देशातील सर्वात मोठी डिस्टिलरी नागपुरात: देवेंद्र फडणवीस
By मोरेश्वर मानापुरे | Published: February 23, 2024 08:56 PM2024-02-23T20:56:02+5:302024-02-23T20:56:13+5:30
राज्य सरकार आणि पेर्नोड रिकार्ड इंडियामध्ये सामंजस्य करार, २५०० कोटींची गुंतवणूक
मोरेश्वर मानापुरे, नागपूर : पेर्नोड रिकार्ड इंडियाने देशातील सर्वात मोठी डिस्टिलरी नागपुरात स्थापन करण्याच्या निर्णय घेऊन विदर्भाच्या विकासामध्ये गुंतवणूक करण्याचा आमचा दृष्टीकोन साकार केला आहे. डिस्टिलरीच्या स्थापनेमुळे रोजगाराच्या मजबूत संधी निर्माण होतील आणि विदर्भातील हजारो शेतकऱ्यांना स्थिर उत्पन्न मिळेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे व्यक्त केला.
हॉटेल रॅडिसन्स ब्ल्यूमध्ये शुक्रवारी झालेल्या एका कार्यक्रमात पेर्नोड रिकार्ड इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी जीन टुबूल आणि प्रधान सचिव (उद्योग) डॉ. हर्षदीप कांबळे यांनी करारावर स्वाक्षरी केली. या प्रसंगी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत, उत्पादन शुल्क आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, पेर्नोड रिकार्ड इंडियाचे नॅशनल कॉर्पोरेट अफेअर्स हेड प्रसन्न मोहिले आणि वरिष्ठ उपाध्यक्ष (इंटिग्रेटेड ऑपरेशन्स) गगनदीप सेठी उपस्थित होते. २५०० कोटींच्या गुंतवणुकीचा हा प्रकल्प अतिरिक्त बुटीबोरी औद्योगिक वसाहतीत ८८ एकर जागेवर असून प्रत्यक्ष उत्पादन दोन वर्षांत सुरू होणार आहे.
परकीय थेट गुंतवणुकीत महाराष्ट्र पुन्हा आघाडीवर
देवेंद्र फडणवीस म्हणाले, देशात येणाऱ्या एकूण परकीय थेट गुंतवणुकीत महाराष्ट्राचा ४५ टक्के वाटा असून महाराष्ट्र पुन्हा पहिल्या क्रमांकावर आला आहे. राज्याच्या सर्वच भागात गुंतवणूक होत आहे. राज्याच्या विकासासाठी सात क्षेत्र निवडली आहेत. यात कृषीक्षेत्र, स्टार्टअप, आर्टीफिशियल इंटिलीजन्स यावर भर दिला आहे. ट्रिपल आयटी नागपूर येथे आर्टीफिशियल इंटिलीजन्सचे सेंटर ऑफ एक्सलन्स उभारण्यासाठी गुगलसमवेत काम सुरू आहे. त्याचा विदर्भातील युवकांना फायदा होईल. पेर्नोड रिकार्डच्या प्रकल्पामुळे राज्याच्या अबकारी शुल्कात वाढ होईल. प्रसन्न मोहिले यांच्यामुळे करार झाल्याचा उल्लेख फडणवीस यांनी आवर्जुन केला.
दोन आठवड्यात नवीन पॉवर सबसिडी धोरण
फडणवीस म्हणाले, विदर्भ आणि मराठवाड्यातील उद्योगांसाठी पॉवर सबसिडी धोरण नवीन स्वरूपात दोन आठवड्यात जाहीर करण्यात येणार आहे. त्याचा फायदा या क्षेत्रातील उद्योजकांना होईल.
विदर्भाच्या शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा : उदय सामंत
हा प्रकल्प विदर्भाच्या शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. विदर्भातील शेतकऱ्यांकडून वर्षाला ५० हजार टनांपर्यंत जव खरेदी करण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्न मिळेल. प्रकल्पाला ८८ एकर जागा केकवळ ४८ तासांत दिली आहे. डाहोसमध्ये ३.७२ लाख कोटींचे सामंजस्य करार झाले. यात देवेंद्र फडणवीस यांचे मोलाचे योगदान आहे. जीन टुबूल म्हणाले, हा प्रकल्प भारताच्या धोरणाचा केंद्रबिंदू आहे. असाच दृष्टीकोन असलेल्या महाराष्ट्र सरकारसोबत काम करण्याचा आम्हाला सन्मान वाटतो. प्रकल्पामुळे शेतकऱ्यांना फायदा होईल. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी काही कारणास्तव कार्यक्रमात उपस्थित राहू शकले नाही. त्याचा संदेश यावेळी वाचून दाखविण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उद्योग विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे यांनी केले. यावेळी विविध औद्योगिक संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रकल्पाची वैशिष्ट्ये :
- पेर्नोड रिकार्ड इंडिया कंपनीची देशातील सर्वात मोठी डिस्टिलरी
- २५०० कोटींची गुंतवणूक
- अतिरिक्त बुटीबोरी औद्योगिक क्षेत्रात ८८ एकर जागेची खरेदी
- प्रकल्प दोन वर्षांत कार्यान्वित होणार
- दररोज ६० हजार लिटर माल्ट स्पिरिटची निर्मिती
- ‘जव’पासून ताजे माल्ट स्पिरिटचे उत्पादन
- शेतकऱ्यांकडून वर्षाला ५० हजार टनापर्यंत जव खरेदी करणार
- जवळपास एक हजार कामगारांना रोजगार मिळणार