भ्रष्टाचार, दहशतवाद अन् कलम ३७०चे बडगे ठरले आकर्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2019 10:38 PM2019-08-31T22:38:05+5:302019-08-31T22:46:14+5:30

मारबत आणि बडग्या उत्सवात सहभागी होण्याची हौस सकाळपासून निर्माण झालेल्या दमटपणावर आणि त्यानंतर बरसलेल्या तुफान पावसावरही भारी पडली. देश-विदेशातील पाहुण्यांसह लाखाच्या घरात नागपूर व विदर्भातील नागरिकांनी या महोत्सवात जल्लोषात सहभाग घेतला.

Corruption, terrorism and Section 370 have become attraction | भ्रष्टाचार, दहशतवाद अन् कलम ३७०चे बडगे ठरले आकर्षण

भ्रष्टाचार, दहशतवाद अन् कलम ३७०चे बडगे ठरले आकर्षण

Next
ठळक मुद्दे‘मारबत’ लोकोत्सव। देश-विदेशातील पाहुण्यांनीही घेतला महोत्सवाचा आनंद

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूरची स्वतंत्र अशी ओळख असलेल्या मारबत आणि बडग्या उत्सवात सहभागी होण्याची हौस सकाळपासून निर्माण झालेल्या दमटपणावर आणि त्यानंतर बरसलेल्या तुफान पावसावरही भारी पडली. देश-विदेशातील पाहुण्यांसह लाखाच्या घरात नागपूर व विदर्भातील नागरिकांनी या महोत्सवात जल्लोषात सहभाग घेतला. कोणतीही परंपरा एका ठोस कारणाने सुरू होते आणि नंतर त्या परंपरेला वेगवेगळे आयाम चिकटत जातात; नंतर ती परंपरा वेगवेगळ्या अनुषंगाने पिढी दर पिढी पुढे सरकत जाते. श्रावण आटोपल्यानंतर भाद्रपदाच्या पहिल्या दिवशी बैल पोळा साजरा होतो आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी केवळ नागपुरात मारबत महोत्सव साजरा केला जातो. १३९ वर्षांपासून चालत आलेली ही परंपरा आजतागायत तेवढ्याच उत्साह, जल्लोषात साजरी केली जात आहे. शनिवारी मारबत महोत्सव उल्हासात साजरा झाला.


जागनाथ बुधवारी येथील नवसाची म्हणून प्रख्यात झालेली पिवळी मारबत आणि इतवारीमधील बारदाना मार्केटमधील काळ्या मारबतीचे शनिवारी विधिवत पूजन झाले. त्यानंतर परंपरेप्रमाणे पिवळी मारबत जागनाथ बुधवारी येथून निघाली आणि बारदाना मार्केटमधून काळी मारबत. दोन्ही मारबतींचे नेहरू पुतळा येथे मिलन झाल्यानंतर मुख्य यात्रेला सुरुवात झाली. या महोत्सवात हे मिलन अत्यंत महत्त्वाचे मानले जाते आणि त्यासाठी नेहरू पुतळा चौक येथे प्रचंड गर्दी उसळलेली असते. पुढे यात वेगवेगळ्या मंडळांचे वर्तमान परिस्थितीवर कटाक्ष करणारे आकर्षक असे बडगे आणि वेगवेगळ्या मंडळांकडून तयार करण्यात आलेल्या मारबती सहभागी झाल्या. 
 

बडग्यांनी वेधले लक्ष 


महोत्सवात सहभागी झालेले विविधांगी बडगे लक्षवेधक होते. इम्रान खानचा निषेध, ईव्हीएम घोटाळा, भ्रष्टाचारी नेता पी. चिदंबरम, पैसा घेऊन पसार होणारा विजय मल्ल्या, उन्नाव येथील अत्याचारपीडितेला न्याय मिळवून देण्याची मागणी करणारा बडग्या, तरुणाईला उद्ध्वस्त करणारा पाकिस्तानचा बडग्या, पाणीकपातीवरील बडग्या, दहशतवादी मोहम्मद हाफीज याचा बडगा आकर्षक ठरले.

