नागपुरात दोन हजाराचे इन्फ्रारेड थर्मामीटर आठ हजारात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2020 11:42 PM2020-03-19T23:42:25+5:302020-03-19T23:44:25+5:30
१९९९ रुपये एमआरपी किमत लिहिलेले हे थर्मामीटर तब्बल आठ हजारात विकले जात आहे. विशेष म्हणजे, याचे बिल दिले जात नाही. यामुळे याची तक्रारही होत नसल्याने विक्रेत्यांचे चांगलेच फावत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना विषाणूच्या भीतीमुळे मास्कपासून, सॅनिटायझरची जोरात विक्री सुरू आहे. बहुसंख्य स्टॅर्ण्डड कंपन्यांच्या वस्तू बाजारातून गायब झाल्या आहेत, त्यांच्या जागी आता बोगस कंपन्यांच्या वस्तू आल्या आहेत. यांच्यावर कारवाई होत असली तरी ती व्यापक नाही. यामुळे याचा वचक बसत नसल्याने काळाबाजार बिनभोट सुरूच आहे. आता यात इन्फ्रारेड थर्मामीटरचाही समावेश झाला आहे. १९९९ रुपये एमआरपी किमत लिहिलेले हे थर्मामीटर तब्बल आठ हजारात विकले जात आहे. विशेष म्हणजे, याचे बिल दिले जात नाही. यामुळे याची तक्रारही होत नसल्याने विक्रेत्यांचे चांगलेच फावत आहे.
कोरोना विषाणूबाबात प्रत्येक कार्यालय सतर्क झाले आहे. सुरक्षेसाठी वेगवेगळे उपाय केले जात आहे. अधिकाऱ्यांपासून ते कर्मचाऱ्यांना मास्क घालण्याची, सॅनिटायझर वापरण्याची किंवा वारंवार होत धुण्याची सूचना केली जात आहे. याची अंमलबजावणीही होताना दिसून येत आहे. आता याच्या एक पाऊल पुढे टाकत दुरूनच ताप मोजणाºया यंत्र ‘इन्फ्रारेड थर्मामीटर’ची मागणी यांच्याकडून होऊ लागली आहे. सध्या हे यंत्र विमानतळावरील प्रवाशांच्यास तपासणीसाठी वापरले जात आहे. काही कार्यालयांकडून याच्या मागणीत वाढ होताच अनेक सर्जिकल स्टोअर्स व वैद्यकीय यंत्रसामग्री विक्रेत्यांकडे याचा स्टॉक संपलेला आहे. ज्यांच्याकडे आहे ते ‘एमआरपी’च्या कित्येकपट किमतीत विकत आहे.
प्रस्तुत प्रतिनिधीने लिबर्टी टॉकीज चौकात असलेल्या एका दुकानात ‘इन्फ्रारेड थर्मामीटर’ची मागणी केली असता, सुरुवातीला नसल्याचे सांगितले. परंतु थोड्याच वेळात आठ हजार रुपयांत असल्याचे माहिती देत यंत्र काढून दाखविले. यंत्राच्या डब्यावर एमआरपी किंमत १९९९ लिहिलेली होती. विक्रेत्याला याबाबत विचारले असता त्याने सांगितले, हे यंत्र चायनावरून येते. सध्या याचा पुरवठा नाही. हवे असेल तर घ्या. याचे बिल मिळणार नाही, असेही त्यांनी सांगितले.
शहरातील बाजारात अनेक वस्तूंचा काळाबाजार सुरू आहे. लोक भीतीपोटी अव्वाच्या सव्वा किमतीत त्या वस्तू घेत आहेत. मात्र प्रशासन अद्यापही कठोर कारवाई करण्याच्या मन:स्थितीत नाही. यामुळे बिनबोभाट काळाबाजार सुरूच आहे.