किराणा दुकानात दारू बनविण्याच्या साहित्याची विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2020 08:58 PM2020-04-03T20:58:25+5:302020-04-03T21:01:53+5:30

किराणा दुकानाच्या आड हातभट्टीद्वारे दारू बनविण्यासाठी लागणाऱ्या कच्चा मालाचा पुरवठा करणाऱ्या महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Country made liquor items seized at grocery stores | किराणा दुकानात दारू बनविण्याच्या साहित्याची विक्री

किराणा दुकानात दारू बनविण्याच्या साहित्याची विक्री

Next
ठळक मुद्देनागपुरातील अजनीच्या रहाटेनगर टोलीमध्ये छापा : महिला आरोपीला अटक

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : किराणा दुकानाच्या आड हातभट्टीद्वारे दारू बनविण्यासाठी लागणाऱ्या कच्चा मालाचा पुरवठा करणाऱ्या महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अजनी पोलीस व उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने गुरुवारी सायंकाळी रहाटेनगर टोली येथे छापा मारून कारवाई केली आहे. ताब्यात घेण्यात आलेली महिला परिसरात किराणा दुकान चालवित होती. त्या आड दारू बनविण्याच्या साहित्याची विक्री करीत होती. तिच्याकडून पोलिसांनी ३० हजार रुपयांचे साहित्य जप्त केले आहे. आरोपी ४५ वर्षीय पुष्पा अशोक प्रसाद आहे.
पुष्पाचे रहाटेनगर टोली येथे किराणा दुकान आहे. लॉकडाऊनमुळे दारूची दुकाने बंद आहे. अवैध दारूच्या अड्ड्याचा स्टॉक संपला आहे. काही ठिकाणी दुप्पट किमतीमध्ये दारू विकली जात आहे. त्यामुळे शहरातील झोपडपट्टीमध्ये हातभट्टीची दारू विक्री होत आहे. टोली परिसरातसुद्धा चोरून लपून हातभट्टीच्या दारूची विक्री सुरू आहे. लॉकडाऊन असतानाही किराणा दुकान सुरू ठेवण्याची परवानगी दिली आहे. या दुकानातून पुष्पा दारू बनविण्यासाठी आवश्यक असलेला गुळ व नवसागरची विक्री करीत होती. याची माहिती परिसरातील नागरिकांनी पोलीस कंट्रोल रुमला दिली. त्या आधारे अजनी पोलीस व उत्पादन शुल्क विभागाने छापा टाकला. तिच्या दुकानातून ४००० किलो गुळ व ४५ किलो नवसागर मिळाले. दुकानातून पोलिसांनी ३० हजार रुपयांचे साहित्य ताब्यात घेतले. अजनी पोलिसांनी या प्रकरणी तपास उत्पादन शुल्क विभागाकडे सोपविला आहे. शहरात अनेक ठिकाणी अवैध दारू विकली जात आहे. नकली दारूच्या सेवनाने अनेकांनी जीव देखील गमाविला आहे.
दारूची दुकाने बंद असल्याने दारुडे अस्वस्थ आहे. नशेसाठी काहीपण करण्याची त्यांची मानसिकता झाली आहे. अशात नकली दारुमुळे मोठी घटना घडू शकते. तीन दिवसांपूर्वी ‘होम डिलिव्हरी’ देण्याच्या नावावर आॅनलाईन फसवणूक करण्यात आली होती. पोलीस व उत्पादन शुल्क विभागाने दखल घेणे गरजेचे आहे. ही कारवाई उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक रावसाहेब कोरे, अजनीचे पोलीस निरीक्षक संतोष खांडेकर, गणेश जामदार, एन.टी. फड, भगवती ठाकूर, देवेंद्र नवघरे, आतिश राऊत, रितेश गोतमारे यांनी केली.

काळ्या गुळापासून पशुखाद्य निर्मिती
अवैधपणे दारू बनविण्यासाठी आणलेला काळा गुळ पशुखाद्य निर्मितीसाठी वापरला जाणार आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने अजनीच्या रहाटेनगर परिसरात सुरू असलेल्या अवैध दारू निर्मितीच्या अड्ड्यावर छापा मारून ४२० किलो काळा गुळ आणि ४५ किलो नवसागर जप्त केला होता. हा जप्त माल हिंगणा येथील पशूखाद्य निर्मिती कंपनीला देण्यात आला आहे. एक्साईज विभाग आणि अजनी पोलीस यांनी गुरुवारी रात्री संयुक्तपणे कारवाई करीत स्थानिक पुष्पा अशोक प्रसाद हिच्या घरून संबंधित माल जप्त केला होता. लॉकडाउनमुळे सर्वत्र दारूबंदी असल्याने अवैध दारू बनविणारे सक्रिय झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार दारू बनविणाऱ्यांसाठी मध्य प्रदेशातून काळा गुळ मागविला जातो. हा गुळ जप्त केल्यानंतर त्याची साठवणूक करणे एक्साईज विभागासाठी कठीण असते. साठविलेला गुळ काही दिवसांनंतर पाणी व्हायला लागतो. खाद्यपदार्थ असल्याने त्याला फेकून देणे किंवा नष्ट करणे योग्य नाही. ही बाब लक्षात घेता एक्साईज विभागातर्फे पशुखाद्य निर्मिती करणाऱ्या परवानाधारक कंपन्यांना या गुळाची विक्री केली जाते. यामुळे विभागालाही लाखोंचा महसूलही प्राप्त होत आहे. मात्र यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीनंतरच एम-२ परवानाप्राप्त कंपन्यांना हा गुळ देणे आवश्यक असते. हिंगणा आणि एमआयडीसी परिसरात अशा परवानाधारक कंपन्या असून एक्साईज विभाग जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात हा गुळ संबंधित कंपन्यांना सोपवितात.

 

Web Title: Country made liquor items seized at grocery stores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.