाना (इमामवाडा) प्रभागाचे काँग्रेसचे नगरसेवक असलेले तिवारी आज सकाळी ११.३० च्या सुमारास आपल्या घरी जेवण करीत होते. खालच्या माळ्यावर त्यांचे मोठे बंधू शैलेष तिवारी आणि अन्य नातेवाईक होते. अचानक कुख्यात टकल्या फ्रान्सीस शिवीगाळ करीत तिवारी यांच्या घरावर चालून आला. तिवारी यांच्या कथनानुसार, त्याच्या हातात माऊजर होते.
अन्य एकाजवळ पिस्तूल तर, अन्य तीन ते चार जणांजवळ सब्बल आणि तलवार होती. त्यांनी गुड्डू यांना उद्देशून शिवीगाळ केल्याने शैलेष तिवारींनी त्यांना गेटजवळ अडवले. बराच वेळ आरोपी शिवीगाळ करीत होते. तेवढ्यात तेथे एक स्कूल आॅटो आला.
एका हल्लेखोराने आॅटोवर तलवार मारल्याने आॅटोची काच तडकली. दरम्यान, आरडाओरड ऐकून आजूबाजूची मंडळी गोळा झाल्याने हल्लेखोरांनी पळ काढला. या घटनेनंतर परिसरात उलटसुलट चर्चेला उधाण आले. हल्लेखोरांनी हवेत गोळी झाडल्याचेही वृत्त पसरले. त्यानंतर गुड्डु तिवारी आपल्या कार्यकर्त्यांसह इमामवाडा पोलीस ठाण्यात पोहचले. त्यांनी तेथे टकल्या फ्रान्सिसविरुद्ध तक्रार नोंदवली.
खंडणीतून झाला हल्ला
नगरसेवक तिवारी बचावले
खतरनाक टकल्या मोकाट
टकल्या फ्रान्सिस एक खतरनाक गुन्हेगार म्हणून ओळखला जातो. इमामवाडा पोलीस ठाण्यात काही जणांसोबत त्याचे मधूर संबंध असल्याने तो बिनधास्त या भागात फिरतो आणि खंडणी वसूल करतानाच गुन्हेही करतो. त्याच्यावर २००७ ते २०१६ या कालावधीत एकूण एक डझनपेक्षा जास्त गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यात हत्या, हत्येचा प्रयत्न, लुटमार आदी गुन्ह्यांचा समावेश आहे. पोलिसांनी नगरसेवक गुड्डू तिवारी यांचे बंधू शैलेश तिवारी यांच्या तक्रारीवरून आरोपी आशिष रॉबर्ट उर्फ टकल्या फ्रान्सिस, मारोती दुधमोगरे, सोनू बोंद्रे आणि त्यांच्या एका साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल केला. वृत्त लिहिस्तोवर आरोपीला अटक झालेली नव्हती.
बाहेर तणाव, ठाणेदार कॅबिनमध्ये
या घटनेमुळे इमामवाडा परिसरात मोठा तणाव निर्माण झाला. मोठ्या संख्येत जमाव ठाण्यात पोहचला. काही जण चिथावणीची भाषा वापरत होते. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत काही पोलीस कर्मचारी जमावाला शांत करीत होते. मात्र, ठाण्यासमोर मोठा जमाव असताना ठाणेदार आपल्या कक्षात बसून होते. तत्पूर्वी ठाणेदार शेखर तावडे आणि सहायक निरीक्षक मोहन अतुलकर यांनी काही कॅमेरामन आणि पत्रकारांशी असभ्य वर्तन केल्याची तक्रार आहे. गुंडांपुढे नांगी टाकणारे इमामवाडा पोलीस पत्रकार, छायाचित्रकारांशी अरेरावीने वागत असल्याचे पाहूनही जमावाच्या भावना काही वेळेसाठी तीव्र झाल्या होत्या. काही पत्रकारांनीच जमावाला शांत केले. सहायक आयुक्त रवींद्र कापगते यांनी पोलीस ठाण्यात धाव घेऊन घटनेची माहिती जाणून घेतली. (प्रतिनिधी)