भ्रष्टाचारात पोलीस खाते नंबर १

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2017 12:05 PM2017-10-28T12:05:47+5:302017-10-28T12:16:43+5:30

लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे (एसीबी) भ्रष्टाचार निर्मूलनाच्या उद्देशाने दक्षता जागृती सप्ताहाचे आयोजन ३० आॅक्टोबरपासून करण्यात येत आहे.

In corruption Police is Number 1 | भ्रष्टाचारात पोलीस खाते नंबर १

भ्रष्टाचारात पोलीस खाते नंबर १

Next
ठळक मुद्देएसीबीचा दक्षता जागरअभियानास प्रारंभ, विविध उपक्रमाचे आयोजन

आॅनलाईन लोकमत
नागपूर : कायद्याचा धाक निर्माण करण्याची जबाबदारी असलेला पोलीस विभाग लाचखोरीत अव्वलस्थानी आहे. एसीबीच्या नागपूर परिक्षेत्रात सुरू असलेल्या वर्षात एकूण ८७ सापळे रचून ११३ लाचखोरांच्या मुसक्या बांधण्यात आल्या. पकडलेल्या आरोपींमध्ये सर्वाधिक १७ आरोपी पोलीस खात्यातील आहे, अशी माहिती एसीबीचे अधीक्षक पी. आर. पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे (एसीबी) भ्रष्टाचार निर्मूलनाच्या उद्देशाने दक्षता जागृती सप्ताहाचे आयोजन ३० आॅक्टोबरपासून करण्यात येत आहे. भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीचे औचित्य साधून ३० आॅक्टोबर ते ४ नोव्हेंबरदरम्यान हे अभियान चालविले जाईल. त्याअंतर्गत विविध उपक्रम राबविले जाणार आहे.
भ्रष्टाचाराला आळा घालण्याच्या हेतूने या अभियानाचे आयोजन असून, नागरिकांनी त्याला सहकार्य करावे, असे आवाहनही अधीक्षक पाटील यांनी केले.
ते म्हणाले, दक्षता सप्ताहात सर्वप्रथम एसीबीचे कर्मचारी-अधिकारी भ्रष्टाचार निर्मूलनाची शपथ घेतील. ३१ आॅक्टोबर रोजी दुपारी ४ वाजता घाट रोड येथील सरदार वल्लभभाई पटेल चौकातून स्कूटर रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.
संविधान चौकात रॅलीचा समारोप होईल, दरम्यान, शासकीय, निमशासकीय कार्यालये, महाविद्यालयात चर्चासत्राचे आयोजन करून भ्रष्टाचाराच्या दुष्परिणामावर प्रकाश टाकण्यात येणार आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या बैठका आणि वेगवेगळ्या ठिकाणी पथनाट्ये सादर करण्यात येतील.
या अभियानांतर्गत नागरिकांसाठी व्यंगचित्र व घोषवाक्य स्पर्धा आयोजित करण्यात आली असून, घोषवाक्य २ नोव्हेंबरपर्यंत ७०४०२२२२२१ या व्हॉट्सअ‍ॅप क्रमांकावर पाठविता येणार आहे. या निमित्ताने नागरिकांनी भ्रष्टाचाºयांविरुद्ध तक्रारीसाठी निर्भयपणे पुढे येण्याचे आवाहन करण्यात येणार आहे.
४ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता नवीन सुभेदार लेआऊटमधील शिवाजी सभागृहात आयोजित कार्यक्रमाने सप्ताहाचा समारोप होईल. यावेळी भ्रष्टाचाराविरुद्ध तक्रार करण्यासाठी पुढे आलेल्या नागरिकांचा सत्कार करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

११३ लाचखोर गजाआड
एसीबीच्या नागपूर परिक्षेत्रात चालू वर्षात एकूण ८७ सापळ्यांचे आयोजन झाले. त्यात ११३ लाचखोर अडकले. त्यात वर्ग १ चे १२ अधिकारी, वर्ग २ चे १४, वर्ग ३ चे ६८ आणि वर्ग ४ चा एक कर्मचारी हाती लागला. ११३ लाचखोरात १२ खासगी व्यक्तींचाही समावेश आहे. सापळ्यात अडकलेल्या विविध विभागाच्या शासकीय कर्मचाºयांमध्ये १७ आरोपी पोलीस खात्यातील आहेत. त्यात नागपूर शहरातील ४ आणि जिल्ह्यातील दोघांचा समावेश आहे. त्या खालोखाल महसूल विभागाचे १४, पंचायत समितीचे ९, जिल्हा परिषदेचे ७ आणि वन विभागाच्या ६ कर्मचाºयांचाही समावेश आहे.

कन्व्हिक्शन रेटचा चंद्रपूर पॅटर्न
एकीकडे लाचखोर पकडण्याचे प्रमाण चांगले असले तरी दोषसिद्धतेची टक्केवारी (कन्व्हिक्शन रेट) कमी आहे. सर्वाधिक चांगला कन्व्हीक्शन रेट चंद्रपूर जिल्ह्याचा (९५ टक्के) आहे. त्यामुळे चंद्रपूर पॅटर्न राज्यभर राबविण्यावर विचारमंथन सुरू आहे. राज्यभर गाजलेल्या सिंचन घोटाळ्यात एकूण चार गुन्हे दाखल करण्यात आले असून तपास सुरू आहे. त्यापैकी एका प्रकरणात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले असून दुसरे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या प्रकरणांमध्ये एकूण १२ अधिकारी संशयाच्या टप्प्यात असून, ३४ निविदांचीही चौकशी सुरू आहे, असेही पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

Web Title: In corruption Police is Number 1

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस