कॉटन मार्केट सुरू; विविध भागातील गर्दी कमी होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2020 10:08 PM2020-05-18T22:08:03+5:302020-05-18T22:09:22+5:30
घाऊक भाजी विक्रीसाठी महात्मा फुले भाजी बाजार (कॉटन मार्केट) आज, मंगळवारपासून सुरू होत असल्याने शहरातील विविध भागात होणारी घाऊक भाजी विक्रेत्यांची गर्दी कमी होणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : घाऊक भाजी विक्रीसाठी महात्मा फुले भाजी बाजार (कॉटन मार्केट) आज, मंगळवारपासून सुरू होत असल्याने शहरातील विविध भागात होणारी घाऊक भाजी विक्रेत्यांची गर्दी कमी होणार आहे.
कॉटन मार्केट मागील काही दिवसांपासून बंद असल्याने शेतकरी व घाऊक भाजी विक्रेते रिंगरोड व वस्त्यात वाहने उभी करून भाजीपाला विक्री करत होते. भाजीपाला खरेदीसाठी छोट्या विक्रेत्यांसोबतच नागरिक गर्दी करत होते. यामुळे कोरोना संसर्ग होण्याचा धोका असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
मनपा प्रशासनाने मंगळवारपासून कॉटन मार्केट सुरू करण्याचे आदेश जारी केले आहेत. त्यानुसार पहाटे ४ ते सकाळी ८ या वेळेत कॉटन मार्केटमधील भाजीपाल्याची दुकाने सुरू राहतील. नागपूर बाहेरून येणाऱ्या भाजीच्या वाहनांना रात्री ११ ते पहाटे ४ या वेळेतच कॉटन मार्केट परिसरात येण्याची परवानगी राहिल. विशेष म्हणजे, येथे किरकोळ विक्रीसाठी परवानगी नसून नागरिकांना त्यांच्या त्यांच्या परिसरात किरकोळ विक्रेत्यांकडून भाजी खरेदी करता येईल, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.
शेतकरी व व्यापाऱ्यांना दिलासा
मार्केट हा शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेला महत्त्वाचा बाजार आहे. येथे शेतकरी व घाऊक व्यापारी भाजीपाला विक्रीसाठी आणतात मार्केट सुरू करण्याची त्यांची मागणी होती. मार्केट सुरू झाल्याने त्यांना दिलासा मिळाला आहे.
अटी व शर्तींचे पालन होणे आवश्यक
मनपा आयुक्तांनी दिलेल्या आदेशानुसार कॉटन मार्केट सुरू ठेवताना काही महत्त्वाच्या अटी व शर्तींचे पालन होणे आवश्यक आहे. त्यानुसार मास्क व सॅनिटायझरचा वापर बंधनकारक राहील. खरेदीकरिता येणाºया ग्राहकांकडून सामाजिक अंतराचे पालन करून घेण्याची संपूर्ण जबाबदारी दुकानदारांची राहील, दुकानदाराला नेमून दिलेली जागा किंवा दुकानातच व्यवसाय करणे बंधनकारक राहील, त्याला अतिरिक्त जागेचा वापर करता येणार नाही. एका दुकानदाराला भाजी विक्रीकरिता एकाच वाहनाची परवानगी राहील व सदर वाहन शहीद मैदान येथील वाहनतळावरच पार्क करावे लागेल.