भ्रष्टाचारास कर्मचाऱ्यांचेच अभय
By admin | Published: June 4, 2016 02:50 AM2016-06-04T02:50:55+5:302016-06-04T02:50:55+5:30
जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी गुरुवारी सायंकाळी सिटी सर्व्हे क्रमांक २ मध्ये आकस्मिक पाहणी करीत येथील अनियमितता समोर आणल्याने येथील कर्मचारी दुखावले गेले आहेत.
जिल्हाधिकाऱ्यांच्या विरोधात उतरले कर्मचारी : सिटी सर्व्हेतील कामकाज दिवसभर ठेवले बंद
नागपूर : जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी गुरुवारी सायंकाळी सिटी सर्व्हे क्रमांक २ मध्ये आकस्मिक पाहणी करीत येथील अनियमितता समोर आणल्याने येथील कर्मचारी दुखावले गेले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या या कारवाईच्या विरोधात सिटी सर्व्हेतील कर्मचारी रस्त्यावर उतरले आहेत. शुक्रवारी या कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात निदर्शने करीत सेतू केंद्रातील भूमापन कक्ष बंद करण्याची मागणी केली. कर्मचाऱ्यांच्या या भूमिकेमुळे सिटी सर्व्हेत सुरू असलेल्या भ्रष्टाचारास येथील कर्मचारी समर्थन किंवा त्यांना साथ तर देत नाहीत ना, अशी चर्चा होती.
जिल्हाधिकारी सचिन कुर्वे आणि निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र कुंभारे यांनी गुरुवारी नगर भूमापन कार्यालय क्रमांक २ (सिटी सर्व्हे) येथे अचानक भेट देऊन पाहणी केली. सेतू केंद्रामार्फत आलेल्या सर्व अर्जांचा निपटारा करण्यात आल्याचा अहवाल विभाग प्रमुख ठाकरे यांच्यावतीने देण्यात आला होता. परंतु या पाहणीत १० टक्के प्रकरणाचांही निपटारा झालेला नसल्याची बाब उघडकीस आली. यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी ठाकरे यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केली. पैशासाठी प्रकरण प्रलंबित ठेवले जात असल्याची बाब उघडकीस आली. जिल्हाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त करीत दोषींवर कारवाई करण्याचा इशारा दिला. यामुळे कर्मचारी हादरले.
दरम्यान शुक्रवारी कार्यालय उघडताच जिल्हाधिकारी कुर्वे यांनी नगर भूमापन कार्यालयातील सर्व कागदपत्र मागवून घेतले. दस्तऐवजांची तपासणी केल्यानंतर दोषींवर कारवाई करण्याचे संकेत दिले. हे संकेत मिळताच दुपारी १ वाजता नगर भूमापन कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात काळी पट्टी बांधून विरोधात निदर्शने केली. संपूर्ण परिसरात फिरून आपला विरोध दर्शविला. निदर्शने करीत कर्मचारी सेतू कार्यालयात सुरू केलेले नगर भूमापन केंद्र बंद करण्याची मागणी केली.
जिल्हाधिकाऱ्यांतर्फे विशेष व्यवस्था
नगर भूमापन संबंधातील कामांसाठी नागरिकांना सर्वाधिक त्रास सहन करावा लागतो. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी सेतू केंद्रात सिटी सर्व्हेसंबंधी कामासाठी विशेष केंद्र सुरू केले होते. येथे येणाऱ्या प्रकरणाचा निपटारा आठ दिवसात करण्याचे आदेश देण्यात आले होते. सामान्य नागरिकांसाठी ही व्यवस्था करण्यात आली होती. परंतु या व्यवस्थेमुळे सिटी सर्व्हेतील कर्मचाऱ्यांच्या कमाईवर याचा परिणाम होऊ लागला होता. त्यामुळे याचा विरोध केला जात होता.
भाजपातर्फे स्वागत
जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी सिटी सर्व्हे विभागात केलेल्या कारवाईचे भाजपातर्फे स्वागत करण्यात आले आहे. मनपा सत्तापक्ष नेते दयाशंकर तिवारी यांनी जिल्हाधिकारी कुर्वे यांचे अभिनंदन करीत आम्ही त्यांच्या पाठीशी असल्याचे स्पष्ट केले. त्यांच्या कारवाईविरोधात आंदोलन करण्याच्या घटनेचा निषेध करीत दोषींवर कारवाई करण्याची मागणी सुद्धा त्यांनी केली.
अपमान केल्याचा आरोप
दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी नगररचना विभागातील अधिकाऱ्यांना अपशब्द बोलून अपमान केल्याने निदर्शने केली जात असल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे होते.