देशाची आर्थिक गती मंदावली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2017 01:20 AM2017-10-02T01:20:23+5:302017-10-02T01:20:40+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : केंद्र शासनाच्या आर्थिक धोरणांवर विविध स्तरांतून टीका होत असताना, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनीदेखील असमाधान व्यक्त केले आहे. देशाची आर्थिक गती मंदावली असल्याचे म्हणतात, असे प्रतिपादन करीत त्यांनी याची अप्रत्यक्षपणे केंद्राची कानउघाडणी केली आहे. केंद्र शासनाने भ्रष्टाचाराविरोधात पावले उचलत काही धाडसी निर्णय नक्कीच घेतले. मात्र उद्योग, व्यापार, कृषी यांच्यासोबतच मोठे, लघु, मध्यम उद्योग, कामगारक्षेत्र यांचे हित लक्षात घेऊन सर्वसमावेशक आर्थिक धोरण लागू करण्याची आवश्यकता आहे, असे मत डॉ.भागवत यांनी व्यक्त केले. संघाच्या विजयादशमी व शस्त्रपूजन उत्सवप्रसंगी ते बोलत होते.
शनिवारी सकाळी रेशीमबाग मैदान येथे हा कार्यक्रम पार पडला. संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशीदेखील उपस्थित होते. आर्थिक क्षेत्रात आपण ज्याप्रकारे पुढे जात आहोत, संपूर्ण जगाचं लक्ष त्याकडे आहे. देशाची आर्थिक विकासाची गती मंदावली असे म्हणतात. ती ठीक होईल असेदेखील वाटते. मात्र भविष्य लक्षात घेता पारंपरिक आर्थिक विचारसरणीतून बाहेर आले पाहिजे. यासंदर्भात समाजाच्या नेमक्या अपेक्षा काय आहेत, हेदेखील जाणून घेतले पाहिजे. स्वदेशीला बळ दिल्या गेले पाहिजे. या बाबींचा नीती आयोग व धोरण निर्मात्यांनी विचार करावा, असे प्रतिपादन डॉ.भागवत यांनी केले. सामान्य जनतेचा विचार करून राबविल्या जाणाºया योजनांची अंमलबजावणी
योग्य पद्धतीने होत आहे की नाही, हे तपासायला हवे. लघु, कुटीर व मध्यम उद्योगांमुळे कठीण काळातदेखील अर्थव्यवस्था तरली. त्यामुळे या उद्योगांना प्रोत्साहन देऊन रोजगारनिर्मितीसाठी शासनाने प्रयत्न केले पाहिजेत तसेच विविध योजना व कामांची गती वाढविली पाहिजे, असे डॉ.भागवत म्हणाले.
सरसंघचालकांच्या भाषणाअगोदर शस्त्रपूजन करण्यात आले. शिवाय प्रारंभी स्वयंसेवकांनी परिसरात संचलन केले तसेच निरनिराळ्या शारीरिक कवायती सादर केल्या.
यावेळी माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी, विदर्भ प्रांत सहसंघचालक राम हरकरे, महानगर संघचालक राजेश लोया, महानगर सहसंघचालक श्रीधर गाडगे यांच्यासह हजारो स्वयंसेवक व नागरिकांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे संघाच्या संकेतस्थळावर थेट प्रक्षेपण करण्यात आले.
कर्जमाफी कायमस्वरूपी उपाय नाही
कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या देशातील शेतकºयाला बळ देण्याची आवश्यकता आहे, याकडे सरसंघचालकांनी लक्ष वेधले. अतिवृष्टी, पूर, दुष्काळ, आयात-निर्यात धोरण, कर्ज इत्यादींचा फटका शेतकºयालाच बसतो आहे. नवीन पिढी शेतीकडे न वळता शहरांकडे येत आहे. कर्जमाफी हा कायमस्वरूपी उपाय नाही. त्यामुळे शेतकºयांना फायदा होईल, याप्रकारे किमान आधारभूत किंमत निश्चित झाली पाहिजे. वेळ आली तर शासनाने खर्चाचे ओझे उचलले पाहिजे, अशी सूचना यावेळी सरसंघचालकांनी केली.
गोरक्षेच्या नावाखाली हिंसा अमान्यच
गोरक्षेच्या मुद्यावरून देशात मोठा वाद निर्माण झाला होता. गोरक्षा व्हायलाच हवी. मात्र गोरक्षेच्या मुद्यावरून लहानशा मुद्याला हवा देऊन अकारण वाद निर्माण करण्यात येत आहे. अनेक गोरक्षक चांंगले काम करीत आहेत, मात्र उगाच वाद निर्माण करण्यात येतो. अनेक मुस्लिमदेखील गोरक्षेचे समर्थक आहेत. मात्र उगाच गोरक्षेच्या नावाखाली होणाºया हिंसेला धर्माशी जोडण्यात येते. गोरक्षेच्या नावाखाली हिंसा करणाºया समाजकंटकांवर नियमाप्रमाणे कठोर कारवाई झालीच पाहिजे, असे परखड मत डॉ. भागवत यांनी व्यक्त केले.
