देशाला गांधी विचारधारेची गरज
By admin | Published: October 3, 2015 02:46 AM2015-10-03T02:46:19+5:302015-10-03T02:46:19+5:30
देशातील वातावरण सध्या फार चांगले नाही. समाज-समाजात वाद निर्माण करणे, हिंसाचाराला प्रोत्साहन देणे सुरू आहे.
जागतिक अहिंसा दिन :
शहर, जिल्हा काँग्रेस कमिटीचे आयोजन
नागपूर : देशातील वातावरण सध्या फार चांगले नाही. समाज-समाजात वाद निर्माण करणे, हिंसाचाराला प्रोत्साहन देणे सुरू आहे. अशा प्रसंगी समाजाला व देशाला एकजूट करणाऱ्या महात्मा गांधीजींच्या विचारांची खूप गरज आहे. गांधी विचारधाराच या देशामध्ये शांती, अहिंसा, बंधुभाव कायम ठेवू शकते, असे प्रतिपादन जागतिक अहिंसा दिनानिमित्त शुक्रवारी आयोजित कार्यक्रमात काँग्रेसच्या नेत्यांनी येथे केले.
जागतिक अहिंसा दिन आयोजन समिती, नागपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी आणि ग्रामीण काँग्रेस कमिटी यांच्या संयुक्त विद्यमाने व्हेरायटी चौक महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ आदरांजलीपर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार म्हणाले ‘महात्मा गांधी यांना कितीही कमी लेखण्याचा प्रयत्न केला गेला तरी त्यांचे योगदान कुणीच नाकारू शकणार नाही. ‘तसेच माजी पालकमंत्री डॉ. नितीन राऊत, सतीश चतुर्वेदी, आ. सुनील केदार, माजी मंत्री आ. राजेंद्र मुळक, माजी खासदार गेव्ह आवारी, ग्रामीण काँग्रेस अध्यक्षा सुनीता गावंडे, महिला अध्यक्षा प्रज्ञा बडवाईक, युवक काँग्रेस अध्यक्ष बंटी शेळके यांनीही आपले विचार व्यक्त करीत महात्मा गांधी यांना आदरांजली अर्पण केली.
सुरुवातीला संगीतमय आदरांजली अर्पण करण्यात आली. काँग्रेसचे शहराध्यक्ष विकास ठाकरे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. गजराज हटेवार यांनी संचालन केले. यावेळी नाना गावंडे, सेवादलाचे रामगोविंद खोब्रागडे, प्रफुल्ल गुडधे पाटील, उमाकांत अग्निहोत्री, दीपक कापसे, अभिजित वंजारी, संदीप सहारे, एस.क्यू. जमा, विजय बाभरे, डॉ. बंडोपंत टेंभुर्णे, अतुल कोटेचा, संजय दुबे, रत्नाकर जयपूरकर, उमेश शाहू, तुफेल अशर, अजय हिवरकर, संदेश सिंगलकर, घनश्याम मांगे, प्रशांत धवड, जयंत लुटे, हर्षला साबळे, अरुण डवरे, दीपक वानखेडे, तनवीर अहमद आदींसह काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश गजभिये यांनीही महात्मा गांधी यांना आदरांजली अर्पण केली. (प्रतिनिधी)
विष पसरवणारी विचारसरणी हद्दपार करा
राष्ट्रपिता महात्मा गांधींचा खून करणाऱ्या नाथुराम गोडसेची विचारप्रणाली सध्या देशात वाढली आहे. ही विचारप्रणाली देशाला विभाजित करणारी आणि समाजात विष पसरवणारी असून या विचारप्रणालीला हद्दपार करा, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.