रोगराई घेऊन जा गे मारबत
स्वातंत्र्य युद्धाचा महत्त्वाचा भाग असलेल्या मारबत महोत्सवाला, तत्कालीन कारण म्हणून श्रीकृष्ण आणि पुतना मावशीची कथा जोडण्यात आली आणि त्याअन्वये या महोत्सवाला श्रद्धेची जोड मिळाली. तेव्हापासून नवस फेडणे आदी गोष्टी सुरू झाल्या. काळी आणि पिवळ्या मारबतीचे आगमन होताच नागरिकांनी जागोजागी दोघींनाही नमन करण्यास सुरुवात केली. मुलांना होणारा आजार, रोगराई दूर करण्याचा आशीर्वाद मागण्यात आला. काहींनी लहान मुलांचे डोके पिवळ्या मारबतीच्या चरणावर ठेवत त्याच्यामागील सर्व ईडा-पीडा टळू दे, अशी विनवणी केली. एक नमन गवरा पारबती हर बोला हर हर महादेव..., स्वाईन फ्लू, डेंग्यू, खांसी, खोकला घेऊन जाऽऽ गे मारबतच्या घोषणांनी संपूर्ण मिरवणूक मार्ग दणाणून गेला होता.
पिवळी मारबत मिरवणूक उत्साहात
तऱ्हाणे तेली समाज मारबत नागोबा देवस्थान, जागनाथ बुधवारी येथून निघणाऱ्या पिवळ्या मारबतीची मिरवणूक शनिवारी उत्साहात पार पडली. मिरवणुकीचे हे १३५वे वर्ष होते. पोलीस निरीक्षक अजयकुमार मालवीय यांच्या हस्ते मिरवणुकीचा शुभारंभ करण्यात आला. ही मिरवूणक पाचपावली मार्गे गोळीबार चौक, भारतमाता चौक, मस्कासाथ, नेहरू पुतळा चौक येथे काळ्या मारबतीसोबत मिलन करून पुढे निघाली. मारवाडी चौक, जुना मोटार स्टॅण्ड, अमरदीप सिनेमा, शहीद चौक, टांगा स्टॅण्ड, चितार ओळ, बडकस चौक, गांधीगेट, चिटणवीस पार्क, अग्रसेन चौक, गांजाखेत चौक, गोळीबार चौक, भारतमाता चौक, जागृतेश्वर मंदिर, पिवळी मारबत चौक, तांडापेठ येथून नाईक तलाव येथे पोहोचली आणि तेथे विधिपूर्वक दाह संस्कार संस्थेचे अध्यक्ष प्रकाश गौरकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी, विजय खोपडे, देवीदास गभणे, किशोर मालकर, मनोहर मोटघरे, शरद ताकितकर, देवानंद अंबागडे, चंद्रशेखर देशमुख, धर्मेंद्र साठवणे, गजानन शेंडे, जयवंत तकितकर, भूषण खोपडे, भास्कर तकितकर, कृणाल मोटघरे, स्वप्निल मोटघरे, शुभम गभणे, शुभम गौरकर, नितीन खोपडे, किशोर खोडे, दिगंबर देशमुख, अतुल भुते उपस्थित होते.

ट्रॅफिक आणि यात्रेची घुसमट
दरवर्षी परंपरेप्रमाणे मारबत आणि बडगे निघतात, हे माहीत असतानाही सी.ए. रोडवरील वाहतूक दुसऱ्या मार्गाने वळविण्यात आली नव्हती, हे विशेष. दरवर्षीची हीच समस्या यंदाही दिसून आली. त्यामुळे ट्रॅफिक आणि यात्रेची घुसमट होत असल्याचे दिसून येत होते.

Web Title: Corruption, terrorism and Section 370 have become attraction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.