देशात समान लोकसंख्या धोरण हवे
By admin | Published: October 24, 2015 03:03 AM2015-10-24T03:03:11+5:302015-10-24T03:03:11+5:30
भविष्यातील आव्हाने लक्षात घेता देशातील वाढत्या लोकसंख्येचे योग्य नियोजन कशा पद्धतीने होईल यासंदर्भात विचार करण्याची वेळ आली आहे.
नागपूर : भविष्यातील आव्हाने लक्षात घेता देशातील वाढत्या लोकसंख्येचे योग्य नियोजन कशा पद्धतीने होईल यासंदर्भात विचार करण्याची वेळ आली आहे. लोकसंख्येच्या असंतुलनामुळे समस्या निर्माण होऊ नये यासाठी मतांचे राजकारण दूर सारून देशात समान लोकसंख्या धोरण तयार करण्याची आवश्यकता असल्याचे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी व्यक्त केले. संघाचा शस्त्रपूजन व विजयादशमी उत्सव गुरुवारी रेशीमबाग मैदान येथे पार पडला, यावेळी ते बोलत होते. मुस्लिमांच्या वाढत्या लोकसंख्येवर चिंता व्यक्त करत देशात समान नागरी कायदा लागू करण्यात यावा ही मागणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून अनेकदा करण्यात आली आहे. येत्या काळात संघ हा मुद्दा लावून धरणार असल्याचे संकेतच सरसंघचालकांनी दिले आहेत.
देशाची लोकसंख्या वाढते आहे. ५० वर्षांनंतर ही लोकसंख्या ओझे होऊ नये व मनुष्यबळाचा योग्य वापर व्हावा यासाठी नियोजन करण्याची गरज आहे. समान लोकसंख्या धोरण शासन व कायद्याच्या आधारावर लागू होणार नाही, याचा स्वीकार करताना समाजाची मान्यता घेण्यासाठी प्रयत्न करावे लागतील असेदेखील ते म्हणाले. देशाची निवडणूक व्यवस्था, प्रशासन, कर व्यवस्था, उद्योग धोरण, शिक्षणप्रणाली तसेच कृषी धोरणात आमूलाग्र बदलाची गरज असल्याचेदेखील ते म्हणाले.
या कार्यक्रमाला ‘नीती’ आयोगाचे सदस्य डॉ. विजय कुमार सारस्वत यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ.सारस्वत यांनी देशाच्या प्रगतीसाठी कुठल्या गोष्टी आवश्यक आहेत यावर भाष्य केले. देशाची लोकसंख्या लक्षात घेता दुसऱ्या हरितक्रांतीची आवश्यकता असून कृषिमालाचे योग्य ‘मार्केटिंग’देखील आवश्यक असल्याचे ते म्हणाले. कृषी क्षेत्रात संशोधनासाठी वेगळ््या ‘आयआयटी’ची गरज असल्याचेदेखील त्यांनी प्रतिपादन केले. सरसंघचालकांच्या भाषणाअगोदर शस्त्रपूजन करण्यात आले. शिवाय प्रारंभी स्वयंसेवकांनी परिसरात संचलन केले तसेच निरनिराळ्या शारीरिक कवायती सादर केल्या. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी, महानगर संघचालक दिलीप लोया, महानगर सहसंघचालक श्रीधर गाडगे यांच्यासह हजारो स्वयंसेवक व नागरिकांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे संघाच्या संकेतस्थळावर तसेच दूरदर्शनवर थेट प्रक्षेपण करण्यात आले.(प्रतिनिधी)
मोदी सरकारला शाबासकी
भाषणाच्या सुरुवातीलाच सरसंघचालकांनी मोदी सरकारला शाबासकी दिली. गेल्या दोन वर्षांपासून देशात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. आंतरराष्ट्रीय संबंध अर्थव्यवस्था, राष्ट्राची सुरक्षा यासंदर्भात केंद्र सरकारच्या धोरणांमुळे विकसित व समर्थ भारताच्या निर्माणाचा विश्वास जनतेत उत्पन्न झाला आहे या शब्दांत सरसंघचालकांनी केंद्र शासनाचे कौतुकदेखील केले. विकास हा समन्वयातून व्हायला हवा. विविध योजन तळागाळापर्यंत पोहोचत आहेत का आढावा घेतला पाहिजे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे सर्वांशी संवाद साधला पाहिजे या शब्दांत मोदी सरकारला सल्लादेखील दिला.