‘नॉलेज पॉवर’ म्हणून देशाला मान्यता मिळावी : नितीन गडकरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2019 08:34 PM2019-09-02T20:34:12+5:302019-09-02T20:35:32+5:30
सर्वांमध्ये ज्ञानाचा प्रसार व्हावा व जगभरात ‘नॉलेज पॉवर’ म्हणून देशाला मान्यता मिळावी, असे मत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व सूक्ष्म-लघु-मध्यम उद्योगमंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गणपती ही विद्येची देवता आहे. देशभरात सगळीकडे गणेशोत्सव उत्साहाने साजरा होत आहे. देश समृद्ध, संपन्न व शक्तिशाली बनेल अशीच या पर्वावर गणरायाकडे प्रार्थना आहे. सर्वांमध्ये ज्ञानाचा प्रसार व्हावा व जगभरात ‘नॉलेज पॉवर’ म्हणून देशाला मान्यता मिळावी, असे मत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व सूक्ष्म-लघु-मध्यम उद्योगमंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. दरवर्षीप्रमाणे यंदादेखील त्यांच्या रामनगर येथील ‘भक्ती’ या निवासस्थानी गणरायाची प्रतिष्ठापना झाली. यावेळी ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
दरवर्षी गणेशोत्सवाला घरी राहण्याचा गडकरी यांचा प्रयत्न असतो. कुटुंबाची परंपरा जपली गेली पाहिजे हा त्यांचा आग्रह असतो. सोमवारी सकाळी त्यांचे धाकटे पुत्र सारंग यांच्या हस्ते गणेश प्रतिष्ठापना झाली. यावेळी पत्नी कांचन, मोठे पुत्र निखील, सुना, नातवंडे सर्वच उत्साहात दिसून येत होते. विशेष म्हणजे गडकरी यांनी घरातील सर्वसामान्य कर्त्या पुरुषाप्रमाणे यावेळी प्रत्येक लहानसहान गोष्टींकडे आवर्जून लक्ष ठेवले. घरी आलेल्या सर्वांची ते अगत्याने विचारपूस करत होते. गणेशोत्सव हा सर्वांच्या श्रद्धेचा विषय आहे. विद्या व ज्ञान यांच्या माध्यमातूनच अंधारातून विकासरूपी प्रकाशाकडे जाणे शक्य आहे. समाजात ज्ञान, विज्ञान व तंत्रज्ञान यांची वाढ व्हावी व समाज ज्ञानमार्गाकडे जावा हीच प्रार्थना आहे, अशी भावना यावेळी गडकरी यांनी व्यक्त केली.
व्यापातदेखील जपतात परंपरा
एखादी मोठी जबाबदारी आली की घरातील दैनंदिन कार्य, सणसोहळे याकडे लक्ष देण्यासाठी राजकारण्यांना फारसा वेळ मिळत नाही. अनेकदा तर कुटुंबीयांनादेखील भेटण्यासाठी प्रतीक्षा करावी लागते. मात्र नितीन गडकरी मात्र याला अपवाद आहेत. महत्त्वाच्या मंत्रालयांची जबाबदारी असतानादेखील आपली कौटुंबिक जबाबदारी पार पाडताना ते दिसून येतात. गणेशोत्सवाच्या निमित्ताने गडकरी यांच्यातील आजोबांचेदेखील दर्शन झाले. आपल्या नातवंडांना गणेशोत्सवाचे महत्त्व, परंपरा याबाबत लहानसहान माहिती देत होते.