फाईल मंजुरीसाठी नगरसेवकांची धावपळ

By admin | Published: May 29, 2016 03:07 AM2016-05-29T03:07:00+5:302016-05-29T03:07:00+5:30

पुढील वर्षाच्या सुरुवातीला असलेली महापालिकेची निवडणूक विचारात घेता प्रभागातील कामे तातडीने मार्गी लागावी. यासाठी नगरसेवक कामाला लागले आहेत.

Corporator's runway for file sanction | फाईल मंजुरीसाठी नगरसेवकांची धावपळ

फाईल मंजुरीसाठी नगरसेवकांची धावपळ

Next

विरोधी सदस्यांची कोंडी : कामे करण्यासाठी चारच महिने
नागपूर : पुढील वर्षाच्या सुरुवातीला असलेली महापालिकेची निवडणूक विचारात घेता प्रभागातील कामे तातडीने मार्गी लागावी. यासाठी नगरसेवक कामाला लागले आहेत. प्रभागातील रस्ते, सिवर लाईन,पावसाळी नाल्या व उद्यान अशी कामे डिसेंबरपूर्वी पूर्ण करावयाची असल्याने नगरसेवकांची फाईल मंजुरीसाठी महापालिकेत धावपळ सुरू आहे.
निवडणुकीपूर्वीचे वर्ष असल्याने डिसेंबरपूर्वी विकास कामे व्हावी. या हेतूने स्थायी समितीचे अध्यक्ष बंंडू राऊ त यांनी अनेक वर्षानंतर मार्च महिन्यात महापालिकेचा अर्थसंकल्प सादर केला होता. एप्रिलपासून अर्थसंकल्पातील प्रस्तावित कामांना सुरुवात करण्याचा त्यांचा विचार होता. परंतु आयुक्तांनी नवीन अर्थसंकल्पांला मंजुरी देण्याला विलंब केला. त्यामुळे दीड-दोन महिन्याचा कालावधी असाच निघून गेला. स्थायी समितीने प्रभागातील कामांना मंजुरी दिली. परंतु अर्थसंकल्पाला मंजुरी मिळण्याला विलंब झाल्याने अद्याप या कामांना सुरुवात झालेली नाही.
स्थायी समितीचे माजी अध्यक्ष रमेश सिंगारे यांच्या कार्यकाळात मंजुरी दिलेली ३०० कोटींची कामे निधी अभावी सुरू करता आलेली नव्हती. उपलब्ध निधीनुसार ही कामे मार्गी लावली जात आहेत.
यातील अनेक कामे प्रलंबित राहण्याची शक्यता आहे. सभागृहात अर्थसंकल्पाला मंजुरी दिल्यानंतर सभेचे इतिवृत्त तयार करणे, अर्थसंकल्पात सुचविण्यात आलेले बदल यात आयुक्तांची मंजुरी मिळण्याला विलंब झाला.(प्रतिनिधी)

विरोधी सदस्यांची कोंडी
राज्य सरकारने एलबीटी रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर महापालिकेची आर्थिक स्थिती बिकट झाली. कर्मचाऱ्यांना दर महिन्याला वेतन वेळेवर मिळत नाही. त्यामुळे उपलब्धतेनुसार विकास कामासाठी निधी उपलब्ध करण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे सत्ताधारी भाजप नगरसेवकांची कामे प्राधान्याने मार्गी लागत आहेत. राज्य सरकारकडून पहिल्या टप्प्यात प्राप्त ३५ कोटींच्या ३२ पैकी २८ प्रस्ताव सत्ताधारी नगरसेवकांच्या प्रभागातील मंजूर करण्यात आले होते. सत्ताधाऱ्यांकडून विरोधी सदस्यांची कोंडी केली जात आहे.

चारच महिन्यांचा कालावधी
डिसेंबरमध्ये निवडणूक आचारसंहिता लागू होणार आहे. त्यामुळे प्रभागातील कामे करण्यासाठी सहा महिन्यांचाच कालावधी शिल्लक असला तरी पावसाळ्यातील दोन महिने कामे बंद असतात. त्यामुळे विकास कामांसाठी चारच महिन्यांचा कालावधी शिल्लक असल्याने अनेक नगरसेवकांची चिंता वाढली आहे. चार सदस्यीय प्रभाग पद्धतीत अकार्यक्षम नगरसेवकाला पुन्हा संधी दिल्यास पक्षाच्या इतर तीन सदस्यांना याचा निवडणुकीत फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Web Title: Corporator's runway for file sanction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.