बनावट नोटा छापणाऱ्या टोळीचा छडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 04:08 AM2021-03-27T04:08:00+5:302021-03-27T04:08:00+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : बनावट नोटा चलनात आणणाऱ्या एका टोळीला गणेशपेठ पोलिसांनी अटक केली. या टोळीकडून शंभर रुपयांच्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बनावट नोटा चलनात आणणाऱ्या एका टोळीला गणेशपेठ पोलिसांनी अटक केली. या टोळीकडून शंभर रुपयांच्या १०२ बनावट नोटा, मोबाइल, इनोव्हा कारसह आठ लाख, चोवीस हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
जावेद सय्यद हुसेन सय्यद, शेख समीर शेख सलीम, मिर्झा समीर बेग सरफराज बेग, नीलेश शालिकराम मोढारिया, अब्दुल आदिल अब्दुल वहाब आणि अब्दुल तौसिफ अब्दुल कलीम अशी या टोळीतील आरोपींची नावे आहेत.
या टोळीतील दोघे जण १९ मार्चला पहाटे तीन वाजता नागपुरात शंभर रुपयांच्या बनावट नोटा विकण्यासाठी येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यामुळे गांधीसागर तलावाजवळच्या टिळक पुतळा चौकात पोलिसांनी सापळा लावला. तेथे आरोपी जावेद सय्यद हुसेन सय्यद आणि शेख समीर शेख सलीम हे दोघे पोलिसांच्या जाळ्यात अडकले. त्यांच्याकडून पोलिसांनी शंभराच्या एकशे दोन बनावट नोटा जप्त केल्या. चौकशीत या दोघांनी उपरोक्त चार साथीदारांची नावे सांगितली. त्यामुळे त्यांनाही अटक करण्यात आली. त्यांच्याकडून ४ मोबाइल, एक इनोव्हा, एक ॲक्टिवा तसेच नोटा छापण्यासाठी वापरला जाणारा कलर प्रिंटर असा एकूण आठ लाख चोवीस हजार तीनशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. आरोपी सध्या पोलीस कोठडीत आहेत.
ही कारवाई परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त लोहित मतानी, सहायक आयुक्त परदेशी, गणेशपेठचे ठाणेदार भारत क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आर. पवार, एपीआय आर. एस. मुलानी, हवालदार पंकज बोराटे, चिमोटे, नायक दिनेश भांगे, पंकज मानकर, प्रशांत गजभिये, अंकुश चौधरी, योगेश, प्रवीण, राजन यादव आणि साजीद खान आदींनी बजावली.
---
अमरावती चंद्रपुरातही नेटवर्क
बनावट नोटा चलनात आणणाऱ्या या टोळीचे चंद्रपूर आणि अमरावतीतही नेटवर्क असल्याचे चौकशीत स्पष्ट झाले आहे. या टोळीने काही दिवसांपूर्वी अमरावतीत अशाच प्रकारे बनावट नोटा चालवल्या. एका पानठेला चालकाच्या लक्षात आल्यामुळे त्याने नोटा चालवण्याकडे धाव घेतली. त्यामुळे तो आणि ही टोळी नागपुरात पळून आली.
---
पाच हजार द्या, १० हजार घ्या!
ही टोळी पाच हजारांच्या अस्सल नोटा घेऊन बदल्यात १० हजारांच्या नकली नोटा देतात. नवीन नोट असल्यामुळे ती बनावट असल्याचा संशय कोणाला येत नाही. त्यामुळे गेल्या नऊ महिन्यांपासून या टोळीचा गोरखधंदा जोरात सुरू होता, अशीही माहिती पुढे आली आहे.
---