मुख्यमंत्री, गडकरी संघ गणवेशात
विजयादशमी उत्सवाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी हे संघाच्या नवीन गणवेशात उपस्थित झाले होते. दोघेही मंत्री म्हणून नव्हे तर स्वयंसेवक म्हणून आले होते. माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी हेदेखील बºयाच वर्षांनंतर विजयादशमी सोहळ्याला उपस्थित राहिले. याशिवाय आसामचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित, राष्ट्रसेविका समितीच्या प्रमुख संचालिका शांताक्का, प्रमिलाताई मेढे, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खा.अजय संचेती, खा.विकास महात्मे, नागपुरातील भाजपाचे सर्व आमदार, प्रतिभा अडवाणी, व्ही.एन.राजू, सुदर्शन वेणू, अपलक्रिश्नन, स्वामिनी ब्रह्मप्रकाशानंद हे प्रामुख्याने उपस्थित होते.
काश्मीरमधील विस्थापितांना समान अधिकार हवा
देशात समान अधिकार कायदा लागू करावा, ही संघाची जुनी मागणी आहे. सरसंघचालकांनी त्याचाच पुनरुच्चार केला. काश्मीरमध्ये विस्थापित हिंदूंना अद्यापही अधिकार मिळालेले नाहीत. त्यांना मतदानाचा अधिकार, आधार कार्डदेखील नाही. स्वातंत्र्यापासून काश्मीरचे नागरिक असूनदेखील त्यांच्याबाबत भेदभाव करण्यात येत आहे. याला संपविण्याची आवश्यकता आहे. यासाठी संविधानात संशोधन करून आवश्यक बदल झाले पाहिजेत. या क्षेत्रात विकास पोहोचविल्या गेला पाहिजे, असे आवाहन डॉ.भागवत यांनी केले.
मुंबईतील दुर्घटना दुर्दैवी
भाषणाची सुरुवात करताना डॉ.मोहन भागवत यांनी मुंबईतील एलफिन्स्टन रोड स्थानकावर घडलेल्या घटनेवर दुख: व्यक्त केले. मुंबईत जी घटना घडली त्याचं दु:ख आपल्या सगळ्यांच्या मनात असणं साहजिक आहे. मात्र अशा घटनानंतरही आयुष्य पुढे सुरूच राहते आणि ते ठेवावच लागते, असं मोहन भागवत म्हणाले.
पाक,चीनविरोधातील भूमिकेबाबत शाबासकी
पाकिस्तान आणि चीनसंदर्भातील कठोर भूमिकेबाबत सरसंघचालकांनी केंद्र शासनाची पाठ थोपटली. कणखर भूमिकेमुळे भारत काही तरी करीत आहे याची जगानेही नोंद घेण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर आणि आपल्या मनात आदर निर्माण होत असून ते लक्षात येत आहे. कुरापती करणाºया देशांना चोख उत्तर दिलं जात आहे. डोकलामप्रकरणी ज्याप्रकारे संयम ठेवला आणि कूटनीतीचा वापर केला गेला त्याचं कौतुक आह,े असं मोहन भागवत म्हणाले.
संरक्षणक्षेत्रात स्वावलंबी व्हावे
यावेळी सरसंघचालकांनी सुरक्षादलांच्या कामगिरीचे कौतुक केले. काश्मीरमध्ये सुरक्षादलांना दिलेले स्वातंत्र्य स्वागतार्ह आहे. सीमेपलीकडून होणाºया घुसखोरीवर नियंत्रण आले आहे. मात्र आता सैनिक, सुरक्षा दलांना साधनसंपन्न करायला हवे. संरक्षण क्षेत्रात देशाने स्वावलंबी झाले पाहिजे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे सुरक्षादलांना भोजनासारख्या मूलभूत सुविधा दर्जेदार पद्धतीच्या मिळाल्या पाहिजेत व शासनाने थेट संवाद वाढवायला हवा, अशी अपेक्षा डॉ.भागवत यांनी व्यक्त केली.
बंगाल, केरळ शासनावर टीका
बंगाल आणि केरळ या दोन्ही राज्यात संघ स्वयंसेवकांवर मोठ्या प्रमाणात हल्ले झाले आहेत. सरसंघचालकांनी या राज्यातील हिंसाचारावर जोरदार टीका केली. दोन्ही राज्यांमधील राजकीय हिंसा चिंताजनक आहे. येथील शासनकर्त्यांकडून उदासीन भूमिका घेण्यात येत असून राजकीय स्वार्थासाठी राष्ट्रविरोधी शक्तींना पाठिंबा देत आहेत, असा आरोप त्यांनी केला.