कॉटन मार्केट बुधवारपासून पुन्हा बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2020 09:14 PM2020-05-19T21:14:43+5:302020-05-20T00:56:19+5:30
तब्ब्बल ५० दिवसानंतर मंगळवारी सुरू करण्यात आलेले कॉटन मार्केट मनपा अधिकाऱ्यांची मनमानी आणि त्यांच्याकडून शेतकरी व अडतियांना मिळालेल्या अपमानास्पद वागणुकीमुळे बुधवारपासून बंद ठेवण्याचा निर्णय महात्मा फुले बाजार अडतिया असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी घेतला आहे. त्यामुळे बुधवारपासून भाजीबाजार भरणार नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : तब्ब्बल ५० दिवसानंतर मंगळवारी सुरू करण्यात आलेले कॉटन मार्केट मनपा अधिकाऱ्यांची मनमानी आणि त्यांच्याकडून शेतकरी व अडतियांना मिळालेल्या अपमानास्पद वागणुकीमुळे बुधवारपासून बंद ठेवण्याचा निर्णय महात्मा फुले बाजार अडतिया असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी घेतला आहे. त्यामुळे बुधवारपासून भाजीबाजार भरणार नाही.
महात्मा फुले बाजार असोसिएशनचे सचिव राम महाजन म्हणाले, मंगळवारी सकाळी नागपूर आणि अन्य जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनी भाजीपाला बाजारात आणला. किरकोळ विक्रेते आणि ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात खरेदी केली. पण मनपाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मनमानीचा निषेध करीत बुधवारपासून बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
मनपा कर्मचाऱ्यांनी शिस्तीच्या नावाखाली शेतकरी आणि अडतियांवर दंडे उगारले आणि दडपशाही केली. मानेवाडा रोडच्या कडेला दररोज जवळपास भाज्यांच्या १०० गाड्या उभ्या राहतात. त्या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचे पालन होत नाही. हिंमत असेल तर त्या ठिकाणी कर्मचाऱ्यांनी दंडे उगारावेत आणि दडपशाही करावी, असे आव्हान महाजन यांनी दिले.
कॉटन मार्केटचे अडतिये दोन बाजारात विभागले आहेत. एकूण २४२ अडतियांपैकी १६० कळमना भाजी बाजारात तर ८२ अडतिये कॉटन मार्केटमध्ये व्यवसाय करीत आहेत. याची माहिती मनपा अधिकाऱ्यांना असतानाही त्यांनी सरसकट २४२ जणांची यादी तयार करून दरदिवशी ४० अडतियांना व्यवसायाची परवानगी दिली. त्यामुळे एका अडतियाचा व्यवसायाचा क्रमांक सात दिवसानंतर येणार आहे. पहिल्या दिवशी व्यवसाय केलेल्या अडतियाला दुसऱ्या दिवशी उधारी वसुलीसाठी बाजारात येण्यास प्रतिबंध आहे. वेळापत्रकानुसार व्यवसाय करण्याचे त्यांच्यावर निर्बंध घातले आहेत. शिवाय बाजारात दिसल्यास दंड वसूल करण्यात येणार आहे. मनपा अडतियांकडून त्याच्या गाळ्याचे महिन्याचे भाडे वसूल करते. मग अडतियांवर निर्बंध कशासाठी, असा सवाल असोसिएशनने केला आहे. याच कारणावरून मनपाने १२ जणांवर दंड ठोठावला. अडतिया असोसिएशनचे पदाधिकारी आणि स्थायी समितीचे माजी अध्यक्ष विठ्ठल भेदे यांच्याकडूनही दंड वसूल केला. कॉटन मार्केटचे अडतिये कळमना बाजारात व्यवसाय करीत असल्याची माहिती मनपाला दिली, पण ते ऐकण्याच्या तयारीत नाहीत. सरसकट २४० अडतियांचे वेळापत्रक तयार केल्याने कॉटन मार्केटमध्ये व्यवसाय करणाऱ्यांवर अडतियांवर अन्याय झाला आहे. कॉटन मार्केटमधील खऱ्यां ८२ अडतियांना दरदिवशी व्यवसाय करू द्यावा, अशी मागणी असोसिएशनचे अध्यक्ष शेख हुसेन आणि सचिव राम महाजन यांनी मनपा आयुक्तांकडे केली आहे.