देश शिवऋषीला मुकला; सरसंघचालक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2021 08:17 PM2021-11-15T20:17:54+5:302021-11-15T20:18:29+5:30
Nagpur News बळवंत मोरेश्वर उपाख्य बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनाने आपण सर्वच एका शतायुषी शिवऋषीला मुकलो आहोत, या शब्दात सरसंघचालक मोहन भागवत यांनी आपली श्रद्धांजली अर्पण केली.
नागपूर : बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने शोक व्यक्त केला आहे. संघातर्फे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी शब्दांजली अर्पण केली. बळवंत मोरेश्वर उपाख्य बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनाने आपण सर्वच एका शतायुषी शिवऋषीला मुकलो आहोत. तरुण वयापासूनच देशभक्तीचा वसा त्यांना संघ शाखेतून प्राप्त झाला. तो ध्यास मनात ठेवून ध्येय प्राप्तीकरिता तत्त्वरूप आदर्श पुरुष म्हणून छत्रपती श्रीमंत शिवाजी महाराज यांची भक्ती त्यांनी जीवनभर निष्ठेने चालवली.
दादरा नगर हवेलीच्या मुक्तिसंग्रामात सैनिक म्हणून तेही लढले होते. शिवाजी महाराजांची कथा आपल्या वक्तृत्वाच्या बळावर त्यांनी घराघरात पोहोचवली. त्यासाठी जीवनभर असंख्य परिश्रम केले. अत्यंत कठीण परिस्थितीतून केलेल्या या वाटचालीतूनच "जाणता राजा"सारख्या भव्य व प्रेरक नाट्य शिल्पाची निर्मिती त्यांनी केली. त्या देशभक्त व परिश्रमी शिवशाहीर यांचे पार्थिव जरी दृष्टीआड झाले, तरी त्यांचे स्फूर्तिदायक जीवन समाजामध्ये पिढ्यानपिढ्या शिवरायांचा प्रताप व प्रेरणा सतत जागृत ठेवील, अशी भावना सरसंघचालकांनी व्यक्त केली.
बाबासाहेबांचे व्यक्तिमत्त्व सर्वस्पर्शी : गडकरी
अवघ्या महाराष्ट्राचे दैवत, ज्येष्ठ इतिहास संशोधक, पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे जाणे अत्यंत वेदनादायी आणि अतिशय दुःखद आहे. एका दिव्य दृष्टीच्या दिग्दर्शक, अभिनेता, कलावंत, संघटक, लेखक, संशोधक, वक्ता आणि सर्वस्पर्शी अशा व्यक्तिमत्त्वास आज महाराष्ट्र मुकला आहे.
अनेक दुर्गप्रेमी, इतिहास अभ्यासक, गिर्यारोहक, लेखक, वक्ते, संशोधक, दिग्दर्शक, अभिनेते, कवी, छायाचित्रकार, नेपथ्यकार घडविणाऱ्या बाबासाहेबांचे योगदान अक्षरशः थक्क करायला लावणारे असेच आहे. वयाच्या शंभराव्या वर्षांत पदार्पण करून शतायुषी होत असलेल्या सर्वार्थाने शिवमय अशा बाबासाहेबांच्या मनातील उत्साह आणि ऊर्जा, नवनवीन प्रकल्पांच्या कल्पना, वाचन, अभ्यास हे सारे नेहमीच प्रेरणादायी आणि भारावून टाकणारे असेच होते. आम्हाला आणि आमच्यासारख्या करोडो लोकांना खऱ्याअर्थाने बाबासाहेबांमुळेच शिवराय समजले . बाबासाहेब आपण अजून हवे होतात.
- नितीन गडकरी, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री.