देशाला महात्मा गांधी यांना अभिप्रेत असलेल्या राष्ट्रवादाची गरज : श्री शुभमूर्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2019 11:40 PM2019-10-02T23:40:50+5:302019-10-02T23:43:21+5:30
देशातील लोकशाही वाचविण्यासाठी गांधीजींना अभिप्रेत असलेल्या राष्ट्रवादाची गरज असल्याचे प्रतिपादन प्रसिद्ध विचारवंत श्री शुभमूर्ती यांनी बुधवारी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : परकीयांच्या गुलामगिरीतून मुक्ती म्हणजे स्वातंत्र्य एवढेच राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना अभिप्रेत नव्हते, तर या देशात सर्वधर्मसमभाव, सर्वधर्मियात प्रेम व बंधूभाव अभिप्रेत होता. दुर्दैवाने आज देशात गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. राष्ट्रवादाच्या नावावर असत्य लोकांपुढे मांडले जात आहे. सत्य बोलण्याची हिंमत राहिलेली नाही. देशातील लोकशाही वाचविण्यासाठी गांधीजींना अभिप्रेत असलेल्या राष्ट्रवादाची गरज असल्याचे प्रतिपादन प्रसिद्ध विचारवंत श्री शुभमूर्ती यांनी बुधवारी केले. सर्वोदय आश्रम येथे महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त महात्मा गांधी व भारतीय राष्ट्रीयता या विषयावर व्याख्यान देताना ते बोलत होते. व्यासपीठावर सर्वोदय आश्रमच्या कार्याध्यक्ष लीलाताई चितळे, कार्यक्रमाचे अध्यक्ष सुरेश पांढरीपांडे, विश्वस्त अॅड. आशुतोष धर्माधिकारी उपस्थित होते.
श्री शुभमूर्ती म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यापुढे बोलण्याची आज कुणाचीही हिंमत नाही. लोकांना सत्य मांडण्याचे स्वातंत्र्य राहिलेले नाही. संकुचित व चुकीचा राष्ट्रवाद मांडतात आणि लोक त्यावर टाळ्या वाजवतात. देशात धर्मांधता वाढत आहे. हिंदू धर्मात सर्वधर्मसमभावाची शिकवण आहे. परंतु हिंदुत्वाच्या नावावर जातीय तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न होत आहे. ही कशी लोकशाही असा सवाल त्यांनी केला.
लीलाताई चितळे म्हणाल्या, महात्मा गांधी यांच्या विचाराकडे बघण्यासाठी व्यापक दृष्टिकोन लागतो. सध्या जो राष्ट्रवाद शिकवला जात आहे तो खरा राष्ट्रवाद नाही. सत्यासाठी अहिंसक कृतीतून मानवी शक्तीचा आविष्कार होत नाही तोपर्यंत खरा मानवतावाद निर्माण होणार नाही. मानवी शक्ती जागृत करण्यासाठी आज अहिंसक क्र ांतीची देशाला गरज आहे. यासाठी युवकांनी पुढे यावे, असे आवाहन चितळे यांनी केले.
सूत्रसंचालन संदेश सिंगलकर यांनी तर आभार अॅड.वंदन गडकरी यांनी मानले. यावेळी विशाखा बागडे, अॅड. स्मिता सिंगलकर, योगेश देवतळे, शेफाली शहा, यामिनी, राजेश कुंभारे, श्वेता वाघमारे यांच्यासह सर्वोदय आश्रमचे पदाधिकारी व गांधीवादी मोठ्यासंख्येने उपस्थित होते.