नागपुरात मतमोजणी, निकालानिमित्त चोख बंदोबस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2019 08:33 PM2019-05-22T20:33:36+5:302019-05-22T20:46:01+5:30
लोकसभा निवडणुकीच्या निकालाला काही तासांचा अवधी उरल्यामुळे नेते-कार्यकर्तेच नव्हे तर सर्वसामान्य मतदारांची उत्सुकताही टोकाला पोहचली आहे. विविध राजकीय पक्षांचा उत्साह आणि एकूणच स्थिती लक्षात घेता निकालादरम्यान किंवा निकालानंतर उपराजधानीत कसलीही अनुचित घटना घडू नये आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी उपराजधानीत चोख बंदोबस्त लावला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लोकसभा निवडणुकीच्या निकालाला काही तासांचा अवधी उरल्यामुळे नेते-कार्यकर्तेच नव्हे तर सर्वसामान्य मतदारांची उत्सुकताही टोकाला पोहचली आहे. विविध राजकीय पक्षांचा उत्साह आणि एकूणच स्थिती लक्षात घेता निकालादरम्यान किंवा निकालानंतर उपराजधानीत कसलीही अनुचित घटना घडू नये आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी उपराजधानीत चोख बंदोबस्त लावला आहे.
मतमोजणी दिवसाच्या पूर्वसंध्येपासूनच शहरात पोलिसांनी गस्त, नाकेबंदी सुरू केली आहे. कसलीही गडबड गोंधळ होऊ नये म्हणून पोलिसांनी सुरक्षेची त्रिस्तरीय व्यवस्था केली आहे. त्यानुसार, कळमना मार्केट मतमोजणी केंद्राभोवती पोलिसांचा गराडा राहणार आहे. स्ट्राँग रूम ते मतमोजणी केंद्रापर्यंत ईव्हीएम घेऊन जाणाऱ्या वाहनांभोवती सशस्त्र पोलीस राहणार आहेत. मतमोजणी केंद्राच्या आत-बाहेर सीआरपीएफ, आरपीएफचे सशस्त्र जवान राहणार आहे. या भागात मंगळवारपासूनच बॉम्बशोधक आणि नाशक पथक वारंवार कसून तपासणी करीत आहे. कोणत्याही स्थितीचा सामना करण्यासाठी ऐनवेळी धावपळ उडू नये म्हणून चार दंगा नियंत्रण पथके, शीघ्र कृती दलाचे कमांडो, वरुण आणि वज्र ही वाहनेही मतमोजणी केंद्राच्या परिसरात तैनात करण्यात आली आहे. बुधवारी सायंकाळपासून शहराला जोडणाऱ्या सर्व मार्गावर पोलिसांनी संशयास्पद वाहन आणि व्यक्तींची तपासणी करण्यासाठी नाकेबंदी सुरू केली.
वाहतुकीवरही लक्ष
मतमोजणी दरम्यान, विविध मार्गावर होणाºया कार्यकर्त्यांच्या गर्दीमुळे वाहतूक व्यवस्थेत अडसर निर्माण होणार नाही, याचीही काळजी घेतली जात असून, त्यासाठी वाहतूक शाखेचे ८ निरीक्षक, १० सहायक आणि उपनिरीक्षक तसेच १४१ पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहे. विविध राजकीय पक्षांची कार्यालये, उमेदवारांची निवासस्थाने आणि चौका-चौकात मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.
मतमोजणीच्या दिवशी सकाळपासून तो निकाल लागल्याच्या काही तासानंतर पोलीस आयुक्त, सहआयुक्त, अतिरिक्त आयुक्त, सर्व उपायुक्तांसह प्रत्येक ठाण्याच्या कार्यक्षेत्रात पोलीस अधिकारी-कर्मचारी रस्त्यावर राहणार आहे. संवेदनशील स्थळे आणि वस्त्यांमध्येही कडक बंदोबस्त लावण्यात आला आहे. कोणत्या ठिकाणी काही गडबड गोंधळ झाला की पाच मिनिटांच्या आत तेथे पोलीस पथके दाखल होतील आणि परिस्थिती हाताळतील, अशी व्यवस्था करण्यात आली आहे.
आयुक्तांचे आवाहन
मतमोजणी दरम्यान आणि निकालानंतर विजयी उमेदवारांच्या मिरवणुका निघतील. त्याचा मार्ग ठरवून देण्यात आला आहे. मार्गावरसुद्धा बंदोबस्त लावण्यात आला आहे. मतमोजणी दरम्यान किंवा निकालानंतर कोणत्याही राजकीय पक्षाच्या नेत्या-कार्यकर्त्यांनी नागपूर शहराच्या प्रतिमेला गालबोट लागणार नाही, याची काळजी घ्यावी. कुणीही कायदा हातात घेऊ नये, असे आवाहन पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी लोकमतच्या माध्यमातून केले आहे.
असे राहील बंदोबस्ताचे मनुष्यबळ
पोलीस उपायुक्त - ३
सहायक आयुक्त - १०
पोलीस निरीक्षक २३
सहायक निरीक्षक आणि उपनिरीक्षक -१०७
पोलीस कर्मचारी (महिला आणि पुरुष) १७४२