पोलखोलपूर्वीच डागडुजी!

By admin | Published: May 21, 2017 02:11 AM2017-05-21T02:11:40+5:302017-05-21T02:11:40+5:30

शहरातील सिमेंट रोडच्या रस्त्यांबाबत बऱ्याच तक्रारी समोर आल्या आहेत. लोकमतने सुद्धा यावर प्रकाश टाकला.

Correction before Polokhul! | पोलखोलपूर्वीच डागडुजी!

पोलखोलपूर्वीच डागडुजी!

Next

प्रतापनगर चौक सिमेंट रोडचे वास्तव
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरातील सिमेंट रोडच्या रस्त्यांबाबत बऱ्याच तक्रारी समोर आल्या आहेत. लोकमतने सुद्धा यावर प्रकाश टाकला. जनमंच या सामाजिक संघटनेने याची दखल घेत सिमेंट रस्त्याचे आॅडिट करण्यास सुरुवात केली. आतापर्यंत दोन रस्त्यांची पाहणी करून त्यातील त्रुटीकडे प्रशासनाचे लक्ष वेधल्या गेल्या. यातच जनमंचतर्फे प्रतापनगर चौक येथील सिमेंट रोड (रिंग रोड)ची पाहणी शनिवारी सकाळी करण्यात येणार असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे शुक्रवारी रात्रीच या रस्त्यावर पडलेल्या भेगा बुजविण्याचा केविलवाणा प्रयत्न केला गेला. परंतु संपूर्ण रस्त्याचेच काम निकृष्ट असेल तर डागडुजी करणार तरी किती? शनिवारी जेव्हा जनमंचतर्फे या रस्त्याची पाहणी करण्यात आली तेव्हा रस्त्याचे विदारक चित्र पुढे आलेच. नव्या कोऱ्या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत. सिमेंट रोडला भेगा पडल्या. तसेच जागोजागी रेती व माती साचली आहेत. इतकेच नव्हे तर प्रत्येक वळणावरची ‘लेव्हल’ व्यवस्थित झाली नसल्याने वाहनचालकांना आपला जीव मुठीत घेऊनच वाहन चालवावे लागत आहे.
दक्षिण-पश्चिम मतदारसंघातील राणा प्रतापनगर चौकातील नव्याने बांधला जात असलेला सिमेंट रिंग रोड होय. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मतदार संघातील हा महत्त्वाचा रस्ता आहे, हे विशेष. खुद्द मुख्यमंत्र्यांच्याच मतदार संघातील सिमेंट रस्त्यांची ही अवस्था असेल तर शहरातील इतर सिमेंट रस्त्यांचे काय? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
जनमंचचे अमिताभ पावडे यांच्या नेतृत्वात आणि अध्यक्ष अ‍ॅड. अनिल किलोर व प्रा. शरद पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी राणा प्रतापनगर चौकातील सिमेंट रस्त्याची पाहणी करण्यात आली. अमिता पावडे यांनी अतिशय शास्त्रोक्त पद्धतीने सिमेंट रोडची पाहणी केली. इंडियन रोड काँग्रेसचे पुस्तकच त्यांनी सोबत ठेवले होते.
यातील मानकानुसार रस्त्यांची पाहणी केली असता हा रस्ता निकृष्ट दर्जाचा झाल्याचे दिसून येते. प्रतापनगर चौकातून दोन्ही बाजूला जवळपास एक कि.मी. रस्त्याची पाहणी करण्यात आली.


पोलखोलपूर्वीच डागडुजी!

