मातृभाषेच्या शिक्षणातूनच देशाची प्रगती
By admin | Published: January 9, 2016 03:38 AM2016-01-09T03:38:00+5:302016-01-09T03:38:00+5:30
भाषा ही देशाच्या संस्कृतीचे द्योतक आहे. त्याचबरोबर देशाच्या प्रगतीचे महत्त्वाचे माध्यम आहे.
विजय भटकर : विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन
नागपूर : भाषा ही देशाच्या संस्कृतीचे द्योतक आहे. त्याचबरोबर देशाच्या प्रगतीचे महत्त्वाचे माध्यम आहे. जपानसारख्या देशाने मातृभाषेच्या बळावर विज्ञानाच्या क्षेत्रात जगात सर्वाधिक प्रगती केली आहे. परंतु भारतात विज्ञानाचे शिक्षण हे परदेशी भाषेतून दिल्या जाते. भारतात विज्ञानाचे शिक्षण मातृभाषेतून दिल्यास भारतही जपानसारखी प्रगती करू शकेल. त्यामुळे शिक्षणाचा पाया बदलणे गरजेचे आहे. शिक्षण हे निव्वळ पुस्तकी न राहता, ते खेळ, संगीताच्या माध्यमातून देण्यात यावे, असे मत सुपर कम्प्युटरचे जनक पद्मश्री विजय भटकर यांनी व्यक्त केले.
राही सेंट्रल स्कूलद्वारे आयोजित विज्ञान मेळाव्याचे उद्घाटन भटकर यांच्या हस्ते झाले. यावेळी शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ डॉ. विश्वनाथ कराड, माजी कुलगुरू डॉ. एस.एन. पठाण, संगीततज्ज्ञ संजय उपाध्याक्ष, विजय राऊत, नारायण मोहोड उपस्थित होते. याप्रसंगी डॉ. विश्वनाथ कराड म्हणाले, स्वामी विवेकानंद यांनी १८९३ साली विज्ञान आणि अध्यात्माच्या माध्यमातूनच विश्वाला सुख शांती लाभेल, असे सांगितले. परंतु आपल्या देशात अध्यात्माला अंधश्रद्धा म्हणून अथवा धार्मिक वृत्ती म्हणून बघितले जाते. आपला देश विविध धर्मात विभागला आहे. परंतु या सर्व धर्मग्रथांमध्ये जीवन पद्धती सांगितली आहे.
निव्वळ धर्मग्रंथ वाचण्यापेक्षा त्यात दिलेल्या जीवन पद्धतीचे आचरण करणे गरजेचे झाले आहे. डॉ. एस. एन. पठाण पर्यावरणासंदर्भात बोलताना म्हणाले, भारतात केवळ ११ टक्के भाग वृक्षाखाली आहे. पर्यावरणाच्या नियमानुसार ३० टक्के भाग वृक्षाखाली असणे गरजेचे आहे. जपानचे पर्यावरणाच्या संर्वधनाचे कार्य वाखाणण्याजोगे आहे. जपानचा ३३ टक्के भूभाग वृक्षाखाली आहे. जपानमध्ये पर्यावरणाच्या बाबतीत सरकारबरोबरच विद्यार्थी, नागरिक, पर्यावरणवादी संस्थांमध्ये खरोखरच कळकळ असल्याचे एक उदाहरण देऊन स्पष्ट केले. विज्ञान प्रदर्शनीत शाळेच्या विद्यार्थ्यांनी पर्यावरण व आरोग्याशी निगडित विज्ञानाचे मॉडेल साकारले आहेत. भटकरांनी सर्व मॉडेलची माहिती विद्यार्थ्यांकडून जाणून घेतली. (प्रतिनिधी)