२४ तासानंतरही बॉटल्सची मोजणी सुरूच
By admin | Published: January 1, 2017 03:02 AM2017-01-01T03:02:57+5:302017-01-01T03:02:57+5:30
नागपूर रेल्वेस्थानकावर शुक्रवारी रात्री आलेल्या दोन रेल्वेगाड्यांच्या पार्सल बोगीतून जप्त केलेल्या महागड्या विदेशी ब्रॅण्डच्या दारूची मोजणी २४ तासानंतरही
महागडी विदेशी दारू : दोन रेल्वेगाड्यांतून केली होती जप्त
नागपूर : नागपूर रेल्वेस्थानकावर शुक्रवारी रात्री आलेल्या दोन रेल्वेगाड्यांच्या पार्सल बोगीतून जप्त केलेल्या महागड्या विदेशी ब्रॅण्डच्या दारूची मोजणी २४ तासानंतरही रेल्वे सुरक्षा दलातर्फे (आरपीएफ) सुरूच आहे. यामुळे या दारूची किंमत एक कोटीपेक्षा अधिक असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दारूच्या बाटल्यांची मोजणी आणि वजन पूर्ण झाल्यानंतर स्थिती स्पष्ट होणार आहे.
दारूच्या तस्करी प्रकरणात रेल्वे सुरक्षा दल आणि मध्य रेल्वे नागपूर विभागाच्या वाणिज्य विभागाने आवश्यक कागदपत्रांची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर रेल्वेच्या पार्सल बोगीतून दारूची वाहतूक करता येऊ शकते हे स्पष्ट केले. परंतु या प्रकरणात असे करण्यात आले नसल्याची शंका निर्माण झाली आहे. थर्टी फर्स्टच्या पार्टीसाठी रेल्वेगाड्यांतून मोठ्या प्रमाणात दारूची तस्करी होणार असल्याची गुप्त माहिती आरपीएफला मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे रेल्वेगाडी क्रमांक १२६१६ दिल्ली-चेन्नई जीटी एक्स्प्रेस रात्री ८.०५ वाजता नागपूर रेल्वेस्थानकाच्या प्लॅटफार्म क्रमांक दोनवर येताच आरपीएफच्या चमूने या गाडीच्या पार्सल बोगीची तपासणी सुरू केली. या बोगीतून ७९ पेट्या महागडी विदेशी दारू खाली उतरविण्यात आली. त्यानंतर ही गाडी पुढील प्रवासासाठी रवाना करण्यात आली. त्यानंतर लगेचच प्लॅटफार्म क्रमांक दोनवर रेल्वेगाडी क्रमांक १२६२२ दिल्ली-चेन्नई तामिळनाडू एक्स्प्रेसच्या पार्सल बोगीची तपासणी करण्यात आली.
या बोगीतूनही महागड्या विदेशी दारूच्या ११८ पेट्या उतरविण्यात आल्या. सुरुवातीला या दारूच्या पेट्यांची किंमत कोट्यवधी रुपये असण्याची शक्यता वर्तवण्यात आली. परंतु २४ तासानंतरही दारूच्या बाटल्यांची मोजणी आणि वजन करणे सुरूच असल्यामुळे ही दारू किती रुपयांची आहे हे स्पष्ट होऊ शकले नाही. (प्रतिनिधी)
चेन्नईच्या फाईव्ह स्टार हॉटेलने मागविली दारू
‘आरपीएफ’चे कमांडंट ज्योती कुमार सतीजा यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, विदेशातून इंटरनॅशनल ब्रॅण्डची महागडी दारु दिल्लीला आणून दिल्लीतील एस्प्री ही बॉटलिंग कंपनी आॅर्डरनुसार दारूच्या पेट्या रस्ते किंवा रेल्वे मार्गाने पाठविते. या कंपनीला चेन्नईच्या फाईव्ह स्टार हॉटेलने आॅर्डर दिली. ही आॅर्डर पूर्ण करण्यासाठी एस्प्री कंपनीने दिल्लीच्या ‘ग्लोबल’ नावाच्या परिवहन कंपनीला दारूच्या वाहतुकीचे काम सोपविले. परंतु कंपनीने हे काम दिल्लीच्या एका रेल्वे लीज होल्डरला दिले. या लीड होल्डरने जीटी एक्स्प्रेस आणि तामिळनाडू एक्स्प्रेसच्या पार्सल बोगीतून ही महागडी दारू पाठविली. परंतु पार्सलच्या पेट्यात दारू आहे हे सांगितले नाही. एक्साईज ड्युटी वाचविण्यासाठी त्याने असे केल्याची शंका आहे. आरपीएफची आता केंद्रीय आणि राज्य उत्पादन शुल्क विभाग, रेल्वे वाणिज्य विभागाशी बोलणी सुरू आहे. सध्या जप्त केलेली दारू आरपीएफच्या ताब्यात आहे. रेल्वे अॅक्टनुसार फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल होत आहे.
परवानगी होती तर लपवाछपवी का ?
‘सिनिअर डीसीएम’ कुश किशोर मिश्रा यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, पार्सल बोगीतून दारूची वाहतूक शक्य आहे. त्यासाठी ज्या रेल्वेस्थानकावर दारू रेल्वेत टाकण्यात आली तेथील राज्य उत्पादन शुल्क विभागाची मंजुरी आवश्यक आहे. या मंजुरीचे कागदपत्र पार्सल कार्यालयात देणे आवश्यक आहे. सोबतच बुकिंग अर्जात पार्सलमध्ये काय आहे हे लिहिणे गरजेचे आहे. परंतु या प्रकरणात असे काहीच करण्यात आले नाही. याची सूचना दिल्ली रेल्वेला देण्यात आली आहे. दिल्ली रेल्वेतर्फे संबंधीत लीज होल्डरच्या विरुद्ध प्रती रेल्वे ५५ हजार रुपये (५० हजार चुकीची माहिती देणे आणि ५ हजार रेल्वे थांबविण्यासाठी) दंडात्मक कारवाई होऊ शकते. या हिशेबाने त्याच्याकडून १.१० लाख रुपये वसूल करून त्याचे कंत्राटही रद्द होऊ शकते.
नामवंत विदेशी
ब्रॅण्डची दारु
आरपीएफने जीटी एक्स्प्रेसमधून ७० आणि तामिळनाडू एक्स्प्रेसमधून ११८ दारूच्या पेट्या जप्त केल्या. जप्त केलेली दारू नामवंत विदेशी ब्रॅण्डची आहे. दिवसभर दारूची मोजणी सुरु होती. परंतु ही दारू किती रुपयांची आहे हे स्पष्ट होऊ शकले नाही. दुसरीकडे ग्लोबल नावाच्या परिवहन कंपनीचे अमित आणि संयम नावाचे दोन कर्मचारी शनिवारी आरपीएफ ठाण्यात पोहोचले. त्यांनी उत्पादन शुल्क आणि इतर विभागांचे कागदपत्र आरपीएफला सादर केले.