विद्यार्थ्यांच्या खिचडीवर भ्रष्टाचाराचे लोणी
By admin | Published: February 22, 2016 02:56 AM2016-02-22T02:56:59+5:302016-02-22T02:56:59+5:30
राजीवनगर येथील शांतिनिकेतन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना खिचडीतून झालेल्या विषबाधेचे प्रकरण ताजे असताना खामला येथील प्राचार्य अरुणराव कलोडे विद्यालयात भ्रष्टाचाराची ‘खिचडी’ शिजत आहे.
कलोडे विद्यालयात तांदूळ घोटाळा : आधी कारवाई नंतर दिलासा कसा ?
जितेंद्र ढवळे नागपूर
राजीवनगर येथील शांतिनिकेतन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना खिचडीतून झालेल्या विषबाधेचे प्रकरण ताजे असताना खामला येथील प्राचार्य अरुणराव कलोडे विद्यालयात भ्रष्टाचाराची ‘खिचडी’ शिजत आहे. याप्रकरणी आधी दोषी मुख्याध्यापिकेवर कारवाईचा ठपका ठेवणाऱ्या जि.प.च्या शिक्षण विभागानेही मुख्याध्यापिकेची वैयक्तिक मान्यता पूर्ववत केली आहे. त्यामुळे भ्रष्टाचाराच्या या खिचडीत शिक्षण विभाग तर हात धूत नाही, असा प्रश्न उपस्थित झाला आहे !
खामला येथील प्राचार्य अरुणराव कलोडे विद्यालयात विविध तक्रारीच्या आधारावर जिल्हा परिषद नागपूर शिक्षण विभागाने (माध्यमिंक) चौकशी केली होती. यात पथकाने शाळेतील वेतन देयक आणि शालेय पोषण आहाराचे रजिस्टरही तपासले होते. यात शाळेला दि. २१ डिसेंबर २०१५ रोजी ६ क्विंटलचा तांदूळ पुरवठा झाल्याची नोंद आढळली. मात्र प्रत्यक्षात शाळेत १६ क्विंटल तांदूळ आढळून आला होता. यावर विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार दिला जात नाही का, अशी विचारणा शिक्षण विभागाच्यावतीने मुख्याध्यापिका रजनी डहाके यांना करीत लेखी स्पष्टीकरण सादर करण्याचे निर्देश दिले होते. यासोबत शाळेतील कर्मचाऱ्यांच्या विविध तक्रारींचे निराकरण करण्याच्या सूचनाही या पत्रात करण्यात आल्या होत्या.
याबाबत २४ तासांत मुख्याध्यापिकेने खुलासा करावा, अन्यथा आपल्यावर एकतर्फी कारवाई करण्यात येईल, अशी ताकीद यात देण्यात आली होती. मात्र याप्रकरणी मुख्याध्यापिकेने उत्तर सादर केली नसल्याचा आधार घेत ८ जानेवारी २०१६ रोजी महाराष्ट्र खासगी शाळांतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली १९८१ नियम २८ अन्वये डहाके यांची वैयक्तिक मान्यता रद्द करण्यात आली होती. यानंतर १९ जानेवारीला माध्यमिक शिक्षण विभागाने एक पत्र पाठवित शाळेतील एका सहायक शिक्षकाला मुख्याध्यापक पदाचा पदभार देण्याच्या सूचना शाळा संचालकांना केल्या होत्या. यासोबतच ६ महिन्याच्या आत मुख्याध्यापकाचे नवीन पद भरण्यासंदर्भात कार्यवाही करण्याच्या सूचना केल्या होत्या.
१९ दिवसांत काय घडले ?
नागपूर : मात्र या घटनेच्या १९ दिवसांच्या आताच मुख्याध्यापिकेची मान्यता रद्द करणाऱ्या, शाळा संचालकांना मुख्याध्यापकांचे नवीन पद भरण्याच्या कडक सूचना देणाऱ्या शिक्षण विभागाने शिक्षण उपसंचालक कार्यालयाच्या पत्राचा आधार घेत डहाके यांची रद्द केलेली मान्यता पूर्ववत केली. यात मुख्याध्यापिकेने शिक्षकेतर कर्मचाऱ्याच्या तक्रारीचे निराकरण केले असल्याचा दाखला देण्यात आला आहे.
मुळात मुख्याध्यापिकेने कर्मचाऱ्यांचे निराकरण केल्याची शाबासकी देणाऱ्या शिक्षण विभागाला यावेळी शाळेतील पोषण आहारात अपहार झाला होता, शिक्षण विभागाच्या कारवाईत तसे आढळूनही आले होते, याचा विसर मात्र पडला. त्यामुळे १९ दिवसांत शाळा आणि शिक्षण विभागात भ्रष्टाचाराची ‘खिचडी’ शिजली का ? यात ‘तूप’ कुणी टाकले, असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला जात आहे.
गुरुनानक जयंतीलाही शिजली खिचडी
प्राचार्य अरुणराव कलोडे विद्यालयातील ‘खिचडीकथा’ नव्या नाही. या विद्यालयात सार्वजनिक सुटीच्या दिवशीही खिचडी शिजली आहे. मात्र सुटीच्या दिवशी खिचडी कुणी खाल्ली, असा प्रश्न १० एप्रिल २००६ रोजी तत्कालीन शिक्षणाधिकारी राजेंद्र गोधने यांनीही पडला होता.
याच कलोडे विद्यालयात २००४-२००५ या शैक्षणिक वर्षांत शालेय पोषण आहार योजनेंतर्गत तांदूळ शिजवून वाटप केल्याबाबतच्या देयकात जुलै-०४ ते मार्च ०५ या कालावधीत प्रत्यक्ष हजेरी पटावरील उपस्थितीपेक्षा तांदूळ शिजवून वाटप करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांची उपस्थिती अधिक दर्शविण्यात आली होती. यात देयकामध्ये दर्शविण्यात आलेली विद्यार्थ्यांची उपस्थिती ही हजेरी पटावरील उपस्थितीपेक्षा ४४ ने अधिक होती. इतकेच काय तर २६ नोव्हेंबर २००४ रोजी गुरुनानक जयंती निमित्त सार्वजनिक सुटी असतानाही शाळेने तांदूळ शिजविल्याचे देयक सादर केले होते आणि अनुदानही स्वीकारले होते. त्यावेळी लोकआयुक्तांकडे या प्रकरणाची तक्रार दाखल करण्यात आली होती.