मतमोजणी ‘सुपरफास्ट’

By admin | Published: June 25, 2014 01:27 AM2014-06-25T01:27:38+5:302014-06-25T01:27:38+5:30

पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीची मतमोजणी गतीने पूर्ण करण्यात प्रशासनाला यश आले. त्यामुळेच वेळेआधी निकाल जाहीर झाला.

Counting of Superfast | मतमोजणी ‘सुपरफास्ट’

मतमोजणी ‘सुपरफास्ट’

Next

नागपूर : पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीची मतमोजणी गतीने पूर्ण करण्यात प्रशासनाला यश आले. त्यामुळेच वेळेआधी निकाल जाहीर झाला.
मतमोजणीची प्रक्रिया आणि त्यासाठी अवलंबिण्यात येणारी पद्धत लक्षात घेता मतमोजणीला विलंब लागेल, अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. प्रशासनाकडूनही याला दुजोरा देण्यात येत होता. यापूर्वीच्या मतमोजणीचा अनुभव लक्षात घेता यावेळीही निकाल जाहीर होण्यास रात्र होईल, अशी शक्यता होती. मात्र प्रत्यक्षात सायंकाळी ६ पर्यंतच मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण करण्यात प्रशासनाला यश आले. सकाळी ८ वाजता सिव्हिल लाईन्समधील प्रोव्हिडन्स स्कूलच्या सभागृहात प्रक्रियेला सुरुवात झाली. दुपारी १२ वाजेपासून प्रत्यक्ष मतमोजणी सुरू झाली. दुपारी २.४० पर्यंत तीन फेऱ्यांची मोजणी झाली होती. सायं. ५ वाजता अखेरची फेरी पूर्ण झाली. विभागीय आयुक्तांनी प्रत्यक्ष निकाल नंतर जाहीर केला असला तरी, त्यापूर्वीच मोजणीची सर्व प्रक्रिया पूर्ण झाली होती. मतमोजणीसाठी दोन रांगेत प्रत्येकी १२ असे एकूण २४ टेबल लावण्यात आले होते. प्रत्येक टेबलवर प्रत्येक उमेदवाराच्या नावाने एक बॉक्स ठेवण्यात आला होता. प्रत्येक फेरीत प्रत्येक टेबलवर १ हजार मतांची याप्रमाणे एकूण २४ हजार मतांची एकाच वेळी मोजणी करण्यात आली.
विभागीय आयुक्त व निवडणूक निर्णय अधिकारी अनुपकुमार यांच्यासह मतदारसंघातील नागपूरसह सहाही जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यावेळी उपस्थित होते. नागपूरचे जिल्हाधिकारी अभिषेक कृष्णा, उपायुक्त आप्पासाहेब धुळाज, नागपूरचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रदीप डांगे यांच्यासह नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयातील इतरही अधिकाऱ्यांची चमू यावेळी कार्यरत होती. विशेष म्हणजे अनुपकुमार हे स्वत: लक्ष ठेवून होते. पोलीस बंदोबस्त चोख होता. वेळेत मतमोजणी झाल्याने कर्मचारीही रिलॅक्स होते. एकीकडे मतमोजणी सुरू असताना दुसरीकडे निवडणूक कर्मचाऱ्यांना त्यांच्या मानधनाचेही वाटप करण्यात येत होते.

Web Title: Counting of Superfast

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.