नागपुरातील कॉटन मार्केट मंगळवारपासून सुरू होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2020 07:28 PM2020-05-17T19:28:00+5:302020-05-17T19:33:16+5:30

घाऊक भाजी विक्रीसाठी महात्मा फुले भाजी बाजार (कॉटन मार्केट) मंगळवार, १९ मे पासून सुरू करण्याचे आदेश मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी जारी केले आहेत. त्यानुसार पहाटे ४ ते सकाळी ८ या वेळेत कॉटन मार्केटमधील भाजीपाल्याची दुकाने सुरू राहतील.

The cotton market in Nagpur will start from Tuesday | नागपुरातील कॉटन मार्केट मंगळवारपासून सुरू होणार

नागपुरातील कॉटन मार्केट मंगळवारपासून सुरू होणार

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : घाऊक भाजी विक्रीसाठी महात्मा फुले भाजी बाजार (कॉटन मार्केट) मंगळवार, १९ मे पासून सुरू करण्याचे आदेश मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी जारी केले आहेत. त्यानुसार पहाटे ४ ते सकाळी ८ या वेळेत कॉटन मार्केटमधील भाजीपाल्याची दुकाने सुरू राहतील. नागपूर बाहेरून येणाऱ्या भाजीच्या वाहनांना रात्री ११ ते पहाटे ४ या वेळेतच कॉटन मार्केट परिसरात येण्याची परवानगी राहिल. विशेष म्हणजे, येथे किरकोळ विक्रीसाठी परवानगी नसून नागरिकांना त्यांच्या -त्यांच्या परिसरात किरकोळ विक्रेत्यांकडून भाजी खरेदी करता येईल, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.
कॉटन मार्केट हा शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेला महत्त्वाचा बाजार आहे. येथे व्यापारी, विक्रेते, ग्राहक यांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हे मार्केट बंद करण्यात आले होते. सद्यस्थितीत लॉकडाऊन कालावधीत कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गर्दी टाळणे, सामाजिक अंतर पाळणे आदी नियमांची प्रभावी अंमलबजावणी करीत घाऊक विक्रीला मंगळवार पासून दररोज पहाटे ४ ते सकाळी ८ या वेळेत परवानगी देण्यात आली आहे. लॉकडाऊन कालावधीत कॉटन मार्केटमधील विविध सेक्टर्समधील प्रत्येक दुकानदाराला आठवडयात एकच दिवस दुकान उघडून व्यवसाय करता येईल अशी व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच भाजीपाला वगळता या मार्केटमधील इतर जीवनावश्यक वस्तूंची दुकाने दररोज सकाळी ९ ते सायंकाळी ७ वाजतापर्यंत सुरू राहतील.

अटी व शर्तींचे पालन होणे आवश्यक
मनपा आयुक्तांनी दिलेल्या आदेशानुसार कॉटन मार्केट सुरू ठेवताना काही महत्वाच्या अटी व शर्तींचे पालन होणे आवश्यक आहे. त्यानुसार कोरोना विषाणू विषयक शासनाने निर्गमित केलेल्या आदेश व सूचनांचे पालन करणे बंधनकारक राहिल. तसेच मास्क व सॅनिटायजरचा वापर बंधनकारक राहिल. खरेदी करिता येणा-या ग्राहकांकडून सामाजिक अंतराचे पालन करून घेण्याची संपूर्ण जबाबदारी दुकानदारांची राहील, दुकानदाराला नेमून दिलेली जागा किंवा दुकानातच व्यवसाय करणे बंधनकारक राहिल, त्याला अतिरिक्त जागेचा वापर करता येणार नाही. एका दुकानदाराला भाजी विक्रीकरिता एकाच वाहनाची परवानगी राहील व सदर वाहन शहीद मैदान येथील वाहनतळावरच पार्क करावे लागेल. दुकानदारांना व सर्व संबंधितांना आपले वाहन भाजी मार्केटच्या क्षेत्रात नेता येणार नाही. सर्व घाऊक विक्रेत्यांनी त्यांना नेमून दिलेल्या जागा निर्धारित वेळेतच व्यवसाय करणे बंधनकारक राहिल.

 

Web Title: The cotton market in Nagpur will start from Tuesday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.