कोरोनाच्या काळातही लाचखोर अधिकारी सुसाट ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:09 AM2021-05-21T04:09:03+5:302021-05-21T04:09:03+5:30
जगदीश जोशी नागपूर : कोरोनाच्या काळात सामान्य नागरिकांना व्यवसाय ठप्प झाल्यामुळे आर्थिक टंचाई जाणवत आहे. तर दुसरीकडे दरमहा चांगले ...
जगदीश जोशी
नागपूर : कोरोनाच्या काळात सामान्य नागरिकांना व्यवसाय ठप्प झाल्यामुळे आर्थिक टंचाई जाणवत आहे. तर दुसरीकडे दरमहा चांगले वेतन मिळणारे अधिकारी लाच घेत आहेत. त्यांना नागरिकांच्या परिस्थितीशी काहीच देणे-घेणे नाही. अधिकारी लाच घेण्यासाठी सामान्य नागरिकांना त्रास देत आहेत. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने १० दिवसात केलेल्या ४ कारवायांमुळे लाचखोर अधिकाऱ्यांचे पितळ उघडे पडले आहे.
सामान्य नागरिक सव्वा वर्षांपासून लॉकडाऊनमुळे त्रस्त आहेत. शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांशिवाय सर्वांनाच आर्थिक टंचाईचा सामना करावा लागत आहे. नागरिक कसेबसे आपला उदरनिर्वाह करीत आहेत. नागरिकांची ही परिस्थिती माहीत असतानाही अधिकाऱ्यांचा लाच घेण्याचा सपाटा सुरू आहे. मागील ७ ते १७ मेदरम्यान लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच घेण्याच्या चार प्रकरणात महावितरणचा उपअभियंता, शाळेचा मुख्याध्यापक तसेच ग्रामीण पोलीस दलातील उपनिरीक्षकासह सात कर्मचाऱ्यांना रंगेहात पकडले. ७ मे रोजी महापालिकेच्या सायबरटेक कंपनीचा सुपरवायझर रवींद्र बागडे आणि कर संग्राहक सूरज गणवीरला लॉन संचालकाकडून तीन लाख घेताना अटक केली. त्यांनी ८० लाख रुपये संपत्ती कर लावण्याचा इशारा दिला होता. कर न लावण्याच्या मोबदल्यात त्यांनी सहा लाख रुपये मागितले होते. १० मे रोजी सेवानिवृत्त शिक्षकाच्या पेन्शन प्रस्तावाला मंजुरी देण्याच्या मोबदल्यात प्रागतिक माध्यमिक विद्यालयाचा मुख्याध्यापक अनिल सगणे आणि वरिष्ठ लिपिक प्रशांत कुरळकर यांना २०,५०० रुपये घेताना पकडण्यात आले. ११ मे रोजी काम पूर्ण झाल्याचा अहवाल देण्याच्या मोबदल्यात खापा येथील महावितरणचा उपअभियंता गजानन डाबरे याला कंत्राटदाराकडून ३० हजार घेताना अटक करण्यात आली. तसेच १७ मे रोजी खापाच्या पाचगाव चौकीत ग्रामीण पोलीस दलातील उपनिरीक्षक भारत थिटे आणि शिपाई अमित पवार यांना चोरीच्या प्रकरणात आरोपीला मदत करण्यासाठी पाच हजार रुपये घेताना अटक करण्यात आली. या घटनेमुळे ग्रामीण पोलीस दलात खळबळ उडाली होती. सर्व प्रकरणांचा अभ्यास केल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला खूप त्रास दिल्यामुळे नागरिक तक्रार करीत असल्याचा खुलासा झाला. लॉकडाऊनमुळे नागरिक आवश्यक काम असल्यास घराबाहेर पडत आहेत. पीडितांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे जाण्याचे टाळले, परंतु त्यांचा नाईलाज झाल्याने त्यांनी तक्रार केली. अधिकाऱ्यांमुळे त्रस्त अनेक पीडित लॉकडाऊनमुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे जाण्याचे टाळत आहेत.
...........
लाचलुचपत प्रतिबंधक विभागावर कामाचा ताण
लाचखोरीच्या प्रकरणाच्या तक्रारी वाढल्यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागावर कामाचा ताण वाढला आहे. विभागाच्या नागपूर रेंजमध्ये १२ अधिकारी आणि ५० कर्मचारी आहेत. तीन अधिकारी तसेच सहा कर्मचारी शहर पोलिसात बंदोबस्तासाठी देण्यात आले आहेत. १५ टक्के उपस्थितीच्या नियमामुळे तीन अधिकारी आणि सहा कर्मचारी कार्यालयात राहतात. एक गुन्हा घडल्यानंतर दोन टीमची गरज भासते. त्यामुळे उपस्थित अधिकारी आणि कर्मचारी त्रस्त होतात. तसेच तक्रारीची खातरजमा करण्यासाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांची गरज भासते.
..........