महाविकास आघाडी सरकारच्या काळात विमा कंपन्यांचा भ्रष्टाचार; चंद्रशेखर बावनकुळेंचा आरोप

By योगेश पांडे | Published: November 30, 2022 04:49 PM2022-11-30T16:49:23+5:302022-11-30T16:51:05+5:30

प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी

corruption of insurance companies during Maha Vikas Aghadi government, Chandrashekhar Bawankule allegations | महाविकास आघाडी सरकारच्या काळात विमा कंपन्यांचा भ्रष्टाचार; चंद्रशेखर बावनकुळेंचा आरोप

महाविकास आघाडी सरकारच्या काळात विमा कंपन्यांचा भ्रष्टाचार; चंद्रशेखर बावनकुळेंचा आरोप

Next

नागपूर :महाविकास आघाडी सरकारच्या काळात विमा कंपन्यांवर कोणाचेही नियंत्रण नव्हते. याचा फायदा घेत विमा कंपन्यांनी प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार केला, असा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी लावला. हे मागील मुख्यमंत्र्यांचे अपयश होते व या भ्रष्टाचाराची उच्चस्तरीय चौकशी व्हायला हवी, अशी मागणी त्यांनी केली आहे. बुधवारी डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

महाविकासआघाडी सरकारने विमा कंपन्यांना पैसे दिले, मात्र अडीच वर्षे कधीही आढावा घेतला नाही. कोणत्याही पालकमंत्र्यांनी, कृषीमंत्र्यांनीदेखील त्यासाठी पुढाकार घेतला नाही. खरिपाच्या आढावा बैठक सुद्धा त्या काळात झाल्या नाही. पीकविमा कंपन्या सरकारकडून पैसे घेत होत्या. मात्र खरोखर शेतकऱ्यांना त्यांनी परतावा दिला की नाही हे पाहण्याची तसदीच कुणी घेतली नाही. त्यामुळे याची चौकशी झाली पाहिजे, असे बावनकुळे म्हणाले.

आदित्य ठाकरेंचे आरोप खोटारडे

यावेळी त्यांनी माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्या आरोपांनादेखील प्रत्युत्तर दिले. मागील सरकारने वेदांताला कुठेही जागा दिली नव्हती हे माहिती अधिकारातूनच समोर आले आहे. त्यासंदर्भात कुठेही बैठकदेखील घेण्यात आली नव्हती. वेदांता प्रकल्प महाविकास आघाडी सरकारच्या अकार्यक्षमतेमुळे गेला आहे. उद्धव ठाकरे 18 महिने मंत्रालयातच येत नव्हते. मग कंपन्यांचे प्रतिनिधी कोणाशी बोलले असते असा सवाल करत बावनकुळे यांनी आदित्य ठाकरे यांचे आरोप खोटारडे असल्याचा दावा केला.

राज्यपालांची चूकच झाली

आमची सर्वांची भूमिका राज्यपालांना समर्थन करणारी नाही. त्यांची त्यादिवशी चूकच झाली आहे. राज्यपाल हे घटनात्मक पद आहे.. त्यांना ठेवायचे की नाही हे आमच्या अधिकार क्षेत्रात नाही, असे त्यांनी प्रतिपादन केले.

Web Title: corruption of insurance companies during Maha Vikas Aghadi government, Chandrashekhar Bawankule allegations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.