‘रिसर्च रिसर्जन्स’ वर ११ पासून परिषद
By Admin | Published: February 9, 2016 03:02 AM2016-02-09T03:02:06+5:302016-02-09T03:02:06+5:30
विद्यापीठ व शैक्षणिक संस्थांमध्ये संशोधनाला प्रोत्साहन देण्यासाठी नागपुरात एक चांगली सुरुवात होणार आहे.
स्मृती इराणी यांच्या हस्ते होणार उद्घाटन : संशोधनाला प्रोत्साहन देण्यासाठी होणार मंथन
नागपूर : विद्यापीठ व शैक्षणिक संस्थांमध्ये संशोधनाला प्रोत्साहन देण्यासाठी नागपुरात एक चांगली सुरुवात होणार आहे. यासाठी विदर्भातील विद्यापीठ व औद्योगिक संस्थांच्या समन्वयातून ‘रिसर्च रिसर्जन्स’ नावाने आंतरराष्ट्रीय परिषद ११ फेब्रुवारीपासून विश्वेश्वरय्या राष्ट्रीय अभियांत्रिकी संस्थेत आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांनी सोमवारी पत्रपरिषदेत दिली.
परिषदेचे उद्घाटन केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्री स्मृती इराणी यांच्याहस्ते होणार आहे. कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षणतज्ज्ञ अनिरुद्ध देशपांडे प्रामुख्याने उपस्थित राहणार आहे. परिषदेत कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ, राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था (नीरी), डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, व्हीएनआयटी, गोंडवाना विद्यापीठ यांचाही सहभाग आहे. परिषदेच्या दुसऱ्या दिवशी १२ फेब्रुवारीला ‘शिक्षणात संशोधन आणि नाविन्यता’ या विषयावर केंद्रीय पर्यावरण, वनमंत्री प्रकाश जावडेकर आपले विचार व्यक्त करतील. याशिवाय ‘शैक्षणिक संशोधनात समाजाचा सहभाग’ याविषयावर सिंचनतज्ज्ञ माधव चितळे आपले विचार व्यक्त करतील. १३ फेब्रुवारीला भाभा आॅटोमिक रिसर्च सेंटरचे डॉ.बी.एन. जगताप, डॉ.दातुक, इस्रोचे शास्त्रज्ज्ञ माधवन नायर, नीरीचे माजी संचालक डॉ. सतीश वटे हे ‘विज्ञान जगहिताय’ या विषयावर विचार व्यक्त करतील. दुपारी ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ एस. गुरुमूर्ती ‘आयडिया आॅफ रिसर्जन्स’ या विषयावर मार्गदर्शन करतील. सायंकाळी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी, नीती आयोगाचे सदस्य व्ही.के. सारस्वत, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत आंतरराष्ट्रीय परिषदेचा समारोप होईल. पत्रकार परिषदेला कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. उमा वैद्य, कुलसचिव डॉ. अरविंद जोशी, व्हीएनआयटीच्या गव्हर्निंग कौन्सिलचे अध्यक्ष विश्राम जामदार, संचालक डॉ. नरेंद्र जाधव, भारतीय शिक्षण मंडळाचे मुकुल कानिटकर, डॉ. सत्यवान मेश्राम, डॉ. उज्ज्वला चक्रदेव, डॉ. लीना गहाणे उपस्थित होत्या. (प्रतिनिधी)