समुपदेशन व संगीतातून उलगडले विवाह अनुबंधाचे मर्म
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2019 12:17 AM2019-04-26T00:17:42+5:302019-04-26T00:18:29+5:30
तारुण्याच्या वळणावरील विवाह हा एकीकडे मधुर वाटणारा पण तेवढाच अवघड सोहळा. विवाह, मग तो पारंपरिक पद्धतीने ठरला असो किंवा प्रेमविवाह असो, तो दोन जीवांसोबत दोन कुटुंबांना परस्परांशी जोडणारा रेशीमबंध असतो. मात्र हे रेशीमबंध चिरकाल टिकून राहण्यासाठी विश्वास, त्याग, समंजसपणा आवश्यक असतो. बऱ्याच सिनेगीतांमधून हा अनुबंध मांडला गेला आहे. विवाहाच्या रेशीमगाठीचे मर्म तज्ज्ञांचे समुपदेशन आणि सोबत चालणाऱ्या संगीतातून उलगडत गेले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : तारुण्याच्या वळणावरील विवाह हा एकीकडे मधुर वाटणारा पण तेवढाच अवघड सोहळा. विवाह, मग तो पारंपरिक पद्धतीने ठरला असो किंवा प्रेमविवाह असो, तो दोन जीवांसोबत दोन कुटुंबांना परस्परांशी जोडणारा रेशीमबंध असतो. मात्र हे रेशीमबंध चिरकाल टिकून राहण्यासाठी विश्वास, त्याग, समंजसपणा आवश्यक असतो. बऱ्याच सिनेगीतांमधून हा अनुबंध मांडला गेला आहे. विवाहाच्या रेशीमगाठीचे मर्म तज्ज्ञांचे समुपदेशन आणि सोबत चालणाऱ्या संगीतातून उलगडत गेले.
रिद्धी-सिद्धी या सामाजिक संस्थेच्यावतीने वैवाहिक जीवनाचे गुपित उलगडणाऱ्या ‘जुळून येती रेशीमगाठी’ या अनोख्या मार्गदर्शक कार्यक्रमाचे गुरुवारी सायंटिफिक सभागृह, लक्ष्मीनगर येथे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची संकल्पना ऋतुराज संस्थेच्या संचालिका मुग्धा तापस यांची होती. दाम्पत्य जीवन सुखकर ठेवण्यासाठी प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ. शैलेश पानगावकर आणि मानसशास्त्रज्ञ डॉ. स्वाती धर्माधिकारी यांचे मार्गदर्शन व त्याला सांगितीक फोडणी हे या कार्यक्रमाचे विशेषत्व ठरले. जीवनात जन्मत:च मिळालेली नाती आपण सहज स्वीकारतो. विवाहानंतर जुळलेले नातेसंबंध स्वीकारताना व ते निभावताना साहचर्य व सामंजस्य आवश्यक असते. विवाहाच्या संदर्भात आजपर्यंत अनेक स्थित्यंतरे आली. पूर्वी समाजात बालविवाह प्रचलित होते. पुढे कुटुंबातील ज्येष्ठ सदस्यांद्वारे वधू-वर ठरविण्याची परंपरा चालली. त्यानंतर प्रेमविवाहाचा आणि आतातर लग्नाशिवाय एकमेकांसोबत राहण्याचे ‘लिव्ह इन रिलेशन’ पर्यंतचे परिवर्तन समाजाने अनुभवले आहे. डॉ. पानगावकर व डॉ. धर्माधिकारी यांनी याबाबत सुरुवातीला मांडणी केली. लग्नासाठी तरुण-तरुणींची मानसिक तयारी, विवाहानंतर जबाबदाऱ्यांची जाणीव, परस्परांच्या अपेक्षापूर्तींसाठी स्वभावात, जीवनशैलीत करावा लागणारा बदल, आर्थिक गरजा व सवयीबद्दल संपूर्ण जाणीव अशा यशस्वी वैवाहिक जीवनाच्या गोष्टी त्यांनी सांगितल्या. मनात जुळणाऱ्या रेशीमगाठींसह उमलणारे प्रेम, लैंगिक संबंधाचे ज्ञान तसेच शारीरिक व मानसिक सुखापर्यंतचे मार्गदर्शन दोन्ही तज्ज्ञांनी केले.
या मार्गदर्शनासह संगीताची मेजवानी प्रेक्षकांना मिळाली. गायक गुणवंत घटवई, मुकुल पांडे, मंजिरी वैद्य-अय्यर, श्रुती चौधरी या गायकांनी विवाह अनुबंधातील मनाशी संबंधित अनेक श्रवणीय गाणी सादर केली. ‘खंडेरायाच्या लग्नाला बानू नवरी नटली..., म्हातारा न इतुका अवघे पाऊणशे वयमान..., नवरवर कृष्णासमान..., प्रथम तुझ पाहता...’ अशा मराठी गीतांसह ‘घडी घडी मेरा दिल धडके..., ऐ मेरी जोहराजबी..., तेरे बिना जिंदगीसे..., जिंदगी प्यार का गीत है...’ अशी अर्थभावपूर्ण गाणी कलावंतांनी सादर केली.
गोविंद गडीकर, परिमल जोशी, मोरेश्वर दहासहस्र, विशाल दहासहस्र, मुग्धा तापस या वाद्यवृंदांची साथसंगत कार्यक्रमात होती. निवेदन किशोर गलांडे यांनी केले. मार्गदर्शन आणि संगीत असा मेळ असलेल्या या कार्यक्रमाचे संयोजन सिद्धी-सिद्धी संस्थेचे डॉ. संजय धोटे यांनी केले. यावेळी महापौर नंदा जिचकार, दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राचे संचालक डॉ. दीपक खिरवडकर, प्रा. राजीव हडप, भय्याजी रोकडे, शरयू तायवाडे, डॉ. विजय धोटे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.