मलमूत्राच्या योग्य विल्हेवाटीमुळेच देश स्वच्छ होईल : सोपान जोशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2019 10:39 PM2019-03-02T22:39:26+5:302019-03-02T22:40:28+5:30
देशात स्वच्छता अभियानाची सुरुवात १९८६ पासून झाली. १९९९ मध्ये त्याचे नाव ‘टोटल सॅनिटेशन कॅम्पेन’, २०१२ मध्ये निर्मल भारत अभियान आणि २०१४ मध्ये स्वच्छ भारत अभियान ठेवण्यात आले. नावे बदलली परंतु ३२ वर्षांपासून स्वच्छतेची स्थिती तीच आहे. देशातील तलाव, नद्या, जमिनीवर प्रदूषण वाढले आहे. त्यासाठी मलमूत्र,घाण पाणी वेगळे करून त्याची योग्य विल्हेवाट लावण्यास भारत स्वच्छ होईल, असे प्रतिपादन पर्यावरण तज्ज्ञ आणि ‘जल थल मल’ पुस्तकाचे लेखक सोपान जोशी यांनी व्यक्त केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : देशात स्वच्छता अभियानाची सुरुवात १९८६ पासून झाली. १९९९ मध्ये त्याचे नाव ‘टोटल सॅनिटेशन कॅम्पेन’, २०१२ मध्ये निर्मल भारत अभियान आणि २०१४ मध्ये स्वच्छ भारत अभियान ठेवण्यात आले. नावे बदलली परंतु ३२ वर्षांपासून स्वच्छतेची स्थिती तीच आहे. देशातील तलाव, नद्या, जमिनीवर प्रदूषण वाढले आहे. त्यासाठी मलमूत्र,घाण पाणी वेगळे करून त्याची योग्य विल्हेवाट लावण्यास भारत स्वच्छ होईल, असे प्रतिपादन पर्यावरण तज्ज्ञ आणि ‘जल थल मल’ पुस्तकाचे लेखक सोपान जोशी यांनी व्यक्त केले.
नागपूर एन्व्हायर्नमेंट फोरम, बीजोत्सव, कॅग आणि निसर्गायनच्या संयुक्त विद्यमाने ‘शरीर से नदी की दुरी’ या विषयावर सोपान जोशी यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. ते म्हणाले, लडाखचे लोक छागरा नावाचे शौचालय वापरतात. टाकीत मलावर माती टाकण्यात येत असल्यामुळे तो मल सुकल्यावर त्याचा शेतीत खत म्हणून वापर होतो. तिरुचेरापल्लीचे नागरिक इकोसॅन हे शौचालय वापरतात. इकोसॅनमध्ये मल, मूत्र, पाणी वेगवेगळे करण्याची सुविधा आहे. या शौचालयामुळे मलाची माती होऊन त्याची दुर्गंधी येत नाही. मलामुळे खत आणि मूत्रातून शेतकऱ्यांना नायट्रोजन मिळते. या दोन्ही बाबी शेतीसाठी उपयुक्त आहेत. बंगळुरूमध्ये नायट्रोजन मिळत असल्यामुळे घाण पाणी शेतात टाकतात. परंतु श्रीमंत नागरिक शौचालयात केमिकल, सौंदर्य प्रसाधने वापरत असल्यामुळे तेथील नागरिक श्रीमंत वस्तीतील शौचालयाचे पाणी शेतात वापरत नाहीत. डीवॉट्स पद्धतीतही घाण पाण्याला पुनर्वापर करण्यायोग्य बनविल्या जाते. हे पाणी कूलर, झाडांसाठी वापरता येते. कोलकातामध्ये घाण पाण्यात मासेमार माश्यांचे उत्पादन घेतात. त्यामुळे नागरिकांना स्वस्त दरात मासे मिळून शहरातील घाण पाण्याचा बंदोबस्त होतो. त्यामुळे मल-मूत्र-घाण पाणी वेगवेगळे करण्याच्या पद्धतीचा सगळीकडे वापर केल्यास आणि मल-मूत्राची योग्य विल्हेवाट लावल्यास देश स्वच्छ होईल, असे जोशी यांनी सांगितले. संचालन अतुल उपाध्याय यांनी केले. बीजोत्सव, कॅग, नागपूर एन्व्हायर्नमेंट फोरम, निसर्गायनचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
‘वेस्टर्न टॉयलेट’ दोषपूर्ण
देशात ‘वेस्टर्न टॉयलेट’ बसविण्याचे अभियान जोरात सुरू आहे. त्यासाठी शासन अनुदान देत आहे. परंतु यामुळे घाणीची समस्या सुटणार नसून ती वाढणार आहे. या शौचालयात मलमूत्र, पाणी एकत्र होते आणि त्याचा कुठलाही वापर न झाल्यामुळे ते थेट जल स्रोतात मिसळते. त्यासाठी देशाच्या विविध भागात मलमूत्राच्या विल्हेवाटीच्या पद्धती पाहून त्या-त्या भौगोलिक परिस्थितीनुसार त्या वापरल्यास भूजल, तलाव, नद्या प्रदूषित होणार नाहीत, असे जोशी म्हणाले.