नक्षलवाद्यांनी केलेली पत्रू दुर्गेची हत्या दलित अत्याचार होऊ शकते का?

By admin | Published: September 15, 2015 06:10 AM2015-09-15T06:10:48+5:302015-09-15T06:10:48+5:30

गावाच्या विकासासाठी लढणाऱ्या पत्रू दुर्गे या दलित नेत्याची नक्षलवाद्यांनी केलेली हत्या ही दलित अत्याचाराची

Could Naxalite kill Dalit girl's murder? | नक्षलवाद्यांनी केलेली पत्रू दुर्गेची हत्या दलित अत्याचार होऊ शकते का?

नक्षलवाद्यांनी केलेली पत्रू दुर्गेची हत्या दलित अत्याचार होऊ शकते का?

Next

नागपूर : गावाच्या विकासासाठी लढणाऱ्या पत्रू दुर्गे या दलित नेत्याची नक्षलवाद्यांनी केलेली हत्या ही दलित अत्याचाराची घटना होऊ शकते का? असा प्रश्न सध्या अनुसूचित जाती-जनजाती आयोगासमोर उभा ठाकला आहे. भूमकाल संघटनेने केलेल्या तक्रारीच्या आधारावर या अतिशय गुंतागुंतीच्या प्रश्नावर आयोगासमोर सोमवारी पहिली सुनावणी झाली.
नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यातील दामरंचा हे इंद्रावती नदीच्या तिरावर वसलेले गाव आहे. या गावात पत्रू दुर्गे नावाचे एक दलित कार्यकर्ते राहत होते. त्या परिसरातील ते एक ज्येष्ठ दलित कार्यकर्र्ते असून त्यांना चांगला मान होता. एकप्रकारे ते त्या परिसरातील नेते होते. आपल्या गावाच्या विकासासाठी गावात उपसा सिंचन योजना यावी, यासाठी ते प्रयत्नशील होते. ही योजना गावात यावी यासाठी त्यांनी शासन दरबारी अनेक निवेदने केली. थेट मुख्यमंत्र्यांना भेटून आले. या योजनेसाठी त्यांनी लोकांनाही संघटित केले होते. परंतु ही बाब नक्षलवाद्यांना खटकली. १९ एप्रिल रोजी १५ ते २० नक्षलवाद्यांनी गावात जाऊन पत्रू दुर्गे यांचा निर्घृण खून केला.
यासंदर्भात भूमकाल संघटनेने अनुसूचित जाती -जनजाती आयोगाला तक्रार दाखल केली आणि पत्रू दुर्गे याची नक्षलवाद्यांनी केलेली हत्या ही दलित अत्याचार म्हणून घोषित करण्याची मागणी केली. या तक्रारीच्या आधारावर विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात अनुसूचित जाती जनजाती आयोगाचे अध्यक्ष सी.एस. थुल यांच्यासमोर सोमवारी सुनावणी झाली. सुनावणी दरम्यान दिवंगत पत्रू दुर्गे यांचा मुलगा पृथ्वीराज दुर्गे, भूमकाल संघटनेतर्फे दत्ता शिर्के, अरविंद सोवनी आणि गडचिरोली पोलिसांतर्फे डीवायएसपी गणेश बिरादार हे उपस्थित होते.
सुनावणीदरम्यान मृताचा मुलगा पृथ्वीराज याने सांगितले की, माझे वडील हे दामरंचा व कमलापूर या भागातील दलित जनतेचे प्रश्न मांडायचे. समाजाला संघटित करण्याचा ते प्रयत्न करायचे. त्यामुळे त्यांची हत्या ही दलित हत्याच होय.
तक्रारकर्त्या भूमकाल संघटनेतर्फे प्रा. अरविंद सोवनी यांनी आपली बाजू मांडतांना सांगितले की, आरोपी एका प्रतिबंधित पक्षाचे सदस्य होते. त्यांनी आपल्या नेत्याच्या आदेशावरून हत्या केली होती. त्यामुळे त्यांची ओळख महत्त्वाची नसून त्यांचा हेतू महत्त्वाचा आहे. या हत्येमागे त्यांचा हेतू हा होता की पत्रू दुर्गेच्या निमित्ताने विकासाची कास धरलेला व संघटित होणारा या भागातील दलित समाज धाकाने चूप बसेल. एकंदर हे या भागातील दलित समाजाला धमकावण्याचेच प्रकरण आहे. त्यामुळे हे दलित अत्याचाराचे प्रकरण आहे, अशी मांडणी त्यांनी केली. डीवायएसपी बिरादार यांनी सांगितले की, मूळ एफआयआरमध्ये अनुसूचित जाती जनजाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याची कलमे नसली तरी नंतर पत्रू दुर्गे प्रकरणाच्या या बाजूची दखल पोलिसांनी घेतली आहे. त्यांनी यासंदर्भातील कागदपत्रे आयोगासमोर सादर केली. १० ते १५ नक्षलवाद्यांचा या हत्येत सहभाग आहे. मात्र सर्वांनी ओळख पटलेली नाही, असेही त्यांनी सांगितले.
यावर आयोगाचे अध्यक्ष एस.सी. थूल यांनी गडचिरोली पोलिसांनी तीन आठवड्यात उर्वरित नक्षलींची ओळख पटवावी, असे निर्देश दिले. नक्षलवाद्यांची ओळख पटविल्यानंतरच हे जातीय अत्याचाराचे प्रकरण आहे किंवा नाही, याची शहानिशा करता येईल, असेही थूल यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: Could Naxalite kill Dalit girl's murder?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.