लाचखोर पीएसआयसह कॉन्स्टेबल जाळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2018 10:45 PM2018-04-16T22:45:59+5:302018-04-16T22:46:13+5:30
खोटे कागदपत्र तयार करून शेतीची विक्री करण्याच्या सौद्यात साक्षीदाराकडून लाचेची मागणी करणे कोंढाळीच्या पोलीस उपनिरीक्षकासह हेडकॉन्स्टेबलला महागात पडले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला याबाबत सूचना देताच सापळा रचून दोघांनाही २० हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ अटक केली. विशेष म्हणजे, ही कारवाई कोंढाळी पोलीस ठाण्यामागेच सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
कोंढाळी : खोटे कागदपत्र तयार करून शेतीची विक्री करण्याच्या सौद्यात साक्षीदाराकडून लाचेची मागणी करणे कोंढाळीच्या पोलीस उपनिरीक्षकासह हेडकॉन्स्टेबलला महागात पडले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला याबाबत सूचना देताच सापळा रचून दोघांनाही २० हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ अटक केली. विशेष म्हणजे, ही कारवाई कोंढाळी पोलीस ठाण्यामागेच सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास करण्यात आली.
पोलीस उपनिरीक्षक सचिन राठोड, हेडकॉन्स्टेबल निवृत्ती यावले अशी लाचखोर पोलिसांची नावे आहेत. कोंढाळी पोलीस ठाण्यांतर्गत मुरली गावानजीकच्या भडमुर्गा शिवारातील सर्वे क्र. ६८ अंतर्गत ५.६४ हेक्टर शेतीची प्रदीप सीताराम मसराम व मनोहर पंतुजी ठाकरे यांनी बनावट कागदपत्रे तयार करून बोगस विक्री केली. या विक्री प्रकरणात मनीष शेरकर व किशोर जामळे हे साक्षीदार होते. या बोगस विक्रीची तक्रार झाल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक सचिन राठोड व हेडकॉन्स्टेबल निवृत्ती यावले हे दोन्ही साक्षीदारांना वारंवार चौकशीसाठी पोलीस स्टेशनला बोलवित. या प्रकरणात तुम्हाला अटक करू, अशीही धमकी त्यांना दिली. दरम्यान साक्षीदारांनी कोंढाळीच्या ठाणेदारांना भेटण्याचा प्रयत्न केला असता लाचखोर पोलिसांनी भेट होऊ दिली नाही.
सदर प्रकरणात साक्षीदारांचे वकील अॅड. महेश वाघ हे ९ एप्रिलला कोंढाळी पोलीस ठाण्यात भेटण्यास गेले असता प्रकरण निस्तारण्यासाठी ४० हजार रुपयांची मागणी त्यांना या दोघांनी केली. त्यातील २० हजार रुपये शुक्रवारी (दि. १३) लाचखोर पोलिसांना देण्यात आले. त्यानंतर लाचेचे दुसरे इन्स्टॉलमेंट सोमवारी (दि. १६) देण्याचे ठरले होते.
यानुसार अॅड. वाघ यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्यानुसार भंडारा येथील पथकातील पोलीस निरीक्षक योगेश्वर पारधी यांच्या नेतृत्वातील पथकाने सापळा रचला. फिर्यादी वाघ हे २० हजार रुपये घेऊन आले. ते पोलीस उपनिरीक्षक राठोडला भेटले असता त्याने हेडकॉन्स्टेबल यावलेकडे पैसे देण्यास सांगितले. त्यानुसार पोलीस ठाण्यामागे लाचेची रक्कम देत असतानाच त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला इशारा केला. त्यावरून पथकाने रंगेहाथ हेडकॉन्स्टेबलला अटक केली. तसेच या प्रकरणाचा सूत्रधार पोलीस उपनिरीक्षक सचिन राठोड यालाही अटक केली.