निवृत्तीवेतनातून दिली शववाहिका : डॉ. कांबळे यांचा पुढाकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2019 07:20 PM2019-11-29T19:20:11+5:302019-11-29T19:24:23+5:30
मेडिकलमधून नुकतेच सेवानिवृत्त झालेले माजी कर्करोग विभागाचे प्रमुख डॉ. कृष्णा कांबळे यांनी आपल्या निवृत्तीवेतनातून मेडिकलला शववाहिका उपलब्ध करून दिली. गुरुवारी त्याचा लोकार्पणाचा कार्यक्रम पार पडला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मेडिकल, ट्रॉमा केअर सेंटर व सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये मृत्यू झालेल्या रुग्णांना शवविच्छेदन गृहापर्यंत नेण्याचा प्रवास स्ट्रेचरवरून व्हायचा. उन्ह, पाऊसात मृतदेह वाहून नेताना अडचणीचे व्हायचे. अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा यांनी याबाबत खंत व्यक्त करीत शववाहिका दान करण्याचे आवाहनही केले होते. याची दखल मेडिकलमधून नुकतेच सेवानिवृत्त झालेले माजी कर्करोग विभागाचे प्रमुख डॉ. कृष्णा कांबळे यांनी घेतली. त्यांनी आपल्या निवृत्तीवेतनातून मेडिकलला शववाहिका उपलब्ध करून दिली. गुरुवारी त्याचा लोकार्पणाचा कार्यक्रम पार पडला.
मेडिकलच्या रेडिओथेरपी विभागात आयोजित छोट्याखानी या लोकार्पण कार्यक्रमात मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा, उपअधिष्ठाता डॉ. दीनकर कुंबलकर, वैद्यकीय अधिक्षक डॉ. अविनाश गावंडे, बधिरीकरण विभागाचे प्रमुख डॉ. नरेश तिरपुडे, मेट्रन मालती डोंगरे व डॉ. कृष्णा कांबळे उपस्थित होते.
‘वात्सल्य बुद्धिस्ट हॉस्पिस’ या संस्थेतर्फे त्यांचे वडील मारोतीराव कांबळे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ही शववाहिका दान देत असल्याची माहिती डॉ. कांबळे यांनी दिली. सोबतच दानाचे महत्त्व पटवून देताना ते म्हणाले, शासकीय रुग्णालयांमध्ये बहुतांश रुग्ण गरीब, गावखेड्यातून व दुर्गम भागातून आलेले असतात. येथे त्यांच्यावर उपचारांची सोय होत असलीतरी त्यांना अनेक गोष्टींची मदतीची गरज असते. छोटीशीछोटी मदत त्यांना त्यांच्यावर आलेल्या संकटातून उभे राहण्याचे बळ देते. अशा रुग्णांसाठी काही दान दिल्यास समाजऋण फेडण्याची सर्वोत्तम संधी असते. याकरीताच मेडिकलमध्ये सामाजिक अधीक्षकांचा एक गट तयार करण्यात आला आहे. इच्छुकांनी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी केले.
डॉ. मित्रा यांनी डॉ. कांबळे यांच्या कार्याचे कौतुक करीत केलेल्या दानाबद्दल आभार व्यक्त केले. यावेळी उपस्थित मान्यवरांनीही आपले मनोगत व्यक्त केले. संचालन सामाजिक अधिक्षक श्याम पंजाला यांनी केले तर आभार किशोर धर्माळे यांनी मानले. लोकार्पण कार्यक्रमाला डॉ. कांबळे यांच्या परिवारातील सदस्य उपस्थित होते.