देशाने व आमच्या कुटुंबानेही कस्तुरबांवर अन्याय केला : तुषार गांधी भावुक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2019 10:42 PM2019-07-05T22:42:57+5:302019-07-05T22:45:30+5:30
कस्तुरबा गांधी यांना महात्मा गांधी यांची पत्नी म्हणूनच आतापर्यंत पाहिले गेले आहे. मात्र ‘बा’चे स्वतंत्र असे उत्तुंग व्यक्तिमत्त्व होते. बा यांनी अशिक्षित असूनही गांधीजींच्या खांद्याला खांदा लावून स्वातंत्र्य लढ्यात सक्रिय सहभाग घेतला. एवढेच नाही तर कुटुंबाची जबाबदारी सांभाळली. म्हणूनच महात्मा गांधी यांनी आपल्या प्रत्येक कृतीमागे बा प्रेरक असल्याचे नमूद केले आहे. गांधीजींना सर्वोच्च मानणाऱ्या बांच्या व्यक्तिमत्त्वावर देशाने आणि आमच्या कुटुंबानेही अन्याय केल्याची भावना गांधीजींचे पणतु तुषार गांधी यांनी व्यक्त केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कस्तुरबा गांधी यांना महात्मा गांधी यांची पत्नी म्हणूनच आतापर्यंत पाहिले गेले आहे. मात्र ‘बा’चे स्वतंत्र असे उत्तुंग व्यक्तिमत्त्व होते. बा यांनी अशिक्षित असूनही गांधीजींच्या खांद्याला खांदा लावून स्वातंत्र्य लढ्यात सक्रिय सहभाग घेतला. एवढेच नाही तर कुटुंबाची जबाबदारी सांभाळली. म्हणूनच महात्मा गांधी यांनी आपल्या प्रत्येक कृतीमागे बा प्रेरक असल्याचे नमूद केले आहे. गांधीजींना सर्वोच्च मानणाऱ्या बांच्या व्यक्तिमत्त्वावर देशाने आणि आमच्या कुटुंबानेही अन्याय केल्याची भावना गांधीजींचे पणतु तुषार गांधी यांनी व्यक्त केली.
दक्षिणायनच्यावतीने महात्मा गांधी व कस्तुरबा गांधी यांच्या दीडशेव्या जयंतीचे औचित्य साधून ‘कस्तुरबा गांधी : भारतीय स्त्रीत्वाचा आदर्श’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ संपादक व साहित्यिक सुरेश द्वादशीवार उपस्थित होते. यावेळी बोलताना तुषार गांधी यांनी कस्तुरबांच्या व्यक्तिमत्त्वाचे पैलू उलगडले. ते अनेकदा भावनिक होऊन गहिवरलेही. बालपणी गांधीजी अंधाराला घाबरणारे, नेहमी रडत राहणारे व प्रत्येक गोष्टीला भिणारे होते. घर जवळ असल्याने कस्तुरबांना याची माहिती होती. अशा मुलासोबत वयाच्या १३ व्या वर्षी घरच्यांच्या मर्जीनुसार त्यांनी लग्न केले. गांधीजी शिक्षणात, कमविण्यात अशा प्रत्येक गोष्टीत अपयशी ठरत होते. त्यावेळी घरची परिस्थिती नसताना माहेरून आणलेले दागिने विकून त्यांनी गांधीजींना वकिलीचे शिक्षण घेण्यास इंग्लंडला पाठविले. आफ्रिकेहून त्यांना बोलावणे आले. वकिलीचा व्यवसाय फुलत असताना अचानक गांधींनी अन्यायग्रस्तांचा लढा सुरू केला. कौटुंबिक दृष्टीने हा भलताच मार्ग होता पण बा यांनी यावेळीही गांधीजींना साथ दिली. एवढेच नाही तर त्यांच्यासोबत कारागृहात जाऊन यातनाही भोगल्या. त्यांचा विजय झाला होता. पण त्यांनी भारतात येण्याचा निर्णय घेतला.
आता गांधी नावाचे व्यक्तिमत्त्व बदलत होते. भारतात आल्यानंतर चंपारण्याचा लढा कस्तुरबा यांच्यामुळे यशस्वी ठरला. येथील जबाबदारी बा यांच्यावर टाकून गांधीजी बार्डोलीच्या लढ्याकडे वळले. पुढे पुढे ते स्वातंत्र्य लढ्याचे नायकही झाले. पण मोहनदासचा महात्मा होईपर्यंतच्या प्रवासात सोबत होती ती कस्तुरबा. स्वातंत्र्याच्या आंदोलनात त्या जेलमध्येही गेल्या. त्यांचा मृत्यूही कारागृहातच झाला.
नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी त्यांचा शहीद असा उल्लेख करीत ब्रिटिश सरकारने त्यांची हत्या केल्याचा आरोप केला होता. पण या शहीद वीरांगनेला आपला देश विसरल्याची खंत तुषार गांधी यांनी व्यक्त केली. सुरेश द्वादशीवार बोलताना म्हणाले, कस्तुरबांच्या व्यक्तिमत्त्वात विलक्षण ताकत होती. गांधींच्या पत्नी म्हणून नाही तर स्वतंत्र व्यक्तिमत्त्व म्हणून त्या मोठ्या होत्या. मात्र समाजाच्या करंटेपणामुळे त्यांचे मोठेपण दुर्लक्षित राहिल्याची टीका त्यांनीही व्यक्त केली. यावेळी ज्येष्ठ पत्रकार अविनाश दुधे यांनी संपादित केलेल्या ‘मीडिया वॉच : गांधी १५०’ या अंकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. संचालन प्रा. प्रमोद मुनघाटे यांनी केले.
गांधींचा खून दररोज
कुटुंबाचा सोडून समस्तांचा विचार करणाऱ्या गांधींच्या नीतीमुळे त्यांच्यात व मोठा मुलगा हिरालाल यांच्यामध्ये क्लेष निर्माण झाले. मुलाने घरदार सोडले, त्याचे आयुष्य उद्ध्वस्त झाले. अशा अनेक घटनांमुळे बा यांना प्रचंड वेदना झाल्या होत्या. तुषार गांधी म्हणाले, गांधीजींच्या विचारांना मारू पाहणारे त्यांचे टीकाकार या कौटुंबिक घटनांचे भांडवल करतात. अशा काही घटनांना तोडून मोडून त्यांना बदनाम करणाऱ्या पोस्ट दररोज आपल्या पेजवर येत असल्याचे त्यांनी सांगितले. गोडसेने गांधींना एकदा मारले पण ही माणसे दररोज त्यांचा खून करीत असल्याची उद्विग्न भावना त्यांनी व्यक्त केली.