तेव्हा एकच चित्र दिसले ते म्हणजे अतिशय चुकीच्या पद्धतीने झालेले रस्त्याचे काम. रस्त्याचे काम अजून पूर्ण व्हायचे असले तरी मुख्य रस्त्याचे काम झाले आहे. रस्त्यावरून वाहतुकीला सुरुवात होऊन वर्षही झाले नसेल परंतु मुख्य चौकातच सिमेंट रोडला खड्डे पडले आहेत. सिमेंट उडाले असून गिट्टी बाहेर दिसू लागली आहे. रस्त्याच्या बाजूलाच रेती व मातीचे ढीग पडले आहेत. संपूर्ण रस्त्यावर असेच चित्र आहे.
यावेळी सुप्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर, प्रकाश इटनकर, अ‍ॅड. रडके, राम आखरे, कृ.द. दाभोळकर, रमेश बोरकुटे, राजेश किलोर, राजीव जगताप, आशुतोष दाभोळकर, अशोक कामडी, व्ही.आर. सावळकर, प्रमोद पांडे, मोहन पांडे, विठ्ठल जावळकर, विजय जथे, हेमंत पांडे, प्रल्हाद खवसने, मनोहर खोरगडे, हसमुख पटेल, राजीव जगताप, गणेश खर्चे, सुहास खांडेकर, बाबा राठोड, अरुण खंगार, विनोद बोरकुटे, आकाश गायकवाड, दामोदर तिवाडे, राजाभाऊ काळबांडे, नरेश क्षीरसागर, राजीव नानेकर, तात्याराव कांबळे आदी उपस्थित होते.

- अपघात व आरोग्याच्या दृष्टीने घातक
या सिमेंट रस्त्याचे काम अतिशय निकृष्ट झाल्याचे दिसून येत आहे. रस्त्यावर खड्डे पडले असून गिट्टी बाहेर आली आहे. तसेच रस्त्यावरची लेव्हल बरोबर नाही. यामुळे या रस्त्यावर अपघाताची शक्यता वाढली असून आरोग्याच्या दृष्टीनेही नुकसानकारक आहे. संपूर्ण रस्ताच नव्याने तयार करण्याची गरज आहे.
अमिताभ पावडे
जनमंच

घरात पाणी शिरले तर
पोलिसात तक्रार करा
रस्त्यावरील पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी जी व्यवस्था तयार करायला हवी होती, ती व्यवस्थित करण्यात आल्याचे आढळून येत नाही. तेव्हा पावसात नागरिकांच्या घरात पाणी शिरण्याची शक्यता आहे. पावसात घरात पाणी शिरले तर नागरिकांनी थेट पोलिसात तक्रार करावी. जनमंच त्यांना संपूर्ण मदत करेल. तसेच पावसाळा सुरू होण्यास अजून १५ दिवसाचा अवधी आहे. तेव्हा प्रशासनाने ही कामे तातडीने दुरुस्त करून घ्यावीत. आम्ही येथील ड्रेनेज व्यवस्थेबाबत संशोधन करीत आहोत. प्रशासनाने याची गंभीर दखल न घेतल्यास आम्ही आमच्या परीने कारवाई करू.
अ‍ॅड. अनिल किलोर
अध्यक्ष, जनमंच

वळण मार्गावर धोकादायक
मुख्य रिंग रोडवरील राणा प्रतापनगरच्या मुख्य चौकातच वळण मार्गावरील ‘लेव्हल’ व्यवस्थित नसल्याने रस्ता धोकादायक ठरत आहे. कोतवालनगर, सावरकर मार्ग आदी ठिकाणचे वळण मार्गावरील ‘लेव्हल’ जवळपास ४० ते ५० इंचाने कमी आहे. त्यामुळे वाहने वळविताना अपघाताचा धोका असतो.

पावसाचे पाणी कसे वाहून जाणार
पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी सिमेंट रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेली गडर लाईन अनेक ठिकाणी बुजली आहे. तर काही ठिकाणी ती वर खाली आली आहे. त्यामुळे पावसाचे पाणी कसे वाहून जाणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. कोतवालनगरजवळ तर रस्ता इतका उंच झाला आहे की, पावसात रस्त्यावरील पाणी थेट लोकांच्या अंगणात आणि घरात घुसेल अशीही शक्यता निर्माण झाली आहे.

‘पेवर’ केवळ ठेवलेले
सिमेंट रस्त्याच्या बाजूला फुटपाथसाठी जे पेवर लावण्यात आले, ते व्यवस्थित नाहीत. केवळ ते ठेवलेले आहे. त्यामुळे ते सहज निघतात. तसेच हे पेवर अतिशय निकृष्ट दर्जाचे असल्याचे या पाहणी आढळून आलेत.

 

Web Title: Correction before Polokhul